भगवंताची तारक आणि मारक अशी दोन रूपे असून भगवंताच्या मारक रूपाला सामोरे जाण्यासाठी केवळ ‘शरणागती आणि प्रार्थना’ हा एकच उपाय असणे

‘आज विजयादशमी आहे. हा धर्म आणि अधर्म यांतील विजयाचा दिवस आहे. हा श्रीरामाचा रावणासुरावरील विजयाचा दिवस आहे. हा आदिशक्ति दुर्गादेवीचा महिषासुरावरील विजयाचा दिवस आहे. या सर्वांमध्ये एक सामाईक सूत्र आहे, ते म्हणजे ‘विजय’ ! ‘विजय’ हा भगवंताचा गुण आहे. भगवंताची तारक आणि मारक अशी २ रूपे आहेत. ‘विजय’ म्हटले की, शौर्य, साहस, धैर्य, असे मारक भाव आलेच. विजयादशमी हा सण भगवंताच्या मारक रूपाशी संबंधित आहे. सृष्टीचक्राचा आरंभ झाल्यापासून भगवान श्रीविष्णूच्या तारक आणि मारक रूपांच्या अनेक दैवी लीला आपल्याला ऋषींनी लिहिलेल्या कथांवरून शिकायला मिळाल्या आहेत. त्यातील २ वैशिष्ट्यपूर्ण प्रसंगांचा आज उल्लेख करत आहे. त्या वेळी ‘ईश्वराच्या मारक रूपाला भक्त कसे सामोरे गेले ? ईश्वराला कशी प्रार्थना केली ?’, हे सर्व आज पाहूया.

महर्षींनी नाडीपट्टीवाचनातून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचे अंशावतार आहेत’, असे सांगितले असून त्यांच्यातील श्रीविष्णूच्या तारक-मारक शक्तीमुळेच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार असणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

१. श्रीविष्णूचा अंशावतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले !

‘परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले हे सांप्रत कलियुगातील भगवान श्रीविष्णूचे अंशावतार असल्याचे (प.पू. कृष्ण कर्वेगुरुजी, प.पू. (कै.) अश्वमेधयाजी नाना (नारायण) काळेगुरुजी (बार्शी, सोलापूर), प.पू. (कै.) आबा (नरसिंह) उपाध्ये (पुणे) या संतांनी आणि सप्तर्षि (नाडीपट्टी वाचन क्र. ८० (३०.५.२०१६) आणि क्र. ८१, ३१.५.२०१६) अन् भृगु ऋषि (नाडीपट्टी वाचन क्र. ३, ११.९.२०१८) यांनी जीवनाडीपट्टीच्या माध्यमातून वेळोवेळी साधकांच्या पुढे उलगडले आहे. श्रीविष्णूच्या अंशावतारात कलियुगातील मानवाला पेलवेल एवढेच विष्णुतत्त्व कार्यरत असते. श्रीविष्णूमध्ये असलेली तारक आणि मारक ही दोन्ही तत्त्वे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामध्ये आहेत.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या संपर्कात आलेल्या सर्व साधकांनी त्यांच्यातील तारक तत्त्वाची अनुभूती घेतली आहे. त्यांच्यातील हे तत्त्व चैतन्याच्या रूपात जगभरात कार्यरत होऊन हळूहळू जग हिंदु राष्ट्राच्या दिशेने पाऊल टाकेल.

प्रार्थना

‘हे श्रीमन्नारायणस्वरूप गुरुदेवा, श्रीविष्णूच्या मारक तत्त्वाला सामोरे जाण्याची आमच्यात क्षमता नाही. आम्ही सर्व साधक तुमच्या चरणी शरण आलो आहोत. ‘आम्हाला श्रीविष्णूच्या मारक तत्त्वाला सहन करता यावे आणि त्यातून आमची साधना घडावी’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’

– श्री. विनायक शानभाग, कुमटा, कर्नाटक. (६.१०.२०२१)

श्री. विनायक शानभाग

१. सत्ययुग : श्रीविष्णूचा नृसिंह अवतार आणि भक्त प्रल्हाद !

श्री नृसिंह आणि भक्त प्रल्हाद

१ अ. भक्त प्रल्हादासाठी भगवंताने नृसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपूचा वध करणे, तेव्हा सर्व देवतांनी त्याची स्तुती करणे; मात्र तरीही त्याचा क्रोध शांत न होणे : भक्त प्रल्हादासाठी भगवंताने नृसिंह अवतार धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा वध केला. त्यानंतर सर्व देवता तिथे उपस्थित झाल्या आणि त्यांनी नृसिंह रूपातील भगवंताची स्तुती केली. साक्षात् ब्रह्मदेव आणि शिवानेही भगवंताची स्तुती केली; मात्र नृसिंहाचा क्रोध शांत झाला नाही. तेव्हा वैकुंठातून श्री महालक्ष्मीदेवी तिथे आली. ब्रह्मादी सर्व देवांना वाटले, ‘श्री महालक्ष्मीच्या आगमनाने भगवान नृसिंहाचा क्रोध न्यून होईल’; मात्र तसे झाले नाही. श्री महालक्ष्मीदेवीने ब्रह्मदेवाला प्रल्हादाला नृसिंहाकडे पाठवण्यास सांगितले. ब्रह्मदेव प्रल्हादाला सांगतो, ‘‘हे प्रल्हाद, तू तुझ्या शब्दांमध्ये भगवंताची स्तुती कर. तशी स्तुती केल्याने भगवंताचा क्रोध काही प्रमाणात शांत होईल आणि सृष्टीचा विनाश वाचेल.’’

१ आ. हिरण्यकश्यपूच्या वधासाठी भगवंताने घेतलेले मारक रूप फारच प्रखर असणे; मात्र भक्त प्रल्हादाने त्या रूपाला न घाबरता निःसंकोचपणे त्याच्या जवळ जाऊन त्याला साष्टांग दंडवत घालून त्याची स्तुती करणे : भक्त प्रल्हाद लगेच ब्रह्मदेवाला होकार देतो. ‘ना मनुष्य, ना सिंह’, असे ते भगवंताचे अक्राळ-विक्राळ रूप होते ! त्याच्या तोंडातून अग्नीच्या ज्वाळा आणि डोळ्यांतून कोटी सूर्यापेक्षा अधिक प्रखर तेज बाहेर पडत होते. त्याने गळ्यात हिरण्यकश्यपूची आतडी माळेसारखी घातली होती. त्याचे हावभाव, क्रोध, लय आणि सृष्टी विनाशाचे होते. भगवंताचे हे महारौद्र रूप पाहून सर्व देवताही भीतीने लांब उभ्या राहिल्या होत्या. त्या वेळी बालक भक्त प्रल्हाद निःसंकोचपणे भगवंताच्या जवळ जाऊन त्यांना साष्टांग नमस्कार करतो. भगवान नृसिंह प्रल्हादाच्या डोक्यावर स्वतःचा उजवा हात ठेवतो. त्या क्षणी भक्त प्रल्हादाच्या तोंडातून नृसिंहाच्या स्तुतीपर शब्द बाहेर पडतात. यालाच ‘प्रल्हादस्तुती’, असे म्हणतात.

१ इ. प्रल्हादस्तुती

१ इ १. भगवान नृसिंहाच्या रौद्ररूपातही त्याचे भक्तवत्सल करुणामय रूप पाहून त्याला आर्तभावाने अन् शरणागतीने प्रार्थना करणारा बालक भक्त प्रल्हाद ! : प्रल्हाद नृसिंहाला म्हणतो, ‘‘भगवंता, तुझे हे रौद्र रूप पाहून मला अजिबात भीती वाटत नाही; कारण तुझ्या या रूपातही तुझे करुणामय रूप दडले आहे. भगवंता, तुझी निरंतर भक्ती करण्यासाठी तू मला आशीर्वाद दे. या जगात तुझे चरण सोडून सर्वकाही नश्वर आहे. तू आदि आणि अनंत आहेस. शेवटी एका लहानशा मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांना तुझ्या चरणांकडे यायचे आहे; म्हणून मी तुला शरण आलो आहे. तू मला या संसारातून मुक्त होण्याचा मार्ग दाखव आणि मला त्यासाठी आशीर्वाद दे. मला एकट्याला मोक्षाला जायचे नसून समष्टीला मोक्षमार्ग दाखवण्यासाठी साहाय्य करण्याची बुद्धी मला दे. ‘तुझी भक्ती कशी करावी ?’, हे समष्टीला सांगण्यासाठी तू मला शक्ती दे. खरेतर तुझे स्मरण हेच सर्वकाही आहे. मी असुर कुळात (हिरण्यकश्यपूचा मुलगा म्हणून) जन्माला आलो आहे. मी तुझी कशी आणि काय स्तुती करणार ? तुझी स्तुती करण्यासाठी माझे शब्द अपुरे आहेत.’’

१ इ २. प्रल्हादाने केलेल्या स्तुतीने भगवान नृसिंह शांत होणे, त्यांनी कौतुकाने प्रल्हादाला वर मागायला सांगणे, प्रल्हादाने नम्रतेने ‘माझ्या वडिलांना चांगली गती दे’, असे सांगणे : प्रल्हादाचे हे शब्द ऐकताच भगवान नृसिंहाचा क्रोध शांत होतो आणि तो प्रल्हादाला वर मागायला सांगतो. तेव्हा प्रल्हाद म्हणतो, ‘‘भगवंता, माझे वडील हिरण्यकश्यपू यांना सद्गती द्यावी.’’ हे ऐकून भगवंताला फार आनंद होतो. भगवंत प्रल्हादाला म्हणतो, ‘‘हे प्रल्हाद, तुझे वडील हिरण्यकश्यपू यांच्यासहित तुझ्या मागच्या २० पिढ्यांना मी सद्गती प्रदान करतो आणि तुझ्या पुढच्या पिढीतील कुणाचाही माझ्या हातून मृत्यू होणार नाही’, असे वरदानही तुला देतो.’’ त्यामुळे वामनावतारात भगवान श्रीविष्णु प्रल्हादाचा वंशज चक्रवर्ती बलीराजाला ठार न मारता त्याला पाताळात पाठवतो.

२. द्वापरयुग : श्रीकृष्णावतार आणि अभिमन्यूचा मृत्यू

युद्धातील अभिमन्यूच्या मृत्यूचा क्षण

२ अ. महाभारत युद्धाच्या १३ व्या दिवशी कौरवांनी कूटनीती वापरून कृष्णार्जुनाला युद्धभूमीपासून दुसरीकडे पाठवणे आणि त्या वेळी कपटाने अर्जुनपुत्र अभिमन्यूचा क्रूरतेने वध करणे : महाभारत युद्धाच्या १३ व्या दिवशी द्रोणाचार्यांनी ‘समसप्तक’ नावाच्या योद्ध्यांना पाठवून अर्जुन आणि श्रीकृष्ण यांना कुरुक्षेत्रापासून दूर नेण्याची योजना केली. त्यानंतर कौरवांनी अत्यंत नीच नीती वापरून क्रूरतेने अर्जुनपुत्र अभिमन्यूला चक्रव्यूहाच्या आत ठार मारले. काही काळाने दूर गेलेले अर्जुन आणि श्रीकृष्ण युद्धभूमीवर परत आल्यावर त्यांना ‘जयद्रथासह कौरवांच्या काही योध्यांनी मिळून एकट्या अभिमन्यूला युद्धाचे सर्व नियम डावलून क्रूरतेने ठार मारले आहे’, असे कळते. हे सर्व कळल्यावर अर्जुन कोसळला. श्रीकृष्ण अर्जुन आणि सुभद्रा यांचे सांत्वन करतो. अर्जुन सर्वांच्या समोर दुसर्‍या दिवशी ‘जयद्रथा’ला ठार मारण्याची शपथ घेतो. अर्जुनाला रात्री झोप लागेपर्यंत श्रीकृष्ण त्याच्या समवेत थांबतो. त्यानंतर श्रीकृष्ण ‘दारुक’ नावाच्या सारथ्याला घेऊन स्वतःच्या तंबूत परत येतो.

२ आ. श्रीकृष्णाला क्रोध आल्यामुळे त्याने ‘दुसर्‍या दिवशी मीच युद्धात सर्वांना ठार मारीन’, असे दारुकाला सांगणे, त्या वेळी दारुकाने भगवंताच्या क्रोधाला सामोरे जाणे शक्य नसल्याचे ओळखणे : श्रीकृष्ण त्याचा सारथी दारुक याला सांगतो, ‘‘या विश्वात मला अर्जुनच सर्वकाही (प्रिय) आहे. उद्या मीच आधी युद्धभूमीत जाईन आणि संपूर्ण कौरवसेना, कर्ण, दुर्याेधन आदी सर्वांना ठार मारीन. तू सकाळी माझा रथ घेऊन सिद्ध रहा. आता मी अर्जुनाला युद्धभूमीत जाण्याची वेळ येऊ देणार नाही.’’ दारुकाला त्याचे स्वामी असणार्‍या श्रीकृष्णाला ‘क्रोध’ आला आहे’, हे लक्षात येते. तो ‘हो’, असे म्हणतो; कारण दारुकाला ठाऊक असते, ‘साक्षात् भगवंताच्या क्रोधाला कुणीही सामोरे जाऊ शकणार नाही आणि भगवंताच्या समोर काही सांगण्याची ही वेळही नाही.’ दारुक शांतपणे तिथून निघून जातो.

२ इ. अकस्मात् निसर्गात पालट होऊन महाभयंकर तांडव केल्यासारखा गडगडाट करून वादळ येणे : त्या दिवशी मध्यरात्रीनंतर प्रचंड वादळ येते. सर्वांचे तंबू हालायला लागतात. आकाशात एकाच वेळी सहस्रो विजा चमकू लागतात आणि निसर्गाने महाभयंकर रौद्रतांडव केल्यासारखा गडगडाट ऐकू येतो. पांडव आणि कौरव सर्व त्यांच्या तंबूतून बाहेर येतात. कुणालाही काही कळत नाही. ‘वादळ येण्याची कुठलीही पूर्वसूचना नव्हती’, असे असतांना ‘असे महाभयानक वादळ कुठून आले ?’, हे कुणालाच कळत नाही.

२ ई. कौरवांनी भीष्माचार्यांना विचारल्यावर त्यांनी ‘तुम्ही अधर्माने अभिमन्यूला मारल्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या मनात आलेला हा क्रोध असून तो शांत होण्यासाठी त्यालाच प्रार्थना करूया’, असे सांगणे : कौरव शरशय्येवर असलेल्या महारथी भीष्माचार्यांकडे जातात आणि त्यांना या वादळाचे कारण विचारतात. भीष्माचार्य त्यांना म्हणतात, ‘‘हे वादळ नसून हा ब्रह्मांडनायक श्रीकृष्णाचा क्रोध आहे.

युद्धाचे सर्व नियम मोडून तुम्ही महारथींनी एकाच वेळी अभिमन्यूला क्रूरतेने ठार मारल्याने श्रीकृष्णाच्या मनात जी क्रोधाची लाट उमटली आहे, त्याचे हे फलस्वरूप आहे. त्या भगवंताच्या मनातील ती क्रोधाची लाट थांबली नाही, तर उद्याचे युद्ध चालू होण्याआधी कुणीच जिवंत रहाणार नाही. त्यामुळे भगवंताचा क्रोध शांत होण्यासाठी प्रार्थना करूया.’’

२ उ. सर्व पांडव विदुराकडे जाऊन त्याला निसर्गाच्या या रौद्ररूपाविषयी विचारतात, तेव्हा ‘अधर्माने झालेल्या अभिमन्यूच्या मृत्यूमुळे श्रीकृष्णाच्या मनात उठलेल्या क्रोधाच्या विचारांमुळे हे तांडव दिसत असून तो क्रोध शांत होण्यासाठी त्यालाच प्रार्थना करूया’, असे त्यांनी सांगणे : सर्व पांडव विदुराकडे जातात आणि त्याला विचारतात, ‘‘या महाभयंकर वादळाचे कारण काय ?’’ तेव्हा विदुर म्हणतो, ‘‘वैकुंठपती, जगद्गुरु श्रीकृष्ण आपल्या तंबूत शांत झोपला आहे; मात्र त्याच्या मनात अभिमन्यूच्या मृत्यूमुळे आलेल्या क्रोधाच्या एका विचाराने वादळाचे रूप धारण केले आहे. आपण मनाने श्रीकृष्णाला शरण जाऊया आणि त्याला प्रार्थना करूया. हाच एकमेव उपाय आहे. आपल्या कुणातही भगवंताच्या मारक रूपाला सामोरे जाण्याची क्षमता नाही.’’ विदुराने सांगितल्याप्रमाणे सर्व पांडव श्रीकृष्णाला अनेक प्रार्थना करतात. थोड्या वेळाने वादळ शांत होते.

दुसर्‍या दिवशी भगवान श्रीकृष्णाचा क्रोध शांत होतो आणि श्रीकृष्ण अर्जुनाने घेतलेल्या शपथेप्रमाणे त्याच्याकडूनच जयद्रथाचा वध करवून घेतो. तो भक्ताच्या इच्छेत ढवळाढवळ करत नाही; मात्र त्या वेळी द्रोणाचार्य, कौरव आणि पांडव यांना भगवंताच्या मारक रूपाचे महत्त्व लक्षात येते.

३. श्रीविष्णूच्या मारक रूपाचे रहस्य !

३ अ. श्रीविष्णु भक्तांसाठी जेवढा करुणामयी आहे, तेवढाच तो दुष्टांसाठी कठोर असणे आणि दुष्टांचा विनाश झाल्यावरच शांत होत असणे : श्रीविष्णु म्हणजे १०० टक्के देवतातत्त्व ! ब्रह्मा, विष्णु आणि शिव या त्रिमूर्तींमध्ये श्रीविष्णु सर्वांत ‘कडक’ दैवत आहे. ब्रह्मदेव आणि शिव यांच्याकडून वर मागून घेणे सोपे आहे; मात्र श्रीविष्णूकडून वरदान प्राप्त करणे तेवढे सोपे नाही. तो जेवढा भक्तांसाठी करुणामयी आहे, तेवढाच तो दुष्टांसाठी कठोर आहे. भगवंताचे मारक रूप दुष्टांच्या संहारासाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी प्रकट होते. समुद्र नेहमी शांत असतो; मात्र जेव्हा वादळाची वेळ येते, तेव्हा समुद्र खवळतो. तो रौद्र रूप धारण करून सृष्टीत विनाश घडवतो. नेहमी मंजुळ वहाणारी हवा शांत आणि आल्हाददायिनी असते; मात्र चक्रीवादळाच्या वेळी तीच हवा गतीने आपल्यासमोर येणार्‍या सर्वांचा विनाश करत बेभान सुटलेली असते. भूमी ही नेहमी शांत आणि एका लयीत गतीमान असते; मात्र विनाशाची वेळ येते, तेव्हा तिचे एक कंपनही गाव, घरे, रस्ते, नदींचे प्रवाह, शहरे, पर्वत आदी हालवून टाकते आणि एका क्षणात नरसंहार घडून येतो.

३ आ. भगवंताचे मारक रूप हे केवळ भक्ताच्या कल्याणासाठी असणे, त्यासाठी भक्ताने खर्‍या अर्थाने त्याच्याच चरणी लीन आणि शरणागत होणे आवश्यक असणे : शांत असलेल्या श्रीविष्णूचे मारक रूप केवळ दुष्टांच्या विनाशासाठी कार्यरत होते. सर्व प्राणीमात्रांमध्ये एक गोष्ट सामाईक आहे आणि ते म्हणजे ‘भय.’ भगवंताचे मारक रूप खर्‍या अर्थाने भक्ताचे भयहरण करणारे आहे. भगवान श्रीविष्णु त्याच्या मारक रूपातून भक्ताला खरेतर ‘मी तुझ्या पाठीशी असतांना तुला कशाचेही भय नको’, असे आश्वस्त करत असतो. भगवंताने मारक रूप धारण केल्यावरच शरणागती आणि प्रार्थना यांचे मूल्य अजून वाढते. कधी नव्हे, एवढे तेव्हा आपण खर्‍या अर्थाने त्याच्या चरणी शरणागत होतो; म्हणून भगवंताचे मारक रूप हे भक्ताच्या कल्याणासाठीच आहे !

४. येणार्‍या काळात तिसरे महायुद्ध, नैसर्गिक प्रकोप आणि व्याधी या रूपांत भगवान श्रीविष्णूचे मारक रूप पृथ्वीवर प्रकट होणार असणे

अनेक संत, द्रष्टे, ज्योतिष विशारद आणि नाडीपट्टीवाचक यांनी वर्ष २०२० ते वर्ष २०२५ या कालावधीत होणार्‍या नरसंहाराविषयी पुष्कळ आधीपासून सांगितले आहे. वर्ष २०२० पासून तसा काळ आल्याचे आपण सर्व अनुभवत आहोत. यापुढे तो काळ आताच्या तुलनेत महाभयानक असणार आहे. या कालावधीमध्ये तिसरे महायुद्ध, नैसर्गिक प्रकोप आणि व्याधी या रूपांत सर्वत्र रौद्र तांडव असेल. हे सर्व भगवान श्रीविष्णूच्या मारक रूपाचे प्रकटीकरणच असणार आहे.

५. भगवंताच्या मारक रूपाला सामोरे जाण्याचा उपाय म्हणजे केवळ शरणागती आणि प्रार्थना असणे

भगवान नृसिंह आणि भगवान श्रीकृष्ण यांच्या वरील २ प्रसंगातून आपल्या सर्वांच्या लक्षात आले असेल, ‘भगवंताच्या मारक रूपाला सामोरे जाणे देव-देवतांना कठीण झाले होते, तिथे आपल्यासारख्या सामान्य मनुष्याचे काय ?’ भगवंताला हे ठाऊक असल्याने त्याने आधीच आम्हा सर्वांना यावरचा उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे ‘शरणागती आणि प्रार्थना’ ! भक्तवत्सल भगवंत आपल्या शरणागताला नेहमी अभय देतो; म्हणून येणार्‍या काळात भगवान श्रीविष्णूच्या मारक रूपाला सामोरे जाण्यासाठी आपल्या सर्वांसाठी ‘शरणागती’ आणि ‘प्रार्थना’ हेच सर्वाेत्तम उपाय आहेत.’

– श्री. विनायक शानभाग, कुमटा, कर्नाटक. (६.१०.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक