रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी सौ. साक्षी जोशी यांना आलेली अनुभूती

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

१. श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ  यांनी तुळजापूर येथील साधकाला प्रत्यक्ष देवीची ओटी भरण्याची सेवा देणे

सौ. साक्षी जोशी

‘कलश स्थापनेच्या वेळी पुरोहित साधक श्लोक म्हणत होते. त्या वेळी तुळजापूर येथील साधक श्री. अमित कदम यांचा माझ्या भ्रमणभाषवर लघुसंदेश आला. मी ही गोष्ट सहजच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना सांगितली. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘श्री. अमित कदम यांना श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी तिथे प्रार्थना करायला सांगूया आणि त्यांना शक्य असेल, तर आपण त्यांना श्री भवानीदेवीची ओटी भरण्यास किंवा त्यांना जी जमेल ती सेवा करण्यास सांगूया.’’ त्याप्रमाणे मी त्यांना कळवले आणि त्यांनीही सहज सिद्धता दर्शवली.

२. परात्पर गुरु डॉक्टरांनी प्राणप्रतिष्ठेसाठी मूर्तीच्या खालची तार ओढल्यावर सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यांसमोर दिसणे आणि तुळजापूर येथील साधकाने त्याच वेळी तुळजाभवानीची प्रत्यक्ष ओटी भरून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रार्थना केल्याचे समजल्यावर पुष्कळ आनंद होणे

श्री. अमित कदम

दुसर्‍या दिवशी प्राणप्रतिष्ठा करण्याचा मुहूर्त होता. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर देवीच्या मूर्तीजवळ होते आणि आम्ही सर्व थोड्या दूर अंतरावर उभे होतो. ‘आत काय विधी चालू आहे ?’, हे मला दिसत नव्हते. केवळ सनातनचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे पुरोहित साधक श्री. दामोदर वझेकाका यांचे मंत्र आणि मुहूर्ताच्या मंगलाष्टका ऐकू येत होत्या. त्या कधी संपणार ? हेही मला ठाऊक नव्हते. परात्पर गुरु डॉक्टर मुहूर्ताच्या मंगलाष्टका संपल्यावर श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या खालची तार ओढणार होते. त्यापूर्वी माझ्याकडून प्रार्थना झाली, ‘हे जगद्जननी भवानीमाते, तू या मूर्तीमध्ये तत्त्वरूपाने स्थापित हो’ आणि ‘सुप्रतिष्ठित मुहूर्त’, असा आवाज आला अन् परात्पर गुरु डॉक्टरांनी देवीच्या मूर्तीखालची तार ओढली. त्या वेळी मला सिंहासनारूढ झालेले छत्रपती शिवाजी महाराज डोळ्यांसमोर दिसले. मी कृतज्ञता व्यक्त करतांना तुळजापूर येथील साधक श्री. अमित कदम यांनी भ्रमणभाष करून सांगितले, ‘‘मी भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठा स्थापनविधी मुहूर्ताच्या वेळी मंदिरात (तुळजापूरच्या श्री भवानीदेवीच्या मंदिरात) जाऊन देवीची ओटी भरली आणि हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना केली.’’

हे सर्व प्रसंग एकामागोमाग घडत होते. त्यामुळे ‘हे सर्व ईश्वर नियोजित आहे’, असे वाटले. ही अनुभूती मी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताईंना सांगितल्यावर त्यांनाही पुष्कळ आनंद झाला.

प.पू. गुरुदेव, श्री भवानीदेवी आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या चरणी कृतज्ञता !’

– सौ. साक्षी जोशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक