कठीण प्रसंगाला स्थिर राहून सामोरे जाणार्‍या आंजर्ले (जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती शुभांगी गुहागरकर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

कठीण प्रसंगाला स्थिर राहून सामोरे जाणार्‍या आंजर्ले (तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी) येथील श्रीमती शुभांगी गुहागरकर (वय ७५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्रीमती शुभांगी सुरेश गुहागरकरआजी यांचा सत्कार करतांना श्री. महेंद्र चाळके

दापोली, १० ऑक्टोबर (वार्ता.) – तालुक्यातील आंजर्ले येथील श्रीमती शुभांगी सुरेश गुहागरकरआजी ‘देवळात जाणे, शिवलीलामृताचा ११ वा अध्याय वाचणे, पारायण करणे आणि नामजप करणे’, अशी साधना करत आहेत. देवावर श्रद्धा ठेवून त्यांनी जीवनात आलेल्या अनेक कठीण प्रसंगांवर मात केली आहे. आजी सर्वांशीच प्रेमाने वागतात. इतरांना अडचणींमध्ये साहाय्य करतात. अशा गुहागरकरआजींची गुरुदेवांच्या कृपेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी झाली आहे, अशी आनंदवार्ता सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी ७ ऑक्टोबर २०२१ या दिवशी एका अनौपचारिक कार्यक्रमात भ्रमणभाषद्वारे दिली. या आनंदवार्तेमुळे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आणि भ्रमणभाषद्वारे जोडलेल्या साधकांची भावजागृती होऊन त्यांची परात्पर गुरुदेवांच्या चरणी अन् श्री दुर्गादेवीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अधिवक्त्या (सौ.) अपर्णा कुलकर्णी यांनी केले. श्रीमती गुहागरकरआजींचा सत्कार ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. महेंद्र चाळके यांनी श्रीकृष्णाचे छायाचित्र देऊन केला.

संतांच्या कृपेमुळेच आध्यात्मिक पातळी गाठू शकले ! – श्रीमती शुभांगी गुहागरकर

कृतज्ञताभाव दाटून आल्यामुळे गुहागरकरआजींना मनोगत व्यक्त करतांना काय बोलावे ? हे सुचत नव्हते. नंतर मनोगत व्यक्त करतांना त्या म्हणाल्या की, प.पू. डॉक्टर आठवले, स्वामी समर्थ आणि प.पू. काका महाराज यांच्या चरणी कृतज्ञता ! संतांच्या कृपेमुळेच मी माझ्या आयुष्यात आलेल्या अडचणींना सामोरे जाऊ शकले आणि आध्यात्मिक पातळी गाठू शकले.

सौ. मनाली भाटकर, रामनाथी, गोवा (श्रीमती गुहागरकरआजींची मुलगी)

आईने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सद्गुरु सत्यवानदादांनी सांगितल्यावर परात्पर गुरुदेवांप्रती अपार कृतज्ञता वाटली. त्यांच्याच कृपेने आजचा हा क्षण पाहू शकलो त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटी-कोटी कृतज्ञता ! गुरुदेवांनी मला अशी आई दिली त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञ आहे. तिच्यातील हे गुण माझ्यामध्येही यावेत, अशी श्री गुरुचरणी प्रार्थना !

श्री. मिलिंद सुरेश गुहागरकर, सावर्डे, चिपळूण (श्रीमती गुहागरकरआजींचा मोठा मुलगा)

आईची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याचे ऐकून अत्यानंद झाला. देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. इतरांसाठी सतत झटणारी, सतत इतरांचा विचार करणारी आणि देवावर अढळ श्रद्धा असणारी आई आम्हाला देवाने दिली, त्याबद्दल देवाच्या चरणी कृतज्ञता !

सौ. माधवी मिलिंद गुहागरकर, सावर्डे, चिपळूण (श्रीमती गुहागरकरआजींची मोठी सून)

घरातील चैतन्याचा वटवृक्ष म्हणजे आमच्या आई. आई त्यांच्या सहवासातील सर्वांशी प्रेमाने वागतात, स्वत:चा विचार न करता इतरांना सर्वस्व देणे, स्वत:चा क्षीण न दाखवता सतत झटत रहाणे, हे गुण त्यांच्या अंगी आहेत.

श्री. प्रशांत सुरेश गुहागरकर (श्रीमती गुहागरकरआजींचा सर्वांत लहान मुलगा)

आईचा स्वभाव खूप प्रेमळ आहे; पण तितकीच ती शिस्तप्रियही आहे. आईने कुटुंबासाठी पुष्कळ कष्ट केले; म्हणूनच आज आम्ही हे दिवस पाहू शकलो. आईचे सतत नामस्मरण चालू असते. आईची आध्यात्मिक उन्नती झाल्याचे सांगितल्यावर पुष्कळ भरून आले. प.पू. डॉक्टरांच्या कृपेनेच हे शक्य झाले. याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची कु. स्नेहा प्रशांत गुहागरकर (श्रीमती गुहागरकरआजींची नात)

आजीने आमच्यावर उत्तम संस्कार केले, आम्हाला व्यवहारज्ञान शिकवले, वेळप्रसंगी चूक दाखवून दिली. अध्यात्माची गोडी लावली. आजीचा स्वभाव प्रेमळ आहे. तिच्यात चिकाटी, धैर्य, आत्मविश्वास, सेवाभावी वृत्ती, नि:स्वार्थी वृत्ती, देवावर अपार श्रद्धा असे अनेक गुण आहे. आजी उत्तम शिक्षिका होती आणि उत्तम गृहिणी आहे. तिच्याकडून आम्ही सर्वच जण प्रत्येक वेळी काही ना काही शिकत असतो.

सौ. वैदेही प्रशांत गुहागरकर (श्रीमती गुहागरकरआजींची धाकटी सून)

आईंना कपडे, दागिने अशा कोणत्याही गोष्टींचा मोह नाही. त्यांना साधेपणाने रहायला आवडते. आई प्रत्येकच गोष्टीचा योग्य विनियोग करतात. जीवनात आलेल्या अनेक प्रसंगांमध्ये देवावरील त्यांची श्रद्धा कधीच ढळली नाही. त्या स्थिर होत्या.

श्री. राजेंद्र भाटकर, गोवा (श्रीमती गुहागरकरआजींचे जावई)

पत्नी सौ. मनालीने सासूबाईंविषयीची लिहिलेली सूत्रे मला वाचायला दिली तेव्हा सासूबाईंची आध्यात्मिक प्रगती झाली आहे, असे वाटत होते. घटस्थापनेच्या दिवशी त्यांची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्याचे कळल्यावर त्यांच्यामध्ये देवीतत्त्व असल्यामुळे आणि त्या पूर्वी श्री दुर्गादेवीच्या मंदिरात प्रतिदिन जात असल्याने त्याच दिवशी पातळी घोषित केली असे वाटले.

श्री. महेंद्र चाळके, लोटे

आजींकडे पाहून पुष्कळ आनंद जाणवतो, उत्साह जाणवतो. आजी सतत ईश्वराच्या अनुसंधानात आहेत, असे वाटते.

सौ. अपर्णा करंबेळकर, दापोली

आजोबांचे निधन झाल्यावर आम्ही ५-६ दिवसांनी आजींना भेटायला गेलो होतो. त्या वेळी आजींचा चेहरा पुष्कळ स्थिर जाणवत होता. घरामध्ये पुष्कळ शांतता जाणवत होती. सत्काराअगोदर आजींना पाहिले असता भावजागृती झाली.