चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

सिंधुदुर्गवासियांसह कोकणवासियांचे स्वप्न सत्यात उतरले !

विमानतळाच्या उद्घाटन समारंभात दीपप्रज्वलन करतांना मुख्यमंत्री ठाकरे आणि अन्य मान्यवर

कुडाळ – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’चे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते, तसेच केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या ‘ऑनलाईन’ सहभागासह केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत ९ ऑक्टोबरला मोठ्या थाटात उद्घाटन झाले. या वेळी मान्यवरांनी समयोचित भाषणे केली.

विमानतळावर उतरलेले पहिले विमान

भूसंपादनापासून अनेक अडचणी, आरोप-प्रत्यारोप, विरोध यांना सामोरे जात २० वर्षांनंतर सिंधुदुर्गवासियांसह कोकणवासियांचे विमानतळाचे स्वप्न चिपी येथील ‘सिंधुदुर्ग विमानतळा’च्या रूपात सत्यात उतरले. या विमानतळाने देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. या विमानतळावर उतरलेल्या पहिल्या विमानातून आलेल्या ७० प्रवाशांचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्वागत केले.

सिंधुदुर्ग विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करूया ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे

या वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, ‘‘सिंधुदुर्ग विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया. या विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणचा कायापालट होणार आहे.’’ या विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देण्यासह विमानतळाच्या परिसरात हेलिकॉप्टरची सुविधा उपलब्ध करून द्या, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केली.

कोकणच्या नव्या इतिहासाला प्रारंभ ! – केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया

या वेळी मराठीतून भाषण करतांना केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले, ‘‘हे केवळ विमानतळाचे उद्घाटन नसून कोकणच्या नव्या इतिहासाचा प्रारंभ आहे. येत्या ५ वर्षांत येथे प्रतिदिन २० ते २५ विमाने उतरली पाहिजेत. यासाठी माझा विभाग निश्चित काम करेल.’’

विमानतळाला विरोध करणार्‍यांची उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती पाहून आश्चर्य वाटते ! – नारायण राणे, केंद्रीय मंत्री

नारायण राणे

या वेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, ‘‘विमानतळाचे उद्घाटन होणे हा माझ्या आयुष्यातील चांगला क्षण आहे. आतापर्यंत मी जो जिल्ह्याचा विकास केला, तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच. ‘आम्हाला विमानतळ नको’ म्हणून आंदोलन करणार्‍यांना आज विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात मंचावर पाहून आश्चर्य वाटते.’’

केंद्रीय मंत्री राणे यांच्या टीकेला मुख्यमंत्री ठाकरे यांचे उत्तर

या कार्यक्रमात भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर उपरोधिक टीका केली, तसेच राणे समर्थकांनी कार्यक्रम स्थळाच्या बाहेर घोषणाबाजी केली. हे सूत्र पकडून मुख्यमंत्री ठाकरे नारायण राणे यांचे नाव न घेता म्हणाले, ‘‘विमानतळाच्या उद्घाटनाचा आजचा क्षण हा आदळआपट करण्याचा नाही, तर आनंद व्यक्त करण्याचा आहे. कोकणच्या मातीत बाभुळ आणि आंबे ही दोन्ही झाडे उगवतात. बाभुळ निरूपयोगी असले, तरी भूमी त्यालाही सांभाळते. त्यात मातीचा काय दोष ? सिंधुदुर्ग किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे, नाहीतर कुणीतरी म्हणेल की, तो किल्लाही मीच बांधला. चांगल्या कार्यक्रमाला गालबोट लागू नये; म्हणून एक ‘काळे तीट’ असावे लागते, तसेच काही लोक आज या ठिकाणी आहेत.’’