पू. तनुजा ठाकूर यांचे केस गळण्यामागील कारणे, स्वतःचे केस कापण्याच्या त्यांच्या कृतीला ‘मौनीबाबां’नी दिलेली पुष्टी आणि त्यांना संतांच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

पू. तनुजा ठाकूर यांचे केस गळण्यामागील कारणे, स्वतःचे केस कापण्याच्या त्यांच्या कृतीला ‘मौनीबाबां’नी दिलेली पुष्टी आणि पू. तनुजा ठाकूर यांचे केस गळणे न्यून झाल्याने त्यांना संतांच्या संकल्पाची आलेली प्रचीती !

‘कांदळी (जिल्हा पुणे) येथे ‘मौनीबाबा’ नावाचे एक संत आहेत. त्यांनी अनेक वर्षे मौन पाळून साधना केली आहे. त्यामुळे लोक त्यांना ‘मौनीबाबा’ असे म्हणतात. सध्या ते मौनात नसतात; परंतु अनेक वर्षे न बोलल्यामुळे आता ते १ – २ वाक्येच बोलू शकतात आणि उर्वरित सूत्रे ते लिहून सांगतात.

पू. तनुजा ठाकूर

१. मौनीबाबांचे दर्शन घेऊन परततांना त्यांनी स्वतः होऊन पू. तनुजा ठाकूर यांना खांद्यापर्यंत केस कापण्यास सांगणे आणि २ वर्षांपासून केस पुष्कळ गळत असल्याने पू. तनुजा ठाकूर यांनी ५ इंच लांबीचे केस अगोदरच कापलेले असणे

आम्ही डिसेंबर २०१८ मध्ये मौनीबाबांचे दर्शन घेण्यासाठी कांदळीला गेलो होतो. त्यांचे दर्शन आणि सत्संग झाल्यावर आम्ही जाऊ लागलो. तेव्हा त्यांनी स्वतः होऊन मला माझे केस खांद्यापर्यंत कापण्यास सांगितले. तेथे जाण्यापूर्वी मी माझे केस जवळ जवळ ५ इंच कापले होते; कारण मागील २ वर्षांपासून ते पुष्कळ गळत होते. मागील ३ मासांत तर माझे केस आणखी अधिक प्रमाणात गळले होते. सर्व उपाय करूनही माझे केस गळण्ो थांबले नव्हते. तेव्हा मी ‘केस थोडे कापून पहावेत’, असा विचार केला.

२. पू. तनुजा ठाकूर यांनी केसांची सर्व काळजी घेऊनही त्यांचे केस आपोआप गळून पडणे आणि ईश्वराच्या आज्ञेनुसार त्यांनी मागील २ वर्षांपासून गळलेले केस सांभाळून ठेवलेले असणे

खरेतर मी कधीच माझे केस कापत नाही. माझे केस नेहमीच लांबसडक आणि दाटच आहेत; परंतु मागील दोन वर्षांपासून ते पुष्कळ गळत आहेत. ईश्वराच्या आज्ञेनुसार मी मागील २ वर्षांपासून माझे गळलेले केस सांभाळून ठेवत आहे. मी एका वस्त्रावरच केस विंचरते आणि खाली पडलेले केस गोळा करून एका पिशवीत ठेवते.

माझ्या खोलीत, अंथरुणावर आणि स्नान करतांना केस आपोआपच गळून पडतात. माझे केस लांबलचक असल्यामुळे मी त्यांना नियमित तेल लावते. मी रासायनिक ‘शँपू’ इत्यादी काही वापरत नाही. सर्वसामान्यपणे केसांची जी काळजी घ्यायला पाहिजे, ती घेण्याचा प्रयत्न करते.

३. केस कापण्याच्या कृतीला मौनीबाबांनी अनुमोदन देणे आणि ‘स्वतःची सामान्य कृतीही ईश्वरप्रेरितच आहे’, असे वाटणे

‘माझे केस गळणे थांबावे’, या उद्देशाने मी ते थोडे कापले होते आणि माझ्या त्या कृतीला पुष्टी देण्यासाठी मौनीबाबांनी आणखी केस कापायला सांगितले. ते म्हणाले, ‘‘एकदाच खांद्यापर्यंत केस कापा आणि नंतर वाढवा !’’ अशा प्रकारे माझ्या केस कापण्याच्या कृतीला मौनीबाबांनी अनुमोदन दिले. त्यामुळे मला वाटले, ‘मी ही सामान्य कृती केली होती, तीसुद्धा ईश्वरप्रेरितच होती.’

४. पू. तनुजा ठाकूर यांचे केस गळण्यामागील कारणे

४ अ. पू. तनुजा ठाकूर यांचा देह समष्टीशी एकरूप होत असल्याने समष्टीला होणारे त्रास त्यांनाही काही प्रमाणात होत असणे : वास्तविक ‘केसांना तेल न लावणे किंवा अनेक प्रकारच्या रासायनिक द्रव्यांचा वापर करणे’, यांमुळे लोकांमध्ये केसांच्या समस्या निर्माण होतात. अलीकडेच मला माझ्या केसांची समस्या निर्माण झाली आहे, नाहीतर मला अशी समस्या कधीच नव्हती; केवळ हवामानात पालट होतांना माझे केस गळायचे, जी सर्वसामान्य गोष्ट आहे. एकदा भगवंताने मला सांगितले, ‘माझा देह समष्टीशी एकरूप होत आहे.’ ‘त्यामुळे समष्टीला होणारे त्रास मलाही काही प्रमाणात होत आहेत’, याची मला प्रचीती येत आहे. केस गळणे, हे केवळ त्याचे एक उदाहरण आहे.

४ आ. केस गळण्याची मागील २ वर्षांपासूनची कारणे आणि त्यांचे प्रमाण : मागील २ वर्षांपासून माझे केस गळण्यामागे ४० टक्के शारीरिक त्रास आणि ६० टक्के आध्यात्मिक त्रास ही कारणे आहेत. आध्यात्मिक त्रासातही १० टक्के व्यष्टी आणि ५० टक्के समष्टी कारण यांमुळे हा त्रास होत आहे.

४ इ. पू. तनुजा ठाकूर यांचा समष्टी आध्यात्मिक त्रास वाढल्याने मौनीबाबांना त्यांना उपाय सांगावा लागणे : मागील ३ मासांपासून आध्यात्मिक कारणांमुळे होणार्‍या त्रासाच्या टक्केवारीत वाढ होऊन ती ६० टक्क्यांवरून ८० टक्के झाली आहे. यामध्ये समष्टी त्रासाचा भाग ७५ टक्के होता. त्यामुळे मौनीबाबांना मला उपाय सांगावा लागला.

५. मौनीबाबांनी पू. तनुजा ठाकूर यांना केस कापावयास सांगितल्यावर त्यांचे केस गळण्याचे प्रमाण न्यून झाल्याने ‘संतांचा संकल्प अधिक परिणामकारक कार्य करतो’, हे सिद्ध होणे

मी स्वतःहून केस कापल्यानंतर ते गळण्याच्या प्रमाणात २५ टक्के एवढीच सुधारणा झाली होती आणि मौनीबाबांनी मला केस कापावयास सांगितल्यावर त्यात ५० टक्के आणखी सुधारणा झाली. यावरून ‘संतांचा संकल्प कसे कार्य करतो ?’, हे सिद्ध होते. संत सर्वज्ञ असतात. मी त्यांना माझ्या केस गळण्याविषयी काहीच सांगितले नव्हते आणि त्यांना ‘मला लांबसडक केस आवडतात’, हेही ठाऊक होते. त्यामुळे ते म्हणाले, ‘‘केवळ एकदाच खांद्यापर्यंत केस कापून नंतर ते वाढवायचे !’’

– पू. तनुजा ठाकूर (साभार : मासिक, ‘वैदिक उपासना’, डिसेंबर २०१८- जानेवारी २०१९)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक