७ ऑक्टोबरपासून कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात ‘ई-दर्शन पास’ असलेल्यांनाच दर्शन मिळणार !

श्री महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

कोल्हापूर, ५ ऑक्टोबर (वार्ता.) – नवरात्रीत पहिल्या दिवशी म्हणजे ७ ऑक्टोबरपासून साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेले श्री महालक्ष्मी मंदिर भाविकांसाठी खुले होत आहे. श्री महालक्ष्मी मंदिरात केवळ ‘ई-दर्शन पास’ असलेल्यांना दर्शन मिळणार आहे. ७ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत मंदिर भाविकांसाठी सकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले रहाणार आहे. दर्शनपास हे www.mahalaxmikolhapur.com या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्यासाठी आधारकार्ड क्रमांक, ‘ई-मेल’ पत्ता आणि भ्रमणभाष क्रमांक आवश्यक आहे. एका वेळी एका व्यक्तीसमवेत कुटुंबातील ३ सदस्य एकत्रित नोंद करू शकतात. या ‘लिंक’वर भाविकांना ६ ऑक्टोबरला सकाळी ११ वाजल्यापासून नोंदणी करता येणार आहे, नोंद केल्यावर प्राप्त झालेला ‘क्यू आर् कोड’ प्रवेशमार्गावर दाखवावा लागेल, अशी माहिती देवस्थान समितीच्या वतीने देण्यात आली आहे.

१. महाद्वार द्वाराजवळ भाविकांना मुख दर्शनाची व्यवस्था करण्यात येणार आहे.

२. मंदिरातील सर्व धार्मिक कार्यक्रम मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत होणार असून १० ऑक्टोबर या दिवशी पंचमीच्या निमित्ताने पालखी त्र्यंबोलीदेवीकडे गाडीतून जाणार आहे.

३. १३ ऑक्टोबर या दिवशी होणारी नगर प्रदक्षिणा वाहनातून करण्यात येणार आहे.

४. शहरातील १० प्रमुख ठिकाणी ‘एल्.ई.डी. स्क्रीन’ लावण्यात येणार असून त्याद्वारे भाविकांना दर्शन घेता येईल.

५. याचप्रकारे जोतिबा येथेही ‘ई-दर्शन’ पास www.shreejyotiba.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

पलूस – पलूसचे साक्षात्कारी संत श्री समर्थ सद्गुरु धोंडीराज महाराज यांचे समाधी मंदिर ७ ऑक्टोबरपासून भाविकांना दर्शनासाठी खुले होत असून कोरोना विषयक सर्व नियम पाळून भाविकांना समाधी मंदिराचे दर्शन देण्यात येईल, अशी माहिती मंदिराचे सेवाधारी व्यवस्थापक श्री. कुमार रायाजी पाटील यांनी दिली.