सरकारी आस्थापने नफ्यात चालवता न येण्याला आतापर्यंत देशावर राज्य करणारे सर्वपक्षीय शासनकर्ते उत्तरदायी आहेत, हे भारताला लज्जास्पद आहे ! एक आस्थापन नफ्यात चालवू न शकणार्या आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी देशाचा कारभार कसा चालवला असेल ?, हे लक्षात येते ! – संपादक
मुंबई – सरकारच्या मालकीचे ‘एअर इंडिया’ आस्थापन ‘टाटा सन्स’ हे आस्थापन विकत घेणार आहे. ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेकडून ही माहिती देण्यात आली आहे. अद्याप ‘एअर इंडिया’ किंवा ‘टाटा ग्रुप’ यांनी याविषयी अधिकृत घोषणा केलेली नाही.
वर्ष १९३२ मध्ये जे.आर्.डी. टाटा यांनी ‘टाटा एअरलाइन्स’ची स्थापना केली होती. वर्ष १९४६ मध्ये ‘टाटा एअरलाइन्स’चे नामकरण ‘एअर इंडिया लिमिटेड’ असे करण्यात आले. वर्ष १९४७ मध्ये भारत सरकारने ‘एअर इंडिया लिमिटेड’चे ४९ टक्के भाग खरेदी केले. वर्ष १९५३ मध्ये ‘एअर इंडिया लिमिटेड’चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. त्यानंतर आता इतक्या वर्षांनी ‘टाटा ग्रुप’ ‘एअर इंडिया’ पुन्हा स्वतःच्या कह्यात घेत आहे. ‘ब्लुमबर्ग’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ‘एअर इंडिया’साठी ‘टाटा ग्रुप’ आणि ‘स्पाइसजेट’ या आस्थापनांनी बोली लावली होती. वर्ष २०१९ – २० मध्ये ‘एअर इंडिया’वर ३८ सहस्र ३६६.३९ कोटी रुपये इतके कर्ज होते. मार्च २०२१ मध्ये ‘एअर इंडिया’ला १० सहस्र कोटी रुपयांची हानी सोसावी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा आर्थिक हानीचा बोजा ‘टाटा ग्रुप’ला उचलावा लागणार आहे.