संपादकीय
|
कायदा-सुव्यवस्थेचे रक्षक, तसेच ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय ।’ हे विभागाचे ब्रीदवाक्य असणारे पोलीस ! एकेकाळी ‘पोलीस’ हा शब्द ऐकताच नागरिकांना आधार वाटायचा, दिलासा मिळायचा, संरक्षणाची निश्चिती असायची; कारण पोलीस त्यांची भूमिका आणि कर्तव्य चोख बजावत होते. त्यामुळे नागरिकांचे जीवन काही प्रमाणात तरी सुरक्षित होते; पण ‘सध्या पोलिसांच्या या कर्तव्यनिष्ठेला ग्रहणच लागले आहे कि काय ?’, असा प्रश्न पडतो. स्वतःचे दायित्व खुंटीला टांगून मनमानी करण्याचे कामच पोलिसांकडून होतांना आढळते. यात केवळ मनमानीच असते, असे नव्हे, तर उद्दामपणा, मग्रुरी, पक्षपातीपणा, हिंसकता, भ्रष्टाचारी आणि अत्याचारी वृत्ती ठासून भरलेली असते. त्यामुळे ‘समाजरक्षण होणे तर दूरच, उलट समाजाला भयाच्या दरीत लोटण्यासाठीच आजचे पोलीस कटीबद्ध आहेत आणि त्यासाठीच ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत असावेत’, असे प्रकर्षाने वाटते. उत्तरप्रदेश येथे घडलेली घटना या सर्वच गोष्टींची पुष्टी देते.
भक्षक पोलीस !
कानपूर (उत्तरप्रदेश) येथील ३६ वर्षीय व्यावसायिक मनीष गुप्ता गोरखपूर येथे फिरायला गेले. तेथे पोलिसांनी त्यांना ते बेशुद्ध पडतील, इतकी अमानुष मारहाण केली. यात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतरही पोलिसांनी दीड घंट्यापर्यंत गुप्ता यांचा मृतदेह लपवून ठेवला होता. अशा स्वरूपाची घटना प्रथमच घडली आहे, असे नाही; कारण याआधीही पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत. येथे उदाहरणे न पहाता पोलिसांची भूमिका विचाराधीन घेणे आवश्यक ठरेल. एखाद्या निष्पापाला पोलीस इतकी मारहाण करूच कशी शकतात ? त्यांना सर्व अधिकार दिलेले असले, तरी मारहाणीचे इतके टोक का गाठले जावे ? याचा गांभीर्याने विचार करायला हवा. पोलिसांनी नागरिकांचे रक्षण करायचे असते; पण बर्याचदा पोलिसांकडूनच कित्येक हत्या होत आहेत, हे वास्तव नाकारून चालणार नाही. खरेतर पोलिसांना एखाद्याची हत्या करण्याचा अधिकारच नाही. तरीही असे प्रकार होतात. त्यामुळे याच्या मुळाशी जाऊन त्या त्या प्रकरणात हत्येचे आरोपी ठरलेल्या पोलिसांवर कठोर कारवाई होणेही आवश्यक आहे. जणूकाही स्वतःच्याच हाती सत्ता असल्याप्रमाणे पोलीस वर्तन करत आहेत. हत्येच्या घटना म्हणजे हा प्रकार कर्तव्यभंग आणि शिस्तभंग झाल्यासारखाच आहे. ‘गुन्हेगारांना अभय आणि निष्पापांवर अन्याय’ असे चित्र आज सर्वत्र न्यून-अधिक प्रमाणात दिसून येते. याला कारणीभूत केवळ आणि केवळ पोलीसच आहेत. ‘निष्पापांची हत्या करणारे पोलीस क्रूरतेने वागणार्या आतंकवाद्यांच्या समानच आहेत’, असे जनतेला वाटते.
पोलीस विभागात कार्यरत होत असतांना ध्येय, धोरणे, दायित्व, कर्तव्य पार पाडण्यासाठी वचने घेतली जातात; पण वरील स्वरूपाच्या घटना घडत असतांना, किंबहुना त्यात स्वतःकडूनच दुष्कृत्य केले जात असतांना मग कुठे जाते पोलिसांची सचोटी आणि एकनिष्ठा ? याचा प्रत्येक पोलिसाने विचार करायला हवा. पोलिसांना त्यांचे कार्य चोख बजावता यावे, यासाठी निधी पुरवला जातो; पण या निधीचा स्रोत आहे तो म्हणजे नागरिक. नागरिकांच्या कराचा पैसाच पोलिसांसाठी वापरला जातो; पण तरीही निष्पाप नागरिकांवर हात उगारतांना, त्यांना विनाकारण काठीने बडवतांना, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारतांना पोलिसांना निधीच्या उपकाराची पुसटशीही जाणीव का बरे होत नाही ? कायद्याचे रक्षक म्हणवणारे पोलीसच दायित्वशून्यतेने वागत आहेत. त्यामुळे ‘पोलीस हे जनतेचे मित्र नाहीत’, हे वाक्य ते स्वतःच खरे करत आहेत’, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. न्याय तरी कुणाकडे मागायचा ? पोलिसांना पोलीस भरतीच्या वेळी शारीरिकदृष्ट्या प्रशिक्षित केले जाते; पण सध्याची पोलिसांची स्थिती पहाता त्यांना मानसिकदृष्ट्या, तसेच योग्य-अयोग्य स्वरूपाचे आणि नैतिक मूल्यांचे शिक्षण देणेही अत्यावश्यक आहे. तसे झाल्यास त्यांना कर्तव्य बजावतांना स्वतःच्या उत्तरदायित्वाची जाणीव होईल आणि प्रत्येकच कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले जाईल !
विश्वास संपादन करा !
मनीष गुप्ता यांच्या हत्या प्रकरणानंतर ‘गंभीर गुन्हे करणार्या पोलिसांना बडतर्फ केले जाईल’, अशी चेतावणी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. प्रत्यक्षात बेबंद आणि बेधुंद वृत्तीने वर्दीच्या आडून केल्या जाणार्या हत्येच्या स्वरूपाचे गंभीर गुन्हे पहाता निलंबन अन् बडतर्फ अशी कारवाईसुद्धा पुरेशी नाही. हे त्यांच्यासाठी तर परवलीचेच शब्द झाले आहेत. पोलीस या सगळ्याच्याच पुढे गेलेले आहेत. मनीष गुप्ता यांच्या हत्येनंतर त्यांची पत्नी मीनाक्षी गुप्ता म्हणाल्या, ‘‘जर माझा मुलगा पोलीस होऊ इच्छित असेल, तर मी त्याला पोलीस व्हायला का सांगू ? नागरिकांचे रक्षण करणार्या पोलिसांनीच माझ्या पतीचा जीव घेतला. लोकांना ठार करणे, हे पोलिसांचे काम आहे का ?’’ गुप्ता यांच्या पत्नीची उद्विग्नता आणि पोलिसांविषयीचा रोष, संताप यातून दिसून येतो. ही भूमिका त्यांच्या एकटीचीच नसून समस्त देशवासियांचीच आहे; कारण पोलिसांनी स्वतःच्या कर्तव्याच्या सर्वच मर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्यामुळे अशा पोलिसांवर विश्वास तरी का म्हणून ठेवायचा ? ‘पोलीस आपले रक्षण करतील’, याची निश्चितीच आज नागरिकांना वाटत नाही. ‘रक्षणकर्ते’ नव्हे, तर ‘विश्वासघातकी’ पोलीस अशा शब्दांतच त्यांची सर्वत्र ओळख होत असते. ‘रक्षणकर्ते’ ही ओळख जर पुन्हा मिळवायची असेल, तर पोलिसांना सर्वच स्तरांवर कसोशीने प्रयत्न करावे लागतील. दुष्कृत्ये करण्यापेक्षा सत्कृत्ये घडावीत, यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायला हवी. सद्रक्षण होऊ लागल्यास जनतेकडून पोलिसांना निश्चितच आदर मिळू शकतो आणि पोलिसांची मलीन झालेली प्रतिमा पुन्हा एकदा उंचावण्यास साहाय्य होईल.