चिक्कमगळुरू दत्त पिठामध्ये हिंदु पुजार्‍याची नियुक्ती करा ! – कर्नाटक उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला आदेश

एका हिंदु श्रद्धास्थानाच्या ठिकाणी हिंदु पुजारी नियुक्त करण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागतो, यावरून बहुसंख्य हिंदूंच्या देशात हिंदूंची दुःस्थिती लक्षात येते !  – संपादक

बेंगळुरू (कर्नाटक) – चिक्कमगळुरू जिल्ह्यातील श्रीगुरु दत्तात्रेय स्वामी पिठामध्ये (दत्तपिठामध्ये) हिंदु पुजार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला दिला आहे. वर्ष २०१८ मध्ये एका मौलवीची (इस्लामी धार्मिक नेत्याची) श्री दत्तपिठाचा मुख्य पुजारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

हा निकाल म्हणजे दत्त पिठावर विश्‍वास ठेवणार्‍या हिंदूंना श्री दत्तगुरूंनी दिलेला आशीर्वाद ! – सी.टी. रवि

भाजपचे आमदार सी.टी. रवि

भाजपचे आमदार सी.टी. रवि यांनी दत्तपीठ चळवळीचे नेतृत्व केले होते. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करतांना रवि यांनी ‘ट्विटर’वर प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले, ‘कर्नाटक उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दत्तपिठामध्ये हिंदु पुजारी नेमण्याचे आदेश देणे, हा हिंदूंचा मोठा विजय आहे.

न्यायमूर्ती नागमोहन दास समितीचा पक्षपाती अहवाल फेटाळण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे मी स्वागत करतो. अशा प्रकरणामध्ये संघर्ष करणार्‍या हिंदूंसाठी ही एक महत्त्वाची घटना आहे. दत्तपिठावर विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी हा श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे. या निकालामुळे जनतेमध्ये न्यायव्यवस्थेविषयी आदर वृद्धींगत झाला आहे. मंदिरामध्ये धार्मिक विधी करण्यासाठी मौलवीची नियुक्ती करणे अयोग्य होते. न्याय दिला गेला आहे आणि सत्य नेहमीच जिंकते.’

काय आहे न्यायालयीन प्रकरण ?

वर्ष २०१८ मध्ये काँग्रेसच्या तत्कालीन सिद्धरामय्या सरकारने दत्तपिठाला धर्मादाय विभागाच्या नियंत्रणाखाली आणले होते. काँग्रेस सरकारच्या या खेळीला त्या काळी विरोधी पक्ष असणार्‍या भाजपने विरोध केला होता. त्यावेळी भाजपने ‘हा सरकारचा राज्यातील अल्पसंख्यांकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न आहे. एखाद्या मशिदीमध्ये धार्मिक विधी करण्यासाठी हिंदु पुजारी नेमण्याचे धाडस सिद्धरामय्या करतील का ?’, असा प्रश्न उपस्थित केला होता. भाजपने या प्रकरणी कायदेशीर लढा देण्यात येईल, असेही सांगितले होते.

दत्तपिठाचा इतिहास

दत्तपीठ हे ४ सहस्र फूट उंचीवर असलेले हिंदूंचे धार्मिक स्थळ आहे. या डोंगरावर असलेल्या गुहेमध्ये भगवान दत्तात्रेयांनी तपश्चर्या केली होती. त्यामुळे या क्षेत्राला ‘दत्तपीठ’ असे म्हटले जाते. या ठिकाणी श्री दत्तगुरूंच्या पादुका आहेत. १६ व्या शतकापर्यंत येथे हिंदु पद्धतीने पूजा-अर्चा होत असल्याच्या नोंदी आहेत. त्यानंतर तेथे बाबा बुडन नावाचा फकीर रहात होता. क्रूर इस्लामी आक्रमक टिपू सुलतान याने म्हैसुरू कह्यात घेतल्यानंतर दत्तपिठाचे इस्लामीकरण करण्यात आले. टिपू सुलतानने या ठिकाणाची देखभाल करण्यासाठी मुसलमान कुटुंबाची नियुक्ती केली. त्यानंतर येथे कबरी बांधण्यात आल्या. या जागेचे बाबा बुडनगिरी दर्गा असे नामकरण करण्यात आले. या जागेवर धर्मांध त्यांचा हक्क सांगत आहेत. हे धार्मिक स्थळ हिंदूंना मिळावे, यासाठी हिंदू वैध मार्गाने लढा देत आहेत.

दत्तपिठात त्वरित हिंदु पुजार्‍याची नेमणूक करून ते ‘हिंदु क्षेत्र’ घोषित करा ! – मोहन गौडा, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मोहन गौडा

बेंगळुरू – कर्नाटक राज्यातील तत्कालीन काँग्रेस सरकारने हिंदूंचे धार्मिक अधिकार न्यून करण्यासाठी वर्ष २०१८ मध्ये दत्तपिठाच्या पुजारीपदी मौलवी सैय्यद गौस मोहिद्दीन यांची नेमणूक केली होती. ती उच्च न्यायालयाने रहित करून विद्यमान भाजप राज्य सरकारला हिंदु पुजार्‍याची नेमणूक करण्याचा आदेश दिला आहे. या आदेशाचे हिंदु जनजागृती समिती स्वागत करत आहे. काँग्रेस सरकारने दत्तपीठ मुसलमानांना देण्यासाठी रचलेल्या षड्यंत्राचा पराभव झाला आहे. न्यायालयाच्या आदेशात ‘दत्तपीठ ही ‘वक्फ बोर्डा’ची मालमत्ता नाही, तर ती हिंदु धर्मादाय विभागाची मालमत्ता आहे’, असा स्पष्ट उल्लेख केल्याने दत्तपीठ ‘हिंदु क्षेत्र’ घोषित करावे आणि तिथे हिंदु पद्धतीनुसार त्रिकाल पूजाविधी करण्यासाठी हिंदु पुजार्‍याची त्वरित नेमणूक करावी, अशी मागणीही हिंदु जनजागृती समितीने केली आहे.