५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. देवश्री सुजय बर्गे (वय ९ वर्षे) !

पलूस, जिल्हा सांगली येथील कु. देवश्री सुजय बर्गे (वय ९ वर्षे) हिच्या आत्याला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कु. देवश्री सुजय बर्गे

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

१. जन्मापूर्वी

१ अ. कु. देवश्रीच्या आईला गर्भधारणेनंतर मांसाहार करण्याची इच्छा न होणे : ‘देवश्रीच्या आईला मांसाहार पुष्कळ आवडतो; मात्र गर्भधारणेनंतर तिला मांसाहार करायची इच्छाच झाली नाही. मांसाहार करण्याचा प्रयत्न केल्यावर तिला मळमळून उलटी व्हायची.

१ आ. गर्भारपणात कु. देवश्रीच्या आईने केलेली साधना : देवश्रीच्या आईने गुरुचरित्राचे पारायण केले होते, तसेच ती रामरक्षा आणि मारुतिस्तोत्र नियमित म्हणत असे. ‘पौर्णिमेला दत्ताच्या दर्शनाला औदुंबरला जाणे, लिहून दिलेल्या प्रार्थना नियमित म्हणणे, नामजप करणे’, अशी साधना तिची आई करत होती.

२. जन्मानंतर

कुलदेवतेचा जप कानात सांगितल्यावर त्याला प्रतिसाद देणे : देवश्रीचा जन्म झाल्यावर मी रुग्णालयातच होते. परिचारिकेने बाळाला माझ्याकडे दिल्यावर मी बाळाच्या कानात कुलदेवता आणि दत्तगुरु यांचा नामजप सांगितला. तेव्हा तिने तो कळत असल्यासारखे माझ्याकडे पाहिले.

३. जन्म ते एक वर्ष

वैद्या कु. शिल्पा बर्गे

३ अ. देवतांची चित्रे ओळखणे : देवश्री अष्टदेवतांमधील चित्रे ओळखत असे. ती श्रीकृष्णाचे छोटेसे चित्रही ‘कृष्णबाप्पा’ म्हणून ओळखत असे.

३ आ. सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांच्याकडे लगेच जाणे : देवश्री ६ मासांची असतांना सद्गुरु अनुताई (सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर) आणि सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु (कु.) स्वाती खाडये) आमच्या घरी आल्या होत्या. देवश्री लहान असतांना कुणाही अनोळखी व्यक्तीकडे जात नव्हती; मात्र ती सद्गुरु अनुताईंकडे लगेच गेली आणि त्यांच्या मांडीवर बसली.

३ इ. देवश्री ९ मासांची असतांना आम्ही रामनाथी आश्रमात गेलो होतो. तेथील श्रीकृष्णाचे मोठे चित्र पाहून तिला आनंद झाला.

३ ई. रामनाथी आश्रम पहातांना प्रत्येक ठिकाणी गेल्यावर ती ‘हूं हूं’, असा हुंकार देऊन सर्व जाणून घेत असल्यासारखी प्रतिसाद देत होती.

४. वय १ ते २ वर्षे

४ अ. प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांची छायाचित्रे ओळखणे : ती एक वर्षाची झाल्यावर तिची आई आणि आजी यांच्या समवेत गुरुपौर्णिमा महोत्सवाला आली होती. तिने सभागृहातून आत आल्यावर व्यासपिठावरील प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) छायाचित्र ‘बाबा, बाबा’, असे म्हणत ओळखले. त्याच दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये परात्पर गुरुदेवांचेही एक मोठे छायाचित्र आले होते. ते पाहून ‘परम पूज्य’, असे म्हणत तिने त्या छायाचित्राची पापी घेतली. प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरित्र ग्रंथात त्यांच्या तरुणपणीची छायाचित्रे आहेत. तीही ती ‘बाबा’, असे म्हणून ओळखायची.

५. वय २ ते ३ वर्षे

५ अ. ती तुळशीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’, असा नामजप म्हणत प्रदक्षिणा घालायची. काही वेळा कोणतीतरी वस्तू मध्ये ठेवून नामजप म्हणत तिला प्रदक्षिणा घालायची.

५ आ. देवश्रीला लहानपणापासून माझा लळा आहे. मी घरात प्रवेश करण्याआधीच तिला माझी चाहूल लागायची आणि ती दारातच उभी असायची.

५ इ. परात्पर गुरु डॉक्टरांना भेटण्याची ओढ : जेव्हा मी सेवेनिमित्त बाहेर जायचे, तेव्हा ती मला विचारायची, ‘‘तू कुठे जातेस ?’’ त्यावर मी म्हणायचे, ‘‘परात्पर गुरुदेवांची सेवा करायला जाते.’’ तेव्हा ती म्हणायची, ‘‘तू मला परात्पर गुरु डॉक्टरांकडे कधी घेऊन जाणार आहेस ?’’

६. वय ४ ते ६ वर्षे

६ अ. प्रेमभाव

१. घरातील कुणीही रुग्णाईत असल्यास ती मोठ्या माणसाप्रमाणे त्यांची काळजी घेते. ती त्यांचा हात धरते, त्यांच्याजवळ बसते, तसेच त्यांच्यासाठी प्रार्थना करते. एकदा माझ्या बाबांचा अपघात होऊन त्यांना खरचटले होते, तर ती त्यांच्याजवळ बसून त्यांना नामजप करण्यास सांगत होती आणि स्वतःही करत होती.

२. घरी एखादा पदार्थ केल्यास ती घरी येणार्‍या मुलांना आणि मोठ्या माणसांना खाण्यासाठी आग्रह करते. तिला दिलेला खाऊही ती वाटून खाते.

६ आ. नामजपादी उपाय नियमितपणे करणे : देवश्रीला काही शारिरीक त्रास व्हायला लागल्यास ती मला उपाय करावयास सांगते. ‘मी कोणता नामजप करू ?’, असे विचारून ती नामजप करते. तिला शिकवलेल्या प्रार्थनाही ती नियमित करते. ‘अंघोळ करतांना मीठ-पाण्याचे उपाय करणे; अत्तर, कापूर, विभूती लावणे’, हे उपाय ती नियमित करते.

६ इ. रस्त्यातून जातांना कुठे मंदिर दिसल्यास देवश्री लगेच नमस्कार करते.

७. स्वभावदोष 

एकाग्रता अल्प असणे, भीती वाटणे आणि भावनाशीलता.’ – वैद्या कु. शिल्पा बर्गे (देवश्रीची आत्या), पलूस, जि. सांगली. (ऑगस्ट २०१९)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता