शेतकर्‍यांची बाजू घेतली, तर तुम्ही शहरी नक्षलवादी ! – परिसंवादातील सूर

  • मराठवाडा साहित्य संमेलन

  • ७० टक्के शेतकर्‍यांच्या भूमी राष्ट्रीयीकृत बँकांकडे गहाण आहेत !

संभाजीनगर – ‘आज सरकारची तळी उचलणार्‍यांनाच अर्थतज्ञ म्हणून मानले जात आहे. तोट्यातील शेती फायद्यात आणण्यासाठी काहीच धोरण राबवले जात नाही. शेतकर्‍यांच्या ७० टक्के भूमी राष्ट्रीयीकृत बँकांकडे गहाण ठेवल्या गेल्या आहेत, तर शेतकर्‍यांची बाजू घेणार्‍याला ‘शहरी नक्षलवादी’ विचारांच्या चौकटीचा शिक्का मारला जात आहे’, असा सूर २६ सप्टेंबर या दिवशी येथे आयोजित परिसंवादातून उमटला. ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ‘मराठवाडा साहित्य परिषद’ आणि ‘लोकसंवाद फाऊंडेशन’ यांच्या वतीने यशवंतराव चव्हाण नाट्यगृहातील संत जनाबाई व्यासपिठावर ‘आजचा शेतकरी धोरणकर्त्या राजकारण्यांचा बळी’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी मान्यवरांनी हे विचार व्यक्त केले.

परिसंवादात सहभागी झालेले नाट्यलेखक राजकुमार तांगडे म्हणाले की, सोयाबीनचे दर गडगडतात; परंतु ४ दिवसांत अधिक का गडगडले ?, याची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने (‘सीबीआय’च्या) चौकशी करण्याची आवश्यकता आहे; मात्र एकएकट्या व्यक्तीची चौकशी केली जाते. राजकीय पक्ष गोंधळ उडवून देतात. आपल्याकडे प्रामाणिकपणाचा प्रचंड अभाव आहे. आज जातीच्या पलीकडे जाऊन विवेकाची कास धरण्याची आवश्यकता आहे.

नाट्यलेखक बालाजी इंगळे म्हणाले की, अजून तरी सरकारने शेतकर्‍यांचा आत्महत्येचा अधिकार हिरावून घेतला नाही. याविषयी सरकारचे आभारच मानायला हवे.  सरकारच्या धोरणशून्यतेचा शेतकर्‍यांवर मोठा परिणाम होत आहे. नाट्यलेखक नारायण शिंदे म्हणाले की, स्वातंत्र्यानंतरही शेतकर्‍यांना न्याय मिळेल, असे धोरण नाही. सरकारने सहकारी साखर कारखाने बंद पाडण्याचे धोरण आखले असून तेच कारखाने शासनकर्त्यांची मुले विकत घेतात, अशी टीका केली.