सिंधुदुर्ग – सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा नवीन १४ रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. यातील ११ रुग्णवाहिका जिल्ह्यातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना, तर कणकवली उपजिल्हा रुग्णालयाला १, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला १ आणि पेंडूर ग्रामीण रुग्णालयाला १ रुग्णवाहिका देण्यात येणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी दिली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या माध्यमातून, तसेच पालकमंत्री उदय सामंत, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर आणि स्वत: केलेल्या पाठपुराव्यामुळे या रुग्णवाहिका मिळाल्या आहेत. यापूर्वीही राज्यशासनाच्या माध्यमातून जिल्ह्याला रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. राज्यशासनाकडे केलेल्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालये यांची आवश्यकता ओळखून पुन्हा एकदा नवीन रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.