भगवेकरणाचा बागुलबुवा !

संपादकीय 

  • हिंदुद्वेषापोटी कथित भगवेकरणाची आवई उठवणार्‍यांवर कारवाई व्हायला हवी !
  • भगवेकरणाच्या आरोपांना न जुमानता केंद्रशासनाने राष्ट्रहितैषी निर्णय घ्यावेत, ही अपेक्षा !

एखाद्या विचारधारेचा तर्काधारित प्रतिवाद करता आला नाही की, तिला अपकीर्त करण्यासाठी दुष्प्रचाराचे तंत्र अवलंबले जाते. भारतातील निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि त्यांना पाठीशी घालणारी काँग्रेस यांच्या संदर्भात काहीसे असेच झाले आहे. हिंदुद्वेषाने पछाडलेले निधर्मीवादी ‘हिंदु प्रोपोगंडा’ (प्रचाराचे तंत्र) निर्माण करत असतात, तसेच भगवेकरणाचे कथित आरोप करतात. काँग्रेसचे नेते भगव्या आतंकवादाच्या कपोलकल्पित कहाण्या रचून त्या सांगत फिरत असतात. या सर्वांतील फोलपणा मात्र वारंवार समोर येतो. नुकतीच केरळ उच्च न्यायालयाने लक्षद्वीपच्या शाळांमधील माध्यान्ह भोजनातून मांसाहारी पदार्थ हटवण्याच्या विरोधात निधर्मीवाद्यांनी केलेली याचिका फेटाळली. लक्षद्वीप प्रशासनाने तेथील शाळांमधील माध्यान्ह भोजनातून मांसाहारी पदार्थ हटवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयावरून देशभरातील निधर्मीवाद्यांनी केंद्र सरकारकडून लक्षद्वीपच्या भगवेकरणाचा प्रयत्न चालवला जात असल्याचा आरोप केला होता. केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाने मात्र निधर्मीवाद्यांचे पितळ उघडे पाडले.

मिथ्या आरोपांचे पेव !

केंद्रात राष्ट्रप्रेमी भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर शिक्षणासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात राष्ट्रहितैषी पालट करण्यात आले. अनेक दशके चालू असलेली काँग्रेसची हिरवेकरणाची आणि कथित निधर्मीपणाची परंपरा धोक्यात आली. त्यामुळे बिथरलेल्या निधर्मीवाद्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयांना भगवेकरणाचे लेबल देणे चालू केले. केंद्र सरकारने मोगलधार्जिणा इतिहास पालटून हिंदु राजांचा इतिहास अभ्यासक्रमात समाविष्ट केला, तेव्हा ‘इतिहासाचे भगवेकरण’ चालू असल्याची आवई उठवली गेली. शाळांमधून गीतेचे श्लोक शिकवण्याचा निर्णय घेतल्यावर ‘शिक्षणाचे भगवेकरण’ म्हणून त्यास विरोध करण्यात आला. काही दिवसांपूर्वी भारतीय सैन्याधिकार्‍यांना गीता आणि कौटिल्य अर्थशास्त्र शिकवण्याची शिफारस करण्यात आली होती. याला विरोध करण्यासाठी काँग्रेस लगेचच पुढे सरसावली. ‘सैन्याचे राजकीयीकरण करू नये’, असा कांगावा चालू केला. या कांगाव्याविषयी थोडक्यात सांगायचे झाल्यास पुन्हा एकदा हिंदूंच्या धर्मग्रंथांना म्हणजेच काँग्रेस-निधर्मीवाद्यांच्या भाषेत भगवेकरणाला विरोध केला. तसेच ‘कारगिलचे युद्ध मुसलमान सैनिकांमुळे जिंकले’, असे म्हणून स्वत: मात्र सैन्याला धार्मिक रंग द्यायला काँग्रेसवाले विसरले नाहीत. एकूणच काय, तर देशात सध्या भगवेकरणाच्या आरोपाखाली हिंदुद्वेष राजरोसपणे चालू आहे. मिथ्या आरोपांना पेव फुटले असून त्याद्वारे तरी अल्पसंख्यांकांची मते मिळून गेलेली सत्ता परत मिळते का ? अशी काँग्रेसची धडपड चालू आहे. सत्य इतिहास शिकवणे आणि व्यक्तीचा उत्कर्ष करणारे शिक्षण देणे, याला कुणी भगवेकरण म्हणत असेल, तर तसे म्हणणार्‍यांच्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण होते.

भगवेकरणाची आवई उठवणार्‍यांचा रंग !

भगवेकरणाचा बागुलबुवा निर्माण करणारे निधर्मीवादी आणि काँग्रेस त्यांच्या भूमिकांमधून त्यांच्या निष्ठा कोणत्या रंगाशी आहेत ? हे दाखवून देतात. राजस्थानमध्ये सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने ‘भाजपने इतिहासाचे भगवेकरण केले. आता आम्ही ते सुधारू’, अशी बतावणी केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ‘देशभक्त’ आणि ‘क्रांतीवीर’ असा उल्लेख काढून त्यांचा ‘माफी मागणारे’ असा संतापजनक उल्लेख केला. असे करणार्‍या काँग्रेसने तिचा हिंदुद्वेषी तोंडवळा स्वत:च उघड केला आहे. खरेतर सत्य इतिहास सांगितला न जाणे, हे गांधी-नेहरू यांच्या काळापासूनचे राजकीय षड्यंत्र आहे. धर्मांधता केंद्रस्थानी असणार्‍या कितीतरी घटना देशात घडतात; मात्र निधर्मीवादी आणि काँग्रेसवाले अशा घटनांविषयी कधीच बोलत नाहीत; कारण त्या हिंदूंशी संबंधित नसतात. हिंदु धर्म, भाषा आणि इतिहास यांची इंग्रजांच्या सत्ताकाळातही झाली नव्हती, तेवढी दुर्दशा स्वातंत्र्यानंतर झाली आहे. स्वातंत्र्यानंतर साम्यवादी आणि काँग्रेस यांच्या प्रभावामुळे देशातील शिक्षणामध्ये हिंदु धर्माला त्याज्य ठरवले गेले. हिंदु धर्म आणि त्याची चेतना यांना न्यून लेखायचे अन् इस्लामला वरचढ दाखवायचे, हे धोरण काँग्रेसने स्वीकारले. तेच शिकवण्याच्या दृष्टीकोनातून पाठ्यपुस्तके सिद्ध केली गेली. त्यामुळे समाजात हळूहळू हिंदुविरोधी विचार रुजवले गेले. काँग्रेसच्या शासनकाळात असलेल्या अल्पसंख्यांक शिक्षणमंत्र्यांनी शिक्षणव्यवस्थेत काय काय पालट केले ? याचे संशोधन होणे आवश्यक आहे; कारण त्यांनी भारतियांना भारतीय शिक्षण आणि परंपरा यांपासून वंचित ठेवले. काही वर्षांपूर्वी अलीगड मुस्लीम विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी ‘दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेची व्यक्ती आल्यास वाईट परिणाम होतील’, अशी धमकी दिली होती. एन्.सी.ई.आर्.टी.च्या पुस्तकात ‘मोगल मंदिरांची डागडुजी करत होते’, असा धादांत खोटा इतिहास लिहिण्यात आला आहे. ख्रिस्तीबहुल मिझोराम राज्यात शपथविधीच्या वेळी बायबलमधील पंक्तींचे उच्चारण करण्यात आले होते. या सर्व घटनांचा रंग कोणता ? हे सांगण्यास भगवेकरणाचा कांगावा करणारे पुढे येत नाहीत. अशा वेळी ढोंगी निधर्मीवादी सोयीस्करपणे स्वत:चे रंग पालटतात.

भगव्याचा सन्मान हवा !

‘भगवा’ हा एक पवित्र रंग आहे. श्रीराम, श्रीकृष्ण यांचा विजयध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वकल्याणकारी हिंदवी स्वराज्याचा रंगही भगवाच होता. भगवा रंग हा धर्म, समृद्धी, अस्मिता, वीरता आणि ज्ञान यांचे प्रतीक आहे. अशा श्रेष्ठ भगव्या रंगाचा नेहमी सन्मानच व्हायला हवा. हिंदुद्वेषापोटी जर कुणी या शब्दाचा गैरवापर करत असेल, तर अशांवर हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याविषयी कारवाई करायला हवी. तसेच भगवेकरणाच्या आरोपांच्या आडून इतिहासद्रोह करणार्‍यांवरही कारवाई व्हायला करायला हवी.