महंत नरेंद्र गिरि यांचा गुदमरल्यामुळे मृत्यू

महंत नरेंद्र गिरि

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या ५ डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या शवविच्छेदनानंतरच्या अहवालानुसार, त्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. त्यांच्या गळ्याला गळफासाचे निशाण आणि ‘व्ही’ आकार प्राप्त झाला आहे. यावरून पोलीस आता पुढील अन्वेषण करत आहेत. पोलिसांनी आद्या प्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना अटक करून न्यायालयात उपस्थित केल्यावर दोघांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

महंत नरेंद्र गिरि यांच्या पार्थिवाला देण्यात आली भूसमाधी !

महंत नरेंद्र गिरि यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे पार्थिव साधूंकडे सोपवण्यात आले. त्यानंतर विधीपूर्वक त्यांना प्रयागराज येथील बाघंबरी मठामध्येच भूसमाधी देण्यात आली. तत्पूर्वी त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यांचे पार्थिव गंगानदी किनारी नेऊन तेथे त्यास स्नान घालण्यात आले. त्यानंतर येथील लेटे हनुमानजी मंदिराची प्रदक्षिणा घालण्यात आल्यानंतर अंत्ययात्रा दुपारी मठामध्ये पोचली. यानंतर मोठ्या संख्येने उपस्थित असलेले संत, महंत, साधू यांच्या हस्ते त्यांना भूसमाधी देण्यात आली.