घटनेच्या अन्वेषणासाठी उत्तरप्रदेश पोलिसांकडून विशेष अन्वेषण पथकाची स्थापना
|

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पदरित्या झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी उत्तरप्रदेश पोलिसांनी विशेष अन्वेषण पथक स्थापन केले आहे. पोलिसांनी या मृत्यूविषयी कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणी महंत नरेंद्र गिरि यांचा शिष्य आनंद गिरि याला अटक करण्यात आली आहे, तर येथील लेटे हनुमानजी मंदिराचे पुजारी आद्याप्रसाद तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. या दोघांची नावे महंतांनी मूत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रात होती. आनंद गिरि याच्यावर महंत नरेंद्र गिरि यांचा मानसिक छळ केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या प्रकरणी ८ जणांची ‘लाय डिटेक्टर’ चाचणी (गुन्ह्याच्या प्रकरणात संबंधित आरोपी खरे बोलत आहेत कि खोटे, हे पडताळण्यासाठी केली जाणारी चाचणी) करण्याची शक्यता आहे. यात एका बांधकाम व्यावसायिकाचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी महंत नरेंद्र गिरि यांचा भ्रमणभाष संच जप्त केला असून त्याची पडताळणी करण्यात येणार आहे. मृत्यूपूर्वी महंत नरेंद्र गिरि यांनी भ्रमणभाषवरून चित्रीकरण केल्याचे सांगितले जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘प्रत्येक घटनेची चौकशी करून जो कुणी दोषी असेल, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल’, असे सांगितले.
२१ सप्टेंबरला सकाळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराज येथील बाघंबरी मठात येऊन महंतांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. या वेळी प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी ‘महंतांच्या पार्थिवाचे उद्या (२२ सप्टेंबर या दिवशी) शवविच्छेदन करण्यात येईल आणि त्यानंतर त्यांना समाधी देण्यात येईल’, असे सांगितले.
नरेंद्र गिरि यांना धमकावण्याचा प्रयत्न
नरेंद्र गिरि यांना एका व्हिडिओच्या माध्यमातून अज्ञात व्यक्तीकडून धमकावले जात असल्याचे म्हटले जात आहे. या व्हिडिओमध्ये नेमके काय होते ? याचा छडा लावण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
समाजवादी पक्षाच्या माजी मंत्र्याच्या चौकशीची शक्यता
या प्रकरणात समाजवादी पक्षाच्या मागील सरकारमधील एका मंत्र्याचे नाव समोर येत आहे. या माजी मंत्र्याची चौकशी केली जाण्याची शक्यता आहे. हा माजी मंत्री अनेकदा बाघंबरी मठात महंत नरेंद्र गिरि यांची भेट घेण्यासाठी येत होता. अटक करण्यात आलेला शिष्य आनंद गिरि याचेही या माजी मंत्र्यांशी घनिष्ठ संबंध असल्याचे समजते.
मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रावर संशय
महंत नरेंद्र गिरि यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रावर आनंद गिरि याने संशय व्यक्त केला आहे. त्याने म्हटले की, महंत नरेंद्र गिरि यांना व्यवस्थित लिहिताही येत नव्हते. त्यांचा शिष्य निर्भय द्विवेदी मात्र व्यवस्थितरित्या लिहू शकतो.
मृत्यूच्या दिवशी महंत नरेंद्र गिरि कुणाची तरी वाट पहात होते !
‘मृत्यूच्या दिवशी महंत नरेंद्र गिरि एका व्यक्तीची वाट पाहत होते’, असे निर्भय द्विवेदी याने पोलिसांना सांगितले. ‘नरेंद्र गिरि यांनी २ दिवसांपूर्वी दोरी आणण्यास सांगितली होती’, असे एका सेवकाने पोलिसांना सांगितले. नरेंद्र गिरि यांनी याच दोरीने गळफास लावला, असे या सेवकाने सांगितले.
सीबीआय चौकशी करण्यासाठी न्यायालयात याचिका
महंत नरेंद्र गिरि यांच्या संशयास्पद मृत्यूची सीबीआयद्वारे चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली आहे. याचिकाकर्ते अधिवक्ता सुनील चौधरी यांनी प्रयागराजचे जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना तत्काळ बडतर्फ करण्याची मागणीही केली आहे.
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !