हिंदुविरोधी परिषदेतून आतंकवाद आणि हिंदु धर्म यांचा संबंध जोडून हिंदुद्वेष जगभरात पसरवला जात आहे ! – पंडित सतीश शर्मा, हिंदु तत्त्वज्ञ आणि भारतीय संस्कृतीचे अध्यापक, इंग्लंड 

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुद्वेष्ट्या परिषदेच्या विरोधात जागृती करणारे ‘हिंदुविरोधी प्रचाराचे वैश्विक षड्यंत्र’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष चर्चासत्र

हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी  हिंदु जनजागृती समिती

पंडित सतीश शर्मा

सोलापूर – जगभरात मोठ्या प्रमाणात नरसंहार केलेल्या ख्रिस्ती आणि साम्यवादी यांना त्यांचा खरा इतिहास आता समोर येत असल्याने भय वाटत आहे. युरोप आणि अमेरिका येथील लोक आता योग अन् आयुर्वेद यांचे आचरण करत असून ते हिंदु संस्कृतीकडे आकर्षित होत आहेत. त्यामुळे ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी परिषदेतून हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचण्यात आले. त्यासाठीच त्यांनी अमेरिकेतील ९ सप्टेंबर हा दु:खाचा आणि आतंकवादाला विरोध असणारा दिवस परिषदेसाठी जाणीवपूर्वक निवडला. या कालावधीत हिंदुविरोधी परिषद घेऊन आतंकवाद आणि हिंदु धर्म यांचा संबंध जोडून जगभरात हिंदुद्वेष पसरवला जात आहे. हिंदूंनी संघटितपणे अशा धर्मविरोधी कारवायांना विरोध केल्यास हे षड्यंत्र संपुष्टात येईल. केवळ भारतातील नाही, तर विदेशातील हिंदूंनाही ‘हिंदु आतंकवाद’ या नावाखाली लक्ष्य करून त्यांचे खच्चीकरण करण्यात येत आहे, असे प्रतिपादन इंग्लंड येथील हिंदु तत्त्वज्ञ आणि भारतीय संस्कृतीचे अध्यापक पंडित सतीश शर्मा यांनी केले. हिंदु जनजागृती समिती च्या वतीने १ सप्टेंबर या दिवशी आयोजित ‘हिंदुविरोधी प्रचाराचे वैश्विक षड्यंत्र’ या ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवादात ते बोलत होते.

या परिसंवादात सिडनी (ऑस्ट्रेलिया) येथील विचारवंत डॉ. यदु सिंह, ‘मानुषी’ मासिकाच्या संस्थापक-संपादक आणि प्रसिद्ध लेखिका प्राध्यापिका मधुपूर्णिमा किश्वर, हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्राचे सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे आणि श्री. कार्तिक साळुंके यांनी केले. या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचा ११ सहस्र २४९ जणांनी लाभ घेतला.

भारत सरकारने राजकीय शक्तीचा उपयोग करून हिंदुविरोधी कार्यक्रम रहित करावेत ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हिंदूंनी आता जागतिक स्तरावर संघटित झाले पाहिजे, तसेच भारत सरकारनेही आपल्या राजकीय शक्तीचा उपयोग करून हिंदुविरोधी कार्यक्रम रहित होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. धर्मविरोधी घटनेला पहात रहाणे, म्हणजे त्याला मूकसंमती दर्शवल्याप्रमाणे आहे. त्यामुळे हिंदु धर्माची अपकीर्ती होते, तिथे हिंदूंनी संघटित होऊन त्याचे खंडण करणे आवश्यक आहे. प्रसिद्धीमाध्यमांनीही अशा प्रकारे चालणारे हिंदुविरोधी षड्यंत्र सर्वांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करावेत.

हिंदूंनी संघटितपणे वैचारिक स्तरावर विरोध करायला हवा ! – डॉ. यदु सिंह, सिडनी, ऑस्ट्रेलिया

हिंदुविरोधी परिषदेतून हिंदु धर्माला अपकीर्त करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे !

डॉ. यदु सिंह

१. अमेरिकेतील ‘डिसमेंटलिंग ऑफ ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेचे आयोजक हे हिंदुद्वेषी असून त्यांना अमेरिका आणि कॅनडा येथील विश्वविद्यालयांनी पैसा पुरवला आहे. हिंदूंनी आता खंबीर होऊन त्यांना संघटितपणे वैचारिक स्तरावर विरोध करायला हवा. हिंदु धर्म हा कुणाचीही घृणा करायला कधीच शिकवत नाही, तर तो नेहमी ‘वसुधैव कुटुम्बकम्’ (संपूर्ण पृथ्वी हेच कुटुंब आहे) हीच शिकवण देऊन सर्वांना सामावून घेण्यास शिकवतो.

२. भारतात शाळा किंवा महाविद्यालये येथे हिंदु धर्माविषयी बोलण्यास बंदी आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांला हिंदु धर्माविषयी काहीही माहिती नसते. याउलट अन्य देशांमध्ये त्यांच्या त्यांच्या पंथाची शिकवण दिली जाते. ‘नासा’ या वैज्ञानिक संस्थेतील एका हिंदु मुलीने काढलेल्या स्वत:च्या छायाचित्रात तिच्या मागे देवतांच्या मूर्ती होत्या. यालाही काही हिंदुविरोधी शक्तींनी विरोध केला. यावरून हिंदु धर्मियांना आंतरराष्ट्रीय स्तरावर किती मोठ्या प्रमाणात दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे, हे लक्षात येते.

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी परिषदेला भारतातील राजकीय शक्तींचा पाठिंबा ! – चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

श्री. चेतन राजहंस

१. हिंदुविरोधी शक्ती हे जाणतात की, आचरण किंवा तत्त्वज्ञान यांच्या आधारे हिंदु धर्माला कधीही कलंकित करू शकत नाही. त्यामुळे हिंदुत्व आतंकवादी विचारांचे आहे, जातीयवादी आहे, लैंगिक अत्याचारी आहे, अशा प्रकारे हिंदुत्वाला खोटे दाखवण्याचे षड्यंत्रपूर्वक नाटक ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या परिषदेच्या माध्यमातून रचण्यात आले. ‘हिंदु धर्म चांगला आहे; मात्र हिंदुत्व भयावह आहे. त्यामुळे हिंदुत्व संपुष्टात आणावे’, अशी छद्मी मागणी या परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली. या परिषदेच्या षड्यंत्रामागे भारतातील राजकीय शक्तीचा पाठिंबा असून या कार्यक्रमाला जिहादी शक्तींद्वारे पैसा पुरवला जात आहे.

२. हिंदु धर्मामध्ये मोठ्या प्रमाणात जातीभेद आहे, अशी हिंदु धर्माची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर होत आहे; मात्र विश्वात सर्वांत अधिक जातीभेद मुसलमान पंथामध्ये केला जातो. हिंदु धर्मामध्ये पूर्वीपासून चातुर्वर्णाची व्यवस्था लागू होती; मात्र कलियुगात जातीव्यवस्थेची निर्मिती झाली. तोपर्यंत हिंदु धर्मामध्ये कसलाही जातीभेद नव्हता.

‘भारताच्या उच्चतम ज्ञानपरंपरेच्या तुलनेत आपण मागे आहोत’, असा पाश्चात्त्यांना न्यूनगंड ! – प्राध्यापिका मधु पूर्णिमा किश्वर, प्रसिद्ध लेखिका आणि ‘मानुषी’ मासिकाच्या संस्थापक-संपादक

मधुपूर्णिमा किश्वर

हिंदु धर्माची संस्कृती महान आहे. ‘नासा’ ही वैज्ञानिक संस्था अजूनही हिंदु धर्मातील वेदांकडून शिकण्याचा प्रयत्न करते. ‘भारताच्या उच्चतम पुरातन ज्ञानपरंपरेच्या तुलनेत आपण मागे आहोत’, असा पाश्चात्त्यांना पूर्वीपासूनच न्यूनगंड होता. त्यामुळे त्यांच्याकडून हिंदूंविरोधात घृणा पसरवली जात आहे.

एका समाजाला ‘गझवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण करणे) करायचे आहे, तर दुसर्‍या समाजाला ‘रोम राज्य’ आणायचे आहे, हे आता लपून राहिलेले नाही. त्यामुळे हिंदु धर्माला अपकीर्त करण्याच्या प्रयत्नाला हिंदूंनी विरोध केला पाहिजे.