महोबा (उत्तरप्रदेश) जिल्ह्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितल्याप्रमाणे ‘धर्मांतर हेच राष्ट्रांतर’ आहे. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय स्तरावर धर्मांतरबंदी कायदा करावा, अशी हिंदूंची मागणी आहे. – संपादक

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्याच्या महोबा जिल्ह्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या आशीष जॉन या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला नुकतीच अटक करण्यात आली. जॉन याने धर्मांतर करण्यासाठी संजय द्विवेदी यांना प्रलोभन दिले, तसेच त्यांच्यावर दबाव निर्माण केला. त्यामुळे द्विवेदी यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती.

महोबाच्या पनवाडी भागामध्ये ठाकुरदास मोहल्ला आहे. तेथील संजय द्विवेदी हे काही दिवसांपासून आजारी आहेत. ख्रिस्ती जॉन याने द्विवेदी यांना आजार बरा करणे आणि व्यापारासाठी पैसे देण्याचे प्रलोभन दिले होते. द्विवेदी यांनी तक्रारीमध्ये सांगितले की, त्यांना डोकेदुखीचा आजार आहे. याविषयी आशिष जॉन याला माहिती होती. जॉन याने त्यांना आजार बरा करण्यासाठी ख्रिस्ती धर्म स्वीकरण्यास सांगितले. याविषयी माहिती मिळाल्यानंतर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलिसांना कळवले. त्यानंतर पोलीस तक्रार करण्यात आली. जॉन हा २० वर्षांपूर्वी ख्रिस्ती बनला होता. (जॉनने गेल्या २० वर्षांत किती हिंदूंचे आमिषे दाखवून धर्मांतर केले, याचेही अन्वेषण होणे आवश्यक आहे ! – संपादक)