तेहरान (इराण) – अफगाणिस्तानच्या पंजशीर येथील युद्धामध्ये तालिबानला पाकने उघडपणे साहाय्य केले. पाकचे सैन्याधिकारी यात सहभागी होते. पंजशीरमध्ये जे काही झाले, त्याचा परिणाम पाकला भोगावा लागणार आहे, अशी चेतावणी इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद यांनी दिली आहे.
अफगाणिस्तानमधील स्थिती सुधारण्यासाठी भारत आणि इराण यांनी एकत्र येण्याची आवश्यकता
अहमदीनेजाद पुढे म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये जे काही चालू आहे त्याचा परिणाम जगावर होणार आहे. विशेषकरून इराण, पाकिस्तान, भारत आणि चीन या देशांवर त्याचा परिणाम होणार आहे. अफगाणिस्तानमधील स्थिती सुधारण्यासाठी भारत आणि इराण यांनी एकत्र येण्याची आवश्यकता आहे. राजकीय आणि मानवी सूत्रांच्या आधारे समस्या सोडवण्यासाठी योजना बनवली पाहिजे.
तालिबानला मान्यता देणे लज्जास्पद !
ज्यांनी शस्त्रांच्या आधारे सत्ता प्राप्त केली आहे आणि ज्यांचे कोणतेही धोरण नाही, अशा सरकारला मान्यता देणे लज्जास्पद ठरेल. अशी मान्यता संपूर्ण समाजाला हानी पोचवणार, असेही अहमदीनेजाद यांनी तालिबानच्या सरकारला मान्यता देण्याविषयी सांगितले.