मंदिरे आणि विकास !

संपादकीय 

चैतन्याचे स्रोत असलेल्या मंदिरांच्या संवर्धनासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !

श्रीराममंदिर हे जळगावचे ग्रामदैवत आहे. हिंदूंच्या मनात ग्रामदेवतेविषयी श्रद्धा असते; मात्र या श्रद्धेचे भंजन करत जळगाव महानगरपालिकेने श्रीराममंदिराच्या जवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा घाट घातला आहे. भारतात सार्वजनिक शौचालये नसल्यामुळे लोकांचे हाल होतात. त्यामुळे लोकांच्या सोयीसाठी अधिकाधिक शौचालये बांधण्याविषयी कुणाचे दुमत नसावे; मात्र ते कोणत्या ठिकाणी बांधावे, याविषयी काही निकषांचे अवश्य पालन करावे लागते. मंदिराच्या जवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा विचार तरी आपण कसा करू शकतो ? मंदिरात पूजा-अर्चा, अन्य धार्मिक विधी चालतात. यातून मंदिराचे चैतन्य टिकून रहाते. या मंदिरात दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना हे पावित्र्य आणि चैतन्य यांचा लाभ होतो. त्यामुळे त्याचे पावित्र्य आणि चैतन्य टिकवणे, हे हिंदूंचे कर्तव्य आहेच; मात्र त्याहून अधिक प्रशासन आणि शासनकर्ते यांचेही कर्तव्य आहे. सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था आणि तेथील दुर्गंधीचे साम्राज्य हे सर्वांनाच ज्ञात आहे. त्यामुळे भविष्यात श्रीराममंदिराच्या जवळ शौचालय बांधले, तर तेथे मनःशांतीसाठी येणार्‍या भाविकांचे काय हाल होतील, याचा विचारही न केलेला बरा. जगाचा आध्यात्मिक गुरु असणार्‍या भारतात असे निर्णय घेतले जातात, हे लज्जास्पद !

एखाद्या शहराचा विकास करतांना किंवा तेथे एखादा प्रकल्प राबवतांना लोकांच्या सुविधांचा विचार केला जातो; मात्र त्याही पुढे जाऊन त्या शहरात चांगली स्पंदने कशी निर्माण होतील, ती टिकून कशी रहातील, त्यासाठी काय आवश्यक कृती केली पाहिजे, याचा विचार केला जात नाही. असा विचार करण्याविषयी समाजाला शिकवले जात नाही; कारण आपली धर्मनिरपेक्ष राज्यप्रणाली ! ‘मोठमोठ्या इमारती बांधणे, वेगवेगळ्या सोयी उपलब्ध करून देणे, शहरे ‘चकाचक’ करणे म्हणजे विकास’ अशी ढोबळ संकल्पना समोर ठेवून प्रशासन किंवा सरकारी यंत्रणा काम करत असतात. त्यामुळे ‘आध्यात्मिक अंगाने विकास करू शकतो’, याचा विचार या यंत्रणा करतांना दिसत नाहीत. त्याचाच परिपाक म्हणजे त्यांच्याकडून मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्यासारखा धर्मद्रोही निर्णय घेतला जातो. अशा वेळी महानगरपालिका प्रशासनाच्या या निर्णयाचा वैध मार्गाने विरोध करणे, ही एक कृती झाली; मात्र ती परिपूर्ण नाही. अलीकडे तमिळनाडूमध्येही श्रीथलसायाना पेरूमल या प्राचीन मंदिराच्या शेजारी शौचालये बांधण्याचा घाट घालण्यात आला. यावरून केवळ एकाच जिल्ह्याची किंवा राज्यातील महानगरपालिका नव्हे, तर देशभरातील प्रशासकीय यंत्रणांची हिंदुद्रोही मानसिकता दिसून येते. ही मानसिकता पालटण्यासाठी शिक्षणपद्धतीमध्ये सुधारणा करणे, समाजातील प्रत्येक व्यक्तीला धर्मशिक्षण देणे यांसारखे उपक्रम चालू करावे लागतील. ही पुष्कळ मोठी प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया राबवण्यासाठी प्रशासनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रयत्न करावे लागतील. ती राबवणारे शासनकर्ते मिळण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापनाच अपरिहार्य आहे.