श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीने उत्तर भारतात आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष उपक्रमांना जिज्ञासूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी  हिंदु जनजागृती समिती

देहली – श्रीकृष्ण जन्माष्टमी हा कृष्णभक्तांसाठी एक महत्त्वपूर्ण उत्सव आहे. या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने उत्तर भारतामध्ये ‘ऑनलाईन सामूहिक नामजप आणि सत्संग’ यांचे आयोजन करण्यात आले होते. २७ ऑगस्ट या दिवशी ‘ऑनलाईन’ प्रणालीच्या माध्यमातून प्रारंभ झालेल्या या उपक्रमाची सांगता ३१ ऑगस्ट या दिवशी झाली. या कार्यक्रमाचा लाभ उत्तर भारतातील देहली, हरियाणा, मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील कृष्णभक्त अन् जिज्ञासू यांनी घेतला.

१. प्रतिदिन सकाळी ७ ते ७.३० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमामध्ये भगवान श्रीकृष्णाची वैशिष्ट्ये, श्रीमद्भगवद्गीतेला जीवनामध्ये कसे आचरणात आणायचे ?, भगवान श्रीकृष्णाची उपासना आणि पूजन यांचे शास्त्र, गोपाळकाला करण्यामागील अध्यात्मशास्त्र, भगवान श्रीकृष्णावर करण्यात येणारी टीका आणि त्यावरील खंडण आदी सर्व विषयांवर शास्त्रीय माहिती देण्यात आली.

या कार्यक्रमामध्ये ‘व्याख्याने, पुस्तके, नाटक, चित्रपट, दूरचित्रवाहिन्या आणि उत्पादने यांच्या माध्यमातून देवतांचा अवमान करण्यात येतो, हे थांबवण्यासाठी या सर्वांवर बहिष्कार टाका’, असे आवाहनही करण्यात आले.

क्षणचित्रे

१. कार्यक्रमामध्ये प्रतिदिन १५ मिनिटे सामूहिक नामजप केल्यानंतर उपस्थित जिज्ञासू आणि भाविक यांनी नामजप केल्यामुळे आलेले अनुभव कथन केले.

२. या सत्संगामध्ये सूत्रसंचालन करणे, विषय मांडणे, तांत्रिक सेवा करणे आदी सेवांमध्ये उत्तर भारतातील युवा साधकांनी विशेष सहभाग घेतला.

अभिप्राय

१. श्री. विनोद एकांत, नागपूर – हिंदु जनजागृती समितीच्या प्रयत्नांमुळे मला नामजप सत्संगाला उपस्थित रहाण्याची संधी मिळाली. सकाळच्या वेळी नामजप केल्याने अतिशय चांगले वाटले. तसेच नामजपामुळे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न होते. या कार्यक्रमामुळे नवीन विचार ऐकायला मिळाले आणि व्याख्यान ऐकून पुष्कळ चांगले वाटले.

२. श्री. पन्नालाल मीणा, उदयपूर, राजस्थान – सुखद आत्मीय अनुभव मिळाला.

३. रविशा गुप्ता, जबलपूर, मध्यप्रदेश – नामजप सत्संगाच्या वेळी मी भगवान श्रीकृष्णाशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. मी डोळे बंद करून नामजप करत असतांना मला जाणवले की, कुणीतरी माझ्या समवेत उपस्थित आहे. घरी माझ्याखेरीज कुणीही नसतांना ही अनुभूती मला आली.


सिंगरौली (मध्यप्रदेश) येथील धर्मप्रेमींसाठी ‘श्रीकृष्णाचे पूजन’ या विषयावर ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन

सिंगरौली (मध्यप्रदेश) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ ऑगस्ट या दिवशी येथील धर्मप्रेमींसाठी एक ‘ऑनलाईन’ प्रवचन घेण्यात आले. या वेळी समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी ‘श्रीकृष्णाचे पूजन कसे करावे ?’, या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच भगवान श्रीकृष्णावर होणार्‍या टीकांचे खंडण करण्यात आले. येथील धर्मप्रेमी श्री. शिवनाथप्रसाद मिश्रा यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


मध्यप्रदेश आणि राजस्थान येथील श्रीकृष्णभक्तांसाठी ‘ऑनलाईन’ प्रवचन

जयपूर – सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मध्यप्रदेश अन् राजस्थान येथील श्रीकृष्णभक्तांसाठी २९ ऑगस्ट या दिवशी एका ‘ऑनलाईन’ प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. या वेळी समितीचे श्री. श्रीराम काणे यांनी ‘भगवान श्रीकृष्णाचे पूजन, प्रसाद कसा अर्पण करावा ? आणि भक्तीभाव वाढवण्यासाठी काय करावे ?’, आदींविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमाच्या शेवटी ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’, हा नामजप सामूहिक करण्यात आला. या नामजपामुळे अनेकांनी शांत वाटल्याचे सांगितले.

अभिप्राय

भोपाळ येथील ‘लक्ष्मीनारायण कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी’चे संचालक श्री. अमितबोध उपाध्याय यांनी ‘हा कार्यक्रम हृदयस्पर्शी होता’, अशा शब्दांत कार्यक्रमाविषयीचा अनुभव व्यक्त केला.