देशात हिंदू अल्पसंख्य झाल्यास भारताचे अफगाणिस्तान होईल ! –  भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि

देशातील हिंदू अल्पसंख्य होण्यापूर्वी भारताला हिंदु राष्ट्र घोषित करून येथे समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा, धर्मांतरविरोधी कायदा आदी राष्ट्रहिताचे कायदे भाजप सरकारने करावेत, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि

नवी देहली – भारतात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे लिहिलेली राज्यघटना कायम राहील. हिंदू बहुसंख्य असेपर्यंत सर्वांना समान संधी मिळेल. एकदा का हिंदू अल्पसंख्य झाले, तर गंधारच्या (अफगाणिस्तानच्या) संदर्भात जे झाले, तसे होईल, अशी चेतावणी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि यांनी दिली.

सी.टी. रवि पुढे म्हणाले की,

१. धर्मनिरपेक्षता आणि धार्मिक सहिष्णुता ही हिंदूंची मुख्य धारणा आहे. जोपर्यंत सहिष्णुता असलेले लोक बहुसंख्य असतील, तोपर्यंत धर्मनिरपेक्षता असेल. महिलांना संरक्षण असेल. एकदा का सहिष्णुता असलेले लोक अल्पसंख्य झाले की, अफगाणिस्तानसारखी स्थिती निर्माण होईल. त्यांची (मुसलमानांची) संख्या वाढल्यावर ते शरीयतविषयी बोलतात. राज्यघटनेविषयी नाही.

२. काँग्रेस आज देशाचे हित विसरली आहे. ती आंधळी झाली आहे. देशभक्ती आणि आतंकवाद यांतील भेद काँग्रेसवाल्यांना कळत नाही. म्हणूनच ते रा.स्व. संघाची तुलना तालिबानशी करतात.

३. लांगूलचालनाच्या राजकारणामुळे भारतात आणखी पाकिस्तान निर्माण होऊ शकतात. यामुळे तुम्ही (काँग्रेस) काही काळ सत्तेत येऊ शकता; पण यामुळे आणखी पाकिस्तान निर्माण होतील. जर हे रोखायचे असेल, तर वस्तूनिष्ठपणे आणि देशाच्या हिताचे राजकारण करा. भाजप लांगूलचालनाच्या राजकारणात गुंतणार नाही. ‘सबका साथ सबका विकास’ या घोषणेसह हिंदुत्वाच्या कटीबद्धतेसह विकासाला प्राधान्य देऊ.