अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई !
मुंबई – अंमलबजावणी संचालनालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांची लोणावळा आणि जळगाव येथील ५ कोटी रुपयांची मालमत्ता कह्यात घेतली आहे. एका प्रकरणात खडसे यांच्या जावयाला अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता एकनाथ खडसे यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आली.
अंमलबजावणी संचालनालयाच्या आरोपानुसार, वर्ष २०१६ मध्ये महसूलमंत्री असतांना खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी भोसरी (पुणे) येथील एक भूखंड विकत घेतला. त्याचा बाजारभाव ३१ कोटी रुपये असतांना गिरीश यांनी तो ३ कोटी रुपयांनाच विकत घेतला होता. हा भूखंड औद्योगिक विकास महामंडळाचा होता. इतक्या अल्प किंमतीत व्यवहार कसा काय झाला ? गिरीश यांनी तो विकत घेण्यासाठी गोळा केलेल्या ३ कोटी रुपयांचा स्रोत काय ? या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय पडताळणी करत आहे.
काही दिवसांपूर्वी खडसे यांच्या संदर्भातील झोटिंग समितीचा गोपनीय अहवाल मंत्रालयातून गायब झाला होता. हा अहवाल सापडला असून त्यात एकनाथ खडसे यांनी पदाचा गैरवापर केल्याचे म्हटले होते.