सनातनचे १०३ वे संत पू. (कै.) सदाशिव सामंत (वय ८४ वर्षे) यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

१०.६.२०२१ या दिवशी सनातनचे १०३ वे संत पू. सदाशिव सामंतआजोबा यांनी देहत्याग केला. त्यांच्या समवेत सेवा करणार्‍या साधकाला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. सदाशिव सामंत

‘पू. सामंत आजोबांनी देहत्याग केल्याचे वृत्त कळल्यावर काही वेळ मी स्तब्ध झालो होतो. ‘त्यांच्यावर झालेल्या शस्त्रकर्मानंतर बरे होऊन ते लवकर देवद आश्रमात येतील’, असे वाटत असतांनाच ‘ते आपल्याला अकस्मात् सोडून जातील’, असे मला मुळीच वाटले नव्हते. त्यांची मला आठवण सतत येते.

१. पू. आजोबा मितभाषी असूनही त्यांची सर्वांशी जवळीक होती.

२. त्यांची सेवेची तळमळ, नियमितता आणि त्यांच्या ओठांवर विलसणारे मृदू स्मित हास्य पाहून मला नेहमी प्रेरणा मिळत असे.

श्री. कृष्णकुमार जामदार

३. त्यांना सेवा करतांना पाहिल्यावर ‘ते वयोवृद्ध आहेत’, असे जाणवत नसे.

४. ‘सेवेसाठी लागणारी खोकी सर्वबाजूंनी व्यवस्थित आहेत ना ?’, हे स्वतः पडताळूनच ती खोकी स्वीकारणे

पू. आजोबा नेहमी उत्पादनांच्या बांधणीची सेवा करत असत. मला उत्पादनांच्या बांधणीसाठी खोकी सिद्ध करण्याची सेवा मिळाली होती. एकदा १०० ग्रॅम सात्त्विक कापराच्या डब्यांच्या बांधणीसाठी खोकी हवी होती. पू. आजोबांनी मला त्यासाठी विचारले असता मी त्यांना काही खोकी सिद्ध करून दिली. त्यांचा आकार आणि ‘ती सर्व बाजूंनी व्यवस्थित आहेत ना ?’, हे पडताळून पाहिल्यावरच त्यांनी ती खोकी स्वीकारली होती. ‘माझी सेवा नीट झाल्याची ती पोचपावती होती’, असे मला वाटले.

५. ‘गुरुधनाची हानी होऊ नये’, यासाठीची तळमळ

एकदा कापराच्या डब्या ठेवण्यासाठी खोकी सिद्ध करतांना एका खोक्याला खालून भोक पडले होते. हे मी पू. आजोबांना दाखवल्यावर ते मला म्हणाले, ‘‘काय करता येईल ?’, ते तुम्हीच बघा; पण एकही खोका वाया जाऊ देऊ नका.’’ मी त्या खोक्याला आतून-बाहेरून पुठ्ठा आणि वरून पांढरा पातळ कागद लावून दुरुस्त केले. तो खोका त्यांना दाखवला असता ते मला म्हणाले, ‘‘छान ! आम्ही उत्पादनांचे चिकित्सक आणि तुम्ही खोक्यांचे आधुनिक वैद्य !’’ हे ऐकून ‘माझी सेवा गुरुचरणी रूजू झाली’, असे मला वाटले आणि मी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली.

६. साधकांविषयीचे प्रेम

वर्ष २०१७ मध्ये एकदा मी बेशुद्ध पडलो होतो. तेव्हा परात्पर गुरु पांडे महाराजांनी पू. आजोबांना माझ्यासाठी नामजप करण्यास सांगितले होते. त्यांनी केलेला नामजप आणि गुरुमाऊलीची कृपा, यांमुळे मी लवकर बरा झालो. नामजप पूर्ण केल्यानंतरही पू. आजोबा ‘मी शुद्धीवर आलो कि नाही ?’, याविषयी विचारणा करत होते. मी शुद्धीवर आल्याचे समजल्यावर त्यांनी गुरुमाऊलीच्या चरणी कृतज्ञता व्यक्त केली होती.

७. साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे

एकदा मी पू. आजोबांच्या समवेत सेवा करत असतांना ते मला म्हणाले, ‘‘तुमच्यात सेवेविषयी तळमळ आणि भाव आहे. आता तुम्ही भाववृद्धीसाठी अधिक प्रयत्न करा.’’ हे ऐकून माझ्या मनातील त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणीत झाला.’

– श्री. कृष्णकुमार जामदार (वय ७० वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.६.२०२१)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक