‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
२२ ऑगस्ट या दिवशी ‘रक्षाबंधन’ आणि नारळी पौर्णिमा आहे. या निमित्ताने…
सणांविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘वर्ष २०१९ मधील राखीपौर्णिमेला सनातनच्या दोन साधिका आणि पू. (सौ.) लक्ष्मी (माई) नाईक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना राख्या अर्पण केल्या. या राख्यांमधून पुष्कळ सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होत असल्याचे त्यांच्या सूक्ष्मातील स्पंदनांवरून लक्षात आले. या राख्यांची आध्यात्मिक वैशिष्ट्ये विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी १६.८.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील राख्यांची माहिती
अ. राखी क्र. १ : ही सनातन-निर्मित गडद गुलाबी रंगाची सात्त्विक राखी आहे. सनातनची साधिका कु. करुणा मुळे हिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ही राखी अर्पण केली.
आ. राखी क्र. २ : कु. करुणाची लहान बहीण आणि सनातनची साधिका कु. कल्याणीस्वरूपा मुळे हिने स्वतःच्या हाताने बनवलेली राखी आहे. तिने परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ही राखी अर्पण केली.
इ. राखी क्र. ३ : ही सनातन-निर्मित पिवळ्या रंगाची सात्त्विक राखी आहे. सनातनच्या संत पू.(सौ.) लक्ष्मी नाईक यांनी ही राखी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाताला बांधली.
२. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
२ अ. नकारात्मक आणि सकारात्मक ऊर्जेच्या संदर्भातील निरीक्षणांचे विवेचन – चाचणीतील तिन्ही राख्यांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असणे : चाचणीतील तिन्ही राख्यांमध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. तिन्ही राख्यांमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. सनातनच्या दोन्ही साधिकांनी श्रीगुरूंना अर्पण केलेल्या राख्यांमधून पुष्कळ प्रमाणात सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होणे : ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची करुणा मुळे (वय १६ वर्षे) आणि कल्याणीस्वरूपा मुळे (वय १० वर्षे) या दोघी बहिणींनी लहान वयात सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्यास आरंभ केला. त्या लहानपणापासून रक्षाबंधनाला भगवान श्रीकृष्णाला (श्रीकृष्णाच्या चित्राला) राखी अर्पण करत असत. या दोन्ही साधिका गत २ वर्षांपासून आई-वडिलांसह रामनाथी आश्रमात राहून साधना करत आहेत. त्यांचा परात्पर गुरु डॉक्टरांप्रती ‘ते श्रीकृष्ण आहेत’, असा भाव आहे. ‘साधकांसाठी गुरु हेच सर्वस्व असतात’, हे जाणून त्या दोघींनी राखीपौर्णिमेला परात्पर गुरु डॉ. आठवले यांना राखी अर्पण केली. त्यांनी श्रीगुरूंना अर्पण केलेल्या राख्यांमध्ये त्यांच्या भावानुसार स्पंदने आहेत. या दोन्ही राख्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने असणे, हे त्यांचा श्रीगुरूंप्रती असलेल्या भावाचे सुंदर उदाहरण आहे.
३ आ. सनातनच्या संत पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाताला बांधलेल्या राखीमध्ये सर्वाधिक सकारात्मक स्पंदने असणे : सनातनच्या संत पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अनन्य भाव आहे. त्यांनी राखीपौर्णिमेला परात्पर गुरु डॉक्टरांच्या हाताला राखी बांधली. त्यांनी श्रीगुरूंना बांधलेल्या राखीमध्ये त्यांच्यातील चैतन्य आणि भावाची स्पंदने आहेत. या राखीला श्रीगुरूंच्या चैतन्यमय हाताचा स्पर्श झाला आहे. पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या हाताला बांधलेल्या राखीमध्ये (१४.५७ मीटर) सर्वाधिक सकारात्मक स्पंदने आहेत.
३ इ. साधक आणि संत यांच्यामध्ये श्रीगुरूंप्रती भाव असल्याने त्यांनी श्रीगुरूंना अर्पण केलेल्या राख्यांमध्ये श्रीगुरूंचे आशीर्वादात्मक चैतन्य आकृष्ट होणे : सनातनच्या दोन्ही साधिका आणि पू. (सौ.) लक्ष्मी नाईक यांचा श्रीगुरूंप्रती भाव असल्याने त्यांनी अर्पण केलेल्या राख्यांमध्ये श्रीगुरूंचे (परात्पर गुरु डॉक्टरांचे) आशीर्वादात्मक चैतन्य आकृष्ट झाले. यामुळे तिन्ही राख्यांमध्ये पुष्कळ सकारात्मक स्पंदने आढळली. राखी अर्पण करतांना किंवा बांधतांना राखी सात्त्विक असण्यासह ती अर्पण करणार्याचा भाव अत्यंत महत्त्वाचा आहे, हेच यातून लक्षात येते. साधकांचा गुरूंप्रती भाव असल्याने त्याचा राखी सारख्या निर्जीव वस्तूवर केवढा सकारात्मक परिणाम होतो, हेही लक्षात येते.’
– प्रा. सुहास जगताप, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (११.९.२०२०)
ई-मेल : [email protected]
|