सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आईच्या आजारपणात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि ‘सनातन हे एक कुटुंब आहे’, याची त्यांना आलेली प्रचीती !

देवद आश्रमातील सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आईच्या (६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती प्रभावती शिंदे यांच्या) आजारपणात अनुभवलेली परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि ‘सनातन हे एक कुटुंब आहे’, याची त्यांना आलेली प्रचीती !

सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या मातोश्री श्रीमती प्रभावती शिंदे (वय ८५ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात रहातात. मे आणि जून २०२१ मध्ये त्या आश्रमातील प्रसाधनगृहात २ वेळा पडल्या. त्या वेळी त्यांच्या डोक्याला मुका मार लागला आणि त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांच्या मेंदूचे शस्त्रकर्म करण्याचे ठरले. त्यांना २ वेळा रुग्णालयात भरती करावे लागले. त्यांच्या आजारपणाच्या कालावधीत सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी गुरुकृपा अनुभवली आणि ‘सनातन हे एक कुटुंब आहे’, याची त्यांना प्रचीती आली.

श्रीमती प्रभावती शिंदे यांच्या आजारपणाचा घटनाक्रम आणि त्या कालावधीत आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

सद्गुरु राजेंद्र शिंदे

१. आई प्रसाधनगृहात पडल्यानंतरचा घटनाक्रम

१ अ. आई प्रसाधनगृहात पडल्यावर तिच्या डोक्याला मुका मार लागल्याचे लक्षात येणे आणि तिला त्रास होऊ लागल्यावर रुग्णालयात भरती करणे : ‘२७.५.२०२१ या दिवशी पहाटे साधारण ५.३० वाजता माझी आई देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील प्रसाधनगृहात पडली. आई पडल्यावर तिला कुठेही रक्तस्राव झालेला नव्हता. त्यामुळे ‘तिला नक्की कुठे लागले आहे किंवा नक्की काय झाले ?’, हे पटकन कळले नाही. थोड्या वेळाने तिच्या डोळ्यांच्या पापण्या बंद होऊन कपाळावरील आणि डोळ्यांच्या खालील त्वचेवर रक्त साकळायला आरंभ झाला. तेव्हा ‘तिच्या डोक्याला मुका मार लागला आहे’, हे आमच्या लक्षात आले. त्या वेळी आई शुद्धीत होती. दुपारनंतर तिला त्रास व्हायला लागला. गुरुकृपेने आश्रमापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या रुग्णालयात जागा मिळाल्याने तिला लगेच तेथे भरती केले आणि तिच्यावर उपचार चालू झाले.

श्रीमती प्रभावती शिंदे

१ आ. मेंदूत बराच रक्तस्राव झाल्याने आईला शब्द उच्चारता न येणे आणि त्या स्थितीतही ती शांत अन् स्थिर असणे : ‘सीटी स्कॅन’ केल्यावर तिच्या ‘डोक्याच्या डाव्या भागाला मार लागून मेंदूत बराच रक्तस्राव झाला आहे’, असे लक्षात आले. तोपर्यंत आईचे बोलणे न्यून झाले होते. तिला शब्दही उच्चारता येत नव्हते. त्यामुळे ‘ती काय बोलत आहे ?’, हे आम्हाला कळत नव्हते; परंतु या स्थितीतही आई शांत आणि स्थिर होती.

१ इ. आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्माची आवश्यकता नसल्याचे सांगितल्यावर गुरुकृपेची प्रचीती येणे : आईला अतीदक्षता विभागात (आय.सी.यू.मध्ये) ठेवण्यात आले. तेथील आधुनिक वैद्यांनी २४ घंटे तिचे निरीक्षण केल्यावर सांगितले, ‘‘जेथे रक्तस्राव झाला आहे, तेथील रक्त शरिरात शोषले जात असल्याने शस्त्रकर्म करण्याची आवश्यकता नाही.’’ ही आमच्यासाठी मोठी अनुभूतीच होती. असे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते.

१ ई. रुग्णालयात भरती झाल्यानंतर २ दिवसांनी आईच्या प्रकृतीत समाधानकारक प्रगती झाल्याचे पाहून आधुनिक वैद्यांनी तिला तेथून आश्रमात पाठवणे : रुग्णालयात पहिले ३ दिवस आई कुणालाही चांगल्या प्रकारे ओळखू शकत नव्हती. तिला स्वतःला काहीच करता येत नव्हते. तिला नळीतून पातळ आहार द्यावा लागत होता; परंतु पुढच्या २ दिवसांत ती थोडे बोलायला आणि व्यक्तींना ओळखू लागली. तेव्हा आधुनिक वैद्यांनी ‘समाधानकारक प्रगती आहे’, असे सांगून आईला ५ व्या दिवशी (२.६.२०२१ या दिवशी सायंकाळी) रुग्णालयातून आश्रमात पाठवले. रुग्णालयातील आधुनिक वैद्यांनी ‘आश्रमात गेल्यावर तिची पुष्कळ काळजी घ्यावी लागेल’, असे सांगितले होते.

२. आई दुसर्‍यांदा प्रसाधनगृहात पडल्यानंतरचा घटनाक्रम

२ अ. आई अशक्तपणामुळे प्रसाधनगृहात पडणे, शारीरिक स्थिती बिघडल्याने तिला रुग्णालयात भरती करणे आणि मेंदूत रक्तस्राव झाल्याचे चाचणीत समजणे : ७.६.२०२१ या दिवशी आई पहाटे उठून प्रसाधनगृहात गेली आणि अशक्तपणा पुष्कळ असल्यामुळे पुन्हा तेथे पडली. त्यानंतर २ – ३ दिवसांनी तिच्या हालचाली हळूहळू मंदावत गेल्या. तिचे बोलणे जड व्हायला लागले. तिला काही कळेनासे होऊ लागले. तेव्हा ११.६.२०२१ या दिवशी तिला पुन्हा रुग्णालयात भरती केले. दुसर्‍यांदा पडल्याने ‘सीटी स्कॅन’मध्ये मेंदूत डाव्या भागात रक्तस्राव होऊन मेंदूत रक्त पसरल्याचे लक्षात आले.

२ आ. आधुनिक वैद्यांनी ‘आईच्या मेंदूचे शस्त्रकर्म करावे लागेल; पण तिची शारीरिक स्थिती नाजूक आहे’, असे सांगून शस्त्रकर्म करण्याविषयीचा निर्णय विचारणे : १२.६.२०२१ या दिवशी आधुनिक वैद्यांनी मला बोलावून सांगितले, ‘‘आईच्या मेंदूचे शस्त्रकर्म करावे लागेल. आईचे वय ८५ वर्षे असून तिची शारीरिक स्थितीही नाजूक आहे. त्यामुळे शस्त्रकर्म अवघड आहे. शस्त्रकर्म यशस्वी होण्याची निश्चिती देता येत नाही. तिचे वय आणि आताची स्थिती पाहून शस्त्रकर्मानंतरही पुष्कळ पालट होईल, असे नाही. त्यामुळे तुम्ही विचार करून निर्णय सांगा.’’

२ इ. आईची बिकट शारीरिक स्थिती पहाता ‘शस्त्रकर्म करू नये’, असे नातेवाइकांना वाटणे : बर्‍याच वेळा आई गुंगीत असायची. काही वेळा तिचे असंबद्ध बोलणे चालू असायचे. तिला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजनही लावला होता. हे सर्व ऐकल्यावर नातेवाइकांना ‘शस्त्रकर्म करू नये’, असे वाटत होते; कारण त्यात मोठी जोखीम होती; पण नंतर शस्त्रकर्म करण्याचा निर्णय घेतला.

३. शस्त्रकर्म करण्याचा निर्णय झाल्यावर आईचे ‘सीटी स्कॅन’ करणे आणि त्याचा अहवाल पाहून ‘शस्त्रकर्म करणे सोपे जाईल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे

मी रुग्णालयातील आधुनिक वैद्यांना सांगितले, ‘‘शस्त्रकर्म करण्यास आमची संमती आहे.’’ तेव्हा त्यांनी ‘आज संध्याकाळी शस्त्रकर्म करूया’, असे सांगितले. आम्ही आईला रुग्णवाहिकेतून बाहेर नेले आणि तिचे ‘सिटी स्कॅन’ करून आणले. त्याचा अहवाल पाहून आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘अहवाल चांगला आहे. रक्त गोठलेले नाही. त्यामुळे शस्त्रकर्म करणे सोपे जाईल.’’ तेव्हा ‘आई पडल्यानंतर ४ – ५ दिवसांनीही रक्त न गोठणे’, ही परात्पर गुरुदेवांची कृपाच आहे’, असे मला वाटले. (अन्यथा शस्त्रकर्म करणे अवघड आणि पुष्कळ खर्चिक झाले असते.)

४. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आईचे शस्त्रकर्म यशस्वी होणे आणि ती अवघ्या ४ दिवसांत रुग्णालयातून आश्रमात परतणे

सायंकाळी ५.४५ वाजता आईला शस्त्रकर्म करण्यासाठी शस्त्रक्रियागारात (ऑपरेशन थिएटरमध्ये) नेले. सायंकाळी ७ वाजता शस्त्रकर्म झाल्यावर आईला बाहेर आणले. तेव्हा आई शुद्धीवर होती. शस्त्रक्रियागारातून बाहेर आल्यावर आईने तिथे उपस्थित असलेल्या नातेवाइकांना ओळखले.

‘एवढ्या अल्प कालावधीत शस्त्रकर्म होणे आणि आईने सायंकाळी ७ वाजेपर्यंत शुद्धीवर येऊन लगेचच प्रतिसाद देणे’, हे केवळ गुरुकृपेनेच होऊ शकते’, असे मला वाटले. केवळ आणि केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले (आणि श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) यांच्या कृपेमुळे आईच्या उपचारांसाठीची पूर्वसिद्धता अगदी अल्प कालावधीत पूर्ण झाली अन् शस्त्रकर्म यशस्वी झाले. आईला त्यानंतर २४ घंटेसुद्धा अतीदक्षता विभागात ठेवावे लागले नाही. आईचे शरीर औषधोपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे ती १५.६.२०२१ या दिवशी सायंकाळी, म्हणजे अवघ्या ४ दिवसांत रुग्णालयातून आश्रमात परतली.

५. आईच्या आजारपणाच्या काळात अनुभवलेली गुरूंची कृपा !

५ अ. देवद आश्रमातील संतांनी आईसाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने तिची प्रकृती गतीने सुधारणे : आई रुग्णालयात असतांना तिच्यासाठी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी वेळोवेळी नामजपादी उपाय सांगितले. आवश्यकतेप्रमाणे देवद आश्रमातील संत प्रतिदिन तो नामजप करत होते. त्यामुळे आईला आध्यात्मिकदृष्ट्या लाभ होऊन तिची प्रकृती गतीने सुधारली.

५ आ. आईच्या शस्त्रकर्माविषयी आधुनिक वैद्यांनी काहीही सांगितलेले नसतांनाही देवाने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून शस्त्रकर्माच्या संदर्भात दिलेली पूर्वसूचना ! : १२.६.२०२१ या दिवशी आईची प्रकृती पुष्कळ बिघडली. तेव्हा मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना ‘तिच्यासाठी कोणता नामजप करायचा ?’, असे विचारले. तेव्हा त्यांनी नामजप सांगितला आणि त्या समवेत ‘शस्त्रकर्म करावे लागल्यास ते अल्प त्रासाचे (छोटे) होऊ दे’, अशी प्रार्थनाही करायला सांगितली. प्रत्यक्षात तेव्हा आधुनिक वैद्यांनी शस्त्रकर्म करण्याविषयी काहीही सांगितले नव्हते; परंतु नंतर त्यांनी शस्त्रकर्म करण्यास सांगितले. यावरून सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या माध्यमातून देवानेच ‘तिचे शस्त्रकर्म करावे लागेल’, अशी पूर्वसूचना दिली.

५ इ. कोरोनाच्या प्रतिकूल स्थितीतही नातेवाइकांना साहाय्यासाठी येता येणे : आई रुग्णालयात असतांना कोरोना महामारीची पार्श्वभूमी असूनही माझा लहान भाऊ आणि मोठी वहिनी ठाणे येथून ४० कि.मी. अंतरावरून अन् लहान बहीण प्रतिदिन रुग्णालयात ८ – १० घंटे थांबण्यासाठी येत असत. ‘त्यांचे साहाय्य मिळणे’, हीसुद्धा देवाची कृपाच आहे.

५ ई. नातेवाइकांनी आर्थिक साहाय्य करणे : आईच्या आजारपणात तिला २ वेळा रुग्णालयात भरती करावे लागल्याने बराच आर्थिक व्यय करावा लागला; परंतु भाऊ, बहीण आणि वहिनी यांनी चांगल्या प्रकारे आर्थिक साहाय्य केले.

५ उ. आश्रमातील साधिकांनी आईची सेवा पोटच्या मुलींप्रमाणे चांगल्या प्रकारे केली. ते पाहून नातेवाइकांनाही आश्चर्य वाटले.

५ ऊ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने आईला वेदनांची जाणीव न होणे : या सर्व स्थितीत आश्चर्याची गोष्ट म्हणजे डोक्याला एवढा मार लागूनही आई कधीच ‘वेदना होत आहेत’, असे म्हणाली नाही. ‘परात्पर गुरुदेवांनी तिच्या सर्व वेदनाच नष्ट केल्या आहेत’, असे आम्हाला जाणवले. ही तिच्यासाठी आणि आमच्यासाठी मोठी अनुभूती होती.

५ ए. आईच्या आजारपणाच्या कालावधीत ‘सनातन हे एक कुटुंब आहे आणि ही कुटुंबभावना सर्व साधकांमध्ये चांगल्या प्रकारे रुजली आहे’, हे अनुभवता आले.

६. कृतज्ञता

आईच्या आजारपणात मला जी गुरुकृपा आणि साधकांचे जे प्रेम अनुभवायला मिळाले, ते अशा गंभीर प्रसंगांतून जाणार्‍या सनातनच्या सर्वच साधकांना अनुभवायला मिळते. यावरून ‘साधना करणारे सनातनचे साधक सात्त्विक वृत्तीचे आहेत’, हे मला अनुभवायला मिळाले. त्यावरून ‘भावी हिंदु राष्ट्रातील आदर्श समाज कसा असेल ?’, याची मला प्रचीती आली. परात्पर गुरुदेवांनी आदर्श आश्रमव्यवस्था निर्माण करून समाजासमोर आदर्श समाजाची, म्हणजेच हिंदु राष्ट्राची प्रतिकृतीच उभी केली आहे. हे सर्व अनुभवायला दिल्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !

इदं न मम । (म्हणजे हे माझे नाही.)
श्रीविष्णुचरणार्पणमस्तु ।’

– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (८.७.२०२१)

‘सासूबाईंच्या माध्यमातून देवाने जीव वाचवणे आणि सतत नामजप चालू असणे’ यांविषयी श्रीमती प्रभावती शिंदे यांना आलेल्या अनुभूती

१. तीन आकृत्यांच्या माध्यमातून त्रास देणार्‍या अनिष्ट शक्तींच्या त्रासापासून सासूबाईंच्या माध्यमातून देवाने जीव वाचवणे

‘मी अनुमाने ३० वर्षांची असतांना एकदा मी पुष्कळ आजारी होते. तेव्हा माझ्या सासूबाई माझ्याजवळ बसल्या होत्या. मी सासूबाईंना माझ्या पोटावर हात ठेवायला सांगितला. त्या वेळी मला भिंतीला टेकून उभ्या राहिलेल्या आणि अलंकार घातलेल्या ३ काळ्याकुट्ट आकृत्या दिसल्या. सासूबाईंनी थोडा वेळ माझ्या पोटावरून हात दूर केल्यास त्या ३ आकृत्या माझ्याजवळ येऊन मला घेऊन जाण्याचा प्रयत्न करायच्या. त्या वेळी मला पुष्कळ भीती वाटायची. मी सासूबाईंना माझ्या पोटावरील हात काढू दिला नाही आणि त्या ३ आकृत्या तेथेच उभ्या होत्या. असे जवळजवळ एक घंटा चालू होते. शेवटी कंटाळून त्या शक्ती निघून गेल्या. ‘ते यमदूत होते’, असे मला वाटले. त्या वेळी देवाने सासूबाईंच्या माध्यमातून माझा जीव वाचवला.

२. पांडुरंगाचा सतत धावा केला जाणे आणि ‘विठ्ठल तो आला, आला मला भेटण्याला’ या भजनपंक्ती मुखातून आपोआप येत असल्याने आनंद होणे

मी सतत पांडुरंगाचा धावा करते. मी त्याला ‘तू तेथे (पंढरपूरला) कमरेवर हात ठेवून का उभा आहेस ? तू इकडे का येत नाहीस ?’, असे सांगते. माझ्या ध्यानीमनी सतत विठ्ठल असतो. मला त्याचा ध्यास लागला आहे. ‘विठ्ठल तो आला, आला मला भेटण्याला…’ हे भजन माझ्या मुखात आपोआप चालू होते आणि मला आनंद होतो.

३. दिवसभर नामजप चालू असणे आणि रात्री झोपेतही मुखात नाम येत असल्याने आनंद होणे

माझ्या मुलाने (सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी) सांगितलेला समष्टी आणि व्यष्टी नामजप मी करते. त्या वेळी समष्टीसाठी माझा नामजप होतो. मला दुपारी २ घंटे मोकळा वेळ असतो. मी रात्री झोपलेली असतांनाही माझ्या मुखात नाम असते आणि मला आनंद होतो.’

– श्रीमती प्रभावती शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२९.८.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक