आयुर्वेद, अध्यात्म, भारतीय संगीत आणि परंपरा, सण-उत्सव अन् ध्यानधारणा या विषयांत लौकिक निर्माण करणारे श्रीगुरु वैद्य बालाजी तांबे !

घराघरांत आयुर्वेदाचे महत्त्व पोचवणारे वैद्य बालाजी तांबे !

पुणे येथील जगप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य वैद्य भालचंद्र उपाख्य बालाजी तांबे (वय ८१ वर्षे) यांचे १० ऑगस्ट २०२१ या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या जाण्याने ‘आयुर्वेदाचे महत्त्व घरोघरी पोचवणारा तारा आपल्या सहवासातून निघून गेला आहे’, अशी भावना असंख्य लोकांच्या मनात निर्माण झाली आहे. वैद्य बालाजी तांबे यांनी अतिशय कष्टातून आयुर्वेदाचे महत्त्व विविध सामाजिक माध्यमांतून समाजाला अवगत केले. ‘आयुर्वेद, अध्यात्म, भारतीय संगीत, भारतीय परंपरा आणि सण-उत्सव, ध्यानधारणा’, अशा अनेकविध विषयांत वैद्य तांबे यांनी स्वतःचा लौकिक निर्माण केला. एवढेच नव्हे, तर सातासमुद्रापार त्याचा प्रसारही केला. त्यांच्याविषयी आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयीची माहिती या लेखातून पहाणार आहोत.

संकलक – श्री. सचिन कौलकर, पुणे.

वैद्य बालाजी तांबे

१. वैद्य बालाजी तांबे यांचा परिचय

वैद्य भालचंद्र उपाख्य बालाजी वासुदेव तांबे यांचा जन्म २८ जून १९४० या दिवशी गुजरात राज्यातील बडोदा येथे झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे. श्रीगुरु बालाजी तांबे यांना वैदिक अध्ययनाविषयीचा वारसा घरातूनच लाभला होता. त्यांचे वडील कै. वासुदेव तांबे हे वेदशास्त्रसंपन्न होते. ते वेद आणि प्राचीन ग्रंथ यांच्या ज्ञानाविषयी अधिकारी व्यक्ती होते. श्रीगुरु बालाजी तांबे यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई. स्वामी श्री वासुदेवानंद सरस्वती, श्री रंगावधूत महाराज, श्री लोकनाथतीर्थ महाराज अशा थोर संतांचा आशीर्वाद त्यांच्या वडिलांना लाभलेला होता. श्रीगुरु बालाजी तांबे यांच्यावर त्यांच्या वडिलांचे संस्कार होते. त्यांना प्रतिभासंपन्नता लाभलेली होती. ते लहानपणापासूनच वेदातील काही भाग म्हणत होते. श्रीगुरु बालाजी तांबे यांना त्यांच्या वडिलांनीच त्या काळातील ख्यातनाम आयुर्वेदाचार्यांचा परिचय करून दिला होता. त्यांच्याकडून आयुर्वेदीय औषधनिर्माणशास्त्र आणि निदान यांची पद्धती त्यांनी आत्मसात करून घेतली होती.

२. पत्नीचे दागिने गहाण ठेवून व्यवसायास प्रारंभ

वैद्य बालाजी तांबे यांना व्यवसायाचा प्रारंभ करण्यासाठी भूमी खरेदी करायची होती. त्या वेळी त्यांनी त्यांची पत्नी वीणा यांचे दागिने गहाण ठेवून भूमी विकत घेतली; मात्र बांधकाम पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे प्रथम येणार्‍या रुग्णांसाठी त्यांनी ‘एम्.टी.डी.सी.’चे (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे) बंगले भाड्याने घेतले होते. त्यानंतर हळूहळू मिळणार्‍या पैशांतून त्यांनी आश्रमाची उभारणी केली होती.

३. स्तोत्र आणि मंत्र यांचा मनुष्याचे शरीर अन् मन यांवर होणार्‍या परिणामांचे व्यापक संशोधन

वैद्य बालाजी तांबे यांनी स्तोत्र आणि मंत्र यांचा मनुष्याचे शरीर अन् मन यांवर कसा परिणाम होतो, याविषयी ४ दशकांहून अधिक काळ व्यापक संशोधन केले आहे. त्यांनी संगीताचा उपचार म्हणून उपयोग केल्यास त्याचे होणारे चांगले परिणाम जगाच्या निदर्शनास आणून दिले. त्यांचे संशोधन आणि अभ्यास यांतून संगीताचे २५ ‘अल्बम’ (ध्वनीमुद्रिका) साकार झाले आहेत. गर्भवती मातांसाठी अतिशय उपयुक्त असलेल्या ‘गर्भसंस्कार’ या ‘अल्बम’ची, तसेच पुस्तकाची त्यांनी निर्मिती केली आहे. श्रीगुरु बालाजी तांबे यांनी मराठी, इंग्रजी आणि जर्मन या भाषांमध्ये २० हून अधिक ग्रंथांचे लेखन केले आहे. ‘वेदांचे सामान्यांना आकलन व्हावे’, यासाठी त्यांनी विविध लेख लिहिण्यासह ते एका ग्रंथातही संकलित केले आहेत. ‘श्रीमद्भगवद्गीते’वरील त्यांच्या प्रवचनांच्या मालिकेचे १ सहस्रांहून अधिक भाग ‘साम’ वाहिनीवर प्रसारित झाले आहेत.

वैद्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेद, अध्यात्म, भारतीय संगीत, भारतीय परंपरा, सण-उत्सव आणि ध्यानधारणा अशा अनेकविध विषयांचा सातासमुद्रापार प्रसार केला. विशेष म्हणजे त्यांनी युरोपात कार्यशाळा घेऊन भारतीय विद्यांविषयी जागरूकता निर्माण केली. त्यांनी ध्यानधारणा आणि ‘ॐ साधना’ या विषयांतही मोठे संशोधन केले.

४. वैद्य तांबे यांचे अध्यात्म आणि आरोग्य यांची सांगड घालणारे लेख वाचकांमध्ये लोकप्रिय होणे

दैनिक ‘सकाळ’च्या ‘फॅमिली डॉक्टर’ या पुस्तिकेसाठी श्रीगुरु बालाजी तांबे यांनी २ दशके शेकडो लेख लिहिण्यासह मार्गदर्शनही केले आहे. आरोग्य, मानसिक स्वास्थ्य, हिंदु परंपरा आणि त्यांचे महत्त्व, संगीत, सण, उत्सवांमागील आध्यात्मिक अन् आरोग्य यांची सांगड घालणारे त्यांचे लेख मराठी वाचकांमध्ये लोकप्रिय आहेत. यातील काही लेखांचा संग्रह करून ते ग्रंथरूपाने प्रसिद्ध करण्यात आले. ‘फॅमिली डॉक्टर’ या पुस्तकाच्या एकूण १५ आवृत्त्या प्रसिद्ध झाल्या आहेत.

५. आयुर्वेदातील २००हून अधिक औषधांची निर्मिती आणि ‘ॐ मंदिरा’ची उभारणी !

श्रीगुरु बालाजी तांबे यांनी स्थापन केलेल्या ‘आत्मसंतुलन व्हिलेज’ या उपचार केंद्रात हृदयाच्या समस्या, मधुमेह, मेंदूचे विकार असलेले रुग्ण, तसेच अपत्यहीन दांपत्यावर उपचार केले. येथे आयुर्वेदाच्या उपचाराला योगासने, संगीत आणि ध्यानधारणा यांची जोड दिली जाते. श्रीगुरु वैद्य बालाजी तांबे यांनी ‘संतुलन ॐ मेडिटेशन’ (एस्.ओ.एम्.) आणि ‘संतुलन क्रिया योग’ (एस्.के.वाय.) ही उपचारपद्धत विकसित केली आहे. त्यांनी विकसित केलेली ‘संतुलन पंचकर्म’ ही पद्धत एकमेवाद्वितीय आहे. याच केंद्रात सिद्ध केलेली आयुर्वेदाची औषधे वर्ष १९८४ पासून युरोपमध्ये निर्यात होत आहेत. त्यांनी आयुर्वेदातील २०० हून अधिक औषधांची निर्मिती केली आहे. त्यांनी जगातील पहिल्या आणि एकमेव अशा ‘ॐ मंदिरा’ची कार्ला (जिल्हा पुणे) येथे उभारणी केली आहे. अध्यात्मावरील अनेक ग्रंथांचे त्यांनी लेखन केले आहे.

६. देश-विदेशांतही अनेक प्रकल्प

श्रीगुरु तांबे यांचे जर्मनीतही वास्तव्य असायचे. त्यांच्या कार्यामुळे त्यांचा शिष्य परिवार विश्वभर पसरलेला आहे. जर्मनीतील ‘ग्लीकेन’ येथे त्यांनी ‘आयुर्वेदीय पंचकर्म केंद्र’ चालू केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देश-विदेशांतही अनेक प्रकल्प नावारूपाला आले आहेत. स्वतःचे ज्ञान आणि अनुभव यांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी युरोपातील अनेक ठिकाणांना भेटी देऊन आयुर्वेदाचा प्रचार केला आहे. तेथे त्यांचा अनुयायी वर्गही पुष्कळ आहे.

७. युरोपातील अनेक नियतकालिकांत संशोधन प्रसिद्ध होणे

युरोप आणि अमेरिका येथील अनेक नियतकालिकांत त्यांचे लेख अन् संशोधनपर साहित्य प्रकाशित झाले आहे. मराठीतील अनेक नियतकालिकांतही त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे.

८. पंचकर्माचा सहस्रो जणांना लाभ करून देणे !

श्रीगुरु तांबे यांच्या पंचकर्म पद्धतीचा सहस्रो लोकांनी लाभ घेतलेला आहे. सध्या धकाधकीचे युग आणि स्पर्धात्मक वातावरण आहे, तसेच भौतिक सुखाविषयी वाढत असलेली लालसा लक्षात घेत त्यातून निर्माण होणारे ताणतणाव, चढ आणि उतार यांवर मात करण्याची वैद्य तांबे यांची पंचकर्म पद्धती उपयुक्त ठरली आहे.

९. मेंदूतील (डोक्यातील) विषाणू (मनाची भीती) गेल्याविना कोरोना जाणार नाही !

वैद्य बालाजी तांबे एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात कोरोना विषाणूच्या संकटाविषयी म्हणाले, ‘‘कोरोनाच्या आजारावर आपण लस शोधू, औषधे शोधू, ‘मास्क’ लावू. सर्व काळजी घेऊ; मात्र स्वतःच्या मेंदूतील (डोक्यातील) विषाणू जात नाही म्हणजे मनाची भीती जात नाही, तोवर हा कोरोनाचा विषाणू जाणार नाही. फेब्रुवारी २०१९ मध्ये कोरोनाची माहिती मिळाली. त्या वेळी कोरोनाचा सामना करण्यासाठी आम्ही त्याचा अभ्यास करून ‘एक चहा आणि एक काढा’ सिद्ध केला. आम्ही बनवलेला चहा आणि काढा यांना ‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’कडून (भारतीय अन्न संरक्षण आणि मानके प्राधिकरणाकडून) मान्यता मिळाल्यानंतर आम्ही तो सर्वांना देण्यास प्रारंभ केला. त्या वेळी दळणवळण बंदीमुळे अनेक परदेशी रुग्ण भारतात अडकले होते; मात्र ज्या वेळी ते मायदेशी गेले, तेव्हा त्यांनी चहा आणि काढा यांची पाकीटे पुष्कळ प्रमाणात समवेत नेली. या दोन्ही गोष्टींना त्यांच्या देशात कुणीही विरोध केला नाही.’’

आयुर्वेदावर अनेक बंधने लादल्याने ‘ॲलोपॅथी’प्रमाणे आयुर्वेद सर्वांपर्यंत पोचला नसल्याविषयी वैद्य बालाजी तांबे यांनी व्यक्त केलेली खंत !

काही मासांपूर्वी ‘ॲलोपॅथी’ आणि ‘आयुर्वेद’ यांवरून वाद चालू झाला होता. यावर वैद्य बालाजी तांबे म्हणाले, ‘‘आयुर्वेदाला होत असलेल्या विरोधामुळे ज्यांचा विरोध होता, ते पुढे आले. पैशाने सर्व काही जिंकता येत नाही. ‘ॲलोपॅथी’च्या औषधांतही त्रुटी आहेत; मात्र आयुर्वेदाच्या वैद्यांना साधी ‘प्रॅक्टिस’चीही अनुमती नाही. आयुर्वेदावर अनेक बंधने लादली गेली आहेत. त्यामुळे ‘ॲलोपॅथी’प्रमाणे आयुर्वेद सर्वांपर्यंत पोचला नाही. जर्मनीमध्ये आमचे आयुर्वेदाचे केंद्र आहे. जर्मनीत त्यांना आयुर्वेद हवा आहे; मात्र सरकारची अडचण होऊ नये, यासाठी आम्ही ‘आयुजेनोमिक्स’ (आयुर्वेदाची तत्त्वे आणि जिनोमिक्स यांचे एकत्रिकरण करून औषधे बनवण्याची प्रक्रिया. यातील जिनोमिक्स मधील जिनोम हा जीवातील सर्व जीन्ससह डीएन्एचा संपूर्ण संच आहे. या जिनोमची रचना, कार्य यांचा अभ्यास जीवशास्त्रातील एका क्षेत्रात केला जातो, त्याला जिनोमिक्स म्हणतात.) ही पद्धत चालू केली. आमच्या औषधांवर तेथे संशोधन चालू आहे. आमची औषधे तेथील चाचण्यांमध्ये उत्तीर्ण झाली, तर तिथून आम्हाला ‘रॉयल्टी’ दिली जाणार आहे. अशा प्रकारे आयुर्वेदाचे महत्त्व अधोरेखित होईल; मात्र विश्वभरात आयुर्वेदाची मागणी वाढली, तर त्याचे महत्त्व वाढेल.’’


वैद्य बालाजी तांबे यांनी अस्वच्छतेविषयी केलेल्या तक्रारीनंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्वरीत कर्मचार्‍यांना दरडावले !

शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशीही त्यांचा चांगला स्नेह होता. वैद्य बालाजी तांबे त्या काळी ‘एम्.टी.डी.सी.’च्या एका बंगल्यात भाड्याने रहात होते. त्या वेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांच्या बंगल्यावर रहाण्यासाठी आले असतांना त्यांना सर्वत्र अस्वच्छता दिसली होती. बंगल्याच्या आजूबाजूला पुष्कळ कचरा झाल्याचे पाहून त्यांनी वैद्य तांबे यांच्याकडे विचारणा केली. त्या वेळी त्यांनी याविषयीची तक्रार त्यांच्यापुढे मांडली. वैद्य तांबे यांनी त्यांना सांगितले, ‘‘जिथे स्वच्छता आहे, तिथे लक्ष्मी आहे. आम्ही स्वच्छतेवरच सगळी लक्ष्मी कमावली आहे; पण कुणी काही ऐकतच नाही.’’ त्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी हे सर्व ऐकून तडक एक काठीच हातात घेतली आणि फर्मान सोडून सर्व कर्मचार्‍यांची झडती घ्यायला प्रारंभ केला. तसेच त्या कर्मचार्‍यांना दरडावले, ‘लगेच सर्वत्र स्वच्छता करा, रोपे लावा. मी जाईपर्यंत येथे सर्व हिरवे न दिसल्यास या काठीने एकेकाला दाखवतो !’