संपूर्ण भारतीय बनावटीच्या ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ची चाचणी यशस्वी

पुढील वर्षी भारतीय नौदलामध्ये समाविष्ट होणार !

कोची (केरळ) – संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ पुढील वर्षी भारतीय नौदलाच्या सेवेत समाविष्ट केली जाणार आहे. नुकत्याच खोल समुद्रात ‘विक्रांत’ची करण्यात आलेली चाचणी यशस्वी ठरली होती. युद्धनौकेची बांधणी, युद्धनौकेचे मुख्य इंजिन, युद्धनौकेची वीज निर्मिती यंत्रणा, साहाय्यक पूरक यंत्रणा या सर्वांची चाचणी समाधानकारक झाल्याचे नौदलाने सांगितले. यापुढेही आणखी विविध चाचण्या समुद्रात होणार आहेत. वर्ष २०२२ मध्ये विमानवाहू युद्धनौका नौदलात रुजू होईल, असा विश्‍वास नौदलाने व्यक्त केला आहे. स्वबळावर विमानवाहू युद्धनौका बांधण्याचे तंत्रज्ञान जगात केवळ मोजक्या देशांकडे आहे, यामध्ये आता भारताचाही समावेश होणार आहे.

सध्या भारताकडे ‘आय.एन्.एस्. विक्रमादित्य’ ही एकमेव विमानवाहू युद्धनौका आहे. ‘विक्रमादित्य’ ही रशियाकडून आपण विकत घेतली आहे. याआधी ‘आय.एन्.एस्. विक्रांत’ आणि ‘आय.एन्.एस्. विराट’ या विमानवाहू युद्धनौका इंग्लंडकडून विकत घेतल्या होत्या, ज्या आता नौदलाच्या सेवेतून निवृत्त झाल्या आहेत.