अमृतसर (पंजाब) येथील गावामध्ये पाकमधून ड्रोनच्या साहाय्याने पाठवला शस्त्रसाठा !

हँड ग्रेनेड, १०० हून अधिक काडतुसे आणि ‘टिफीन बॉम्ब’ सापडला !

  • पाकचे ड्रोन भारतीय सीमेत घुसतातच कसे ? – संपादक
  • पाकिस्तान गेल्या काही आठवड्यांपासून भारतात ड्रोनच्या साहाय्याने कारवाया करत आहे, त्याला तितक्याच परिणामकारकपणे प्रत्युत्तर देण्याची आवश्यकता आहे ! – संपादक
(डावीकडे) पकडण्यात आलेला शस्त्रसाठा पंजाब चे डीजीपी दिनकर गुप्ता (फोटो सौजन्य: एएनआई)

चंडीगड – पंजाबमधील अमृतसर शहराच्या जवळील एका गावामध्ये पाकमधून ड्रोनच्या (हवाई वाहतूक करणारे यंत्र) माध्यमातून शस्त्रांचा साठा पाठवण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. हँड ग्रेनेड, १०० हून अधिक काडतुसे, तसेच टिफीन बॉम्ब (जेवणार्‍या डब्यात ठेवण्यात आलेला बॉम्ब) यांचा यात समावेश आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्‍वभूमीवर घातपात करण्याच्या उद्देशाने हा शस्त्रसाठा पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे या ड्रोनची माहिती मिळाली. या ड्रोनला ७ पिशव्या बांधण्यात आल्या होत्या. त्या ७ ऑगस्टच्या रात्री येथे पाडण्यात आल्या. त्याचा आवाज गावकर्‍यांना ऐकू आल्यावर त्यांनी शोध घेतल्यावर त्यांना या पिशव्या आढळून आल्या. त्यात शस्त्रसाठा असल्याचे लक्षात येताच गावकर्‍यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी हा शस्त्रसाठा कह्यात घेतला. हा शस्त्रसाठा ज्या व्यक्तीसाठी पाठवण्यात आला होता तिचा पोलीस आणि गुप्तचर विभाग शोध घेत आहेत.