मुंबईमध्ये शासकीय भूमीवर २०० हून अधिक अवैध इमारती !

कारवाईविषयी प्रशासन उदासीन !

हा प्रकार अतिशय गंभीर असून अशा प्रकारे अनधिकृत बांधकाम करणारे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे यांवर सरकारने कठोर कारवाई करावी ! – संपादक

प्रतीकात्मक छायाचित्र

मुंबई – मुंबईमध्ये शासकीय भूमीवर २०० हून अधिक अवैध इमारती असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यांतील १८० हून अधिक बांधकामांना महानगरपालिकेने बांधकाम थांबवण्याची नोटीस दिली आहे; मात्र ती पाडण्यासाठी कारवाई करण्यात आलेली नाही. सामाजिक कार्यकर्ते इफ्तेकार शहा यांना माहिती आधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीतून हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

इफ्तेकार शहा यांनी या अवैध बांधकामांच्या विरोधात मुंबई महानगरपालिकेकडे तक्रार केली आहे. या तक्रारीनुसार मुंबईतील वर्साेवा कोळीवाडा या भागात भूमाफियांनी शासकीय भूमी लाटण्याची प्रक्रिया चालू केली आहे. ही भूमी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नावे आहे. पूर्वी या भूमीवर खाडी होती; मात्र त्यावर भराव टाकून बांधकाम करण्यात आले. खरेतर या भूमीवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यास अनुमती नाही. त्यामुळे या बांधकामाची नोंदणी होत नाही आणि बांधकामाची विक्री करतांना कोणत्याही प्रकारची ‘स्टॅम्प ड्युटी’ भरली जात नाही. हा भाग हरितपट्टयात असूनही दिवसेंदिवस या भूमीवरील अनधिकृत बांधकाम वाढत आहे. या अनधिकृत बांधकामांविषयी महानगरपालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही प्रशासन याकडे कानाडोळा करत आहे.