कोल्हापूर विभागीय मंडळात सातारा जिल्ह्याचा बारावीचा निकाल ९९.९१ टक्के !

(प्रतिकात्मक छायाचित्र)

सातारा, ६ ऑगस्ट (वार्ता.) – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने झालेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ३ ऑगस्ट या दिवशी घोषित झाला. यामध्ये कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये सातारा जिल्ह्याचा सर्वाधिक ९९.९१ टक्के निकाल लागला आहे.
कोरोनामुळे यावर्षी राज्य महामंडळाच्या परीक्षा रहित करण्यात आल्या होत्या. अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार निकाल घोषित करण्यात आले आहेत. यामध्ये कोल्हापूर जिल्हा ९९.५३ टक्के, सांगली ९९.६१ टक्के आणि सातारा जिल्हा ९९.९१ टक्के असा निकाल लागला आहे. गतवर्षी हा निकाल ९२.४२ टक्के लागला होता. ३५ सहस्र ६१९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यांपैकी ३५ सहस्र ५८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यात एकूण २४६ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. यामध्ये विज्ञान शाखेचा निकाल ९९.८५ टक्के, कला शाखेचा निकाल ९९.९३ टक्के, वाणिज्य शाखेचा निकाल ९९.९८ टक्के आणि व्यावसायिक शिक्षणाचा निकाल ९९.९३ टक्के लागला आहे, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.