यज्ञ सत्य, विरोध मिथ्य !

यज्ञ हे भारतीय संस्कृतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. प्राचीन काळी आपले ऋषिमुनी, संत, तसेच महापुरुष यांनी वेळोवेळी यज्ञ केले आहेत. कुठलेही प्रश्न किंवा समस्या यांचे हिंदु धर्मात परिपूर्ण उत्तर आहे. यज्ञ हे अशाच उत्तरांपैकी एक आहे. विशिष्ट उद्देशपूर्तीसाठी यज्ञ केला जातो. अशा यज्ञ संस्कृतीला प्रत्येक युगात राजाश्रय होता. तसेच ते यज्ञ करण्यासाठी तेवढ्या सात्त्विकतेचे पुरोहित होते, तसेच साधनसामुग्रीही उपलब्ध होती. तथापि मानवी जीवनाचा एक अंग असलेली ही यज्ञ संस्कृती गेल्या काही दशकांपासून मात्र लोप पावत चालल्याचे चित्र आहे. त्यामागे उपहास, टिंगलटवाळी, आवश्यक साधनसामुग्रींचा अभाव, ज्ञानाचा अभाव, राजाश्रयाचा अभाव आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हिंदूंमधील धर्मशिक्षणाचा अभाव, अशी काही प्रमुख कारणे आहेत. काही नास्तिकतावादी मंडळींकडून यज्ञाला खोटे ठरवण्यासाठी केला जाणारा विरोधही त्यास कारणीभूत आहे. अशातही यज्ञ संस्कृतीचे महत्त्व पुनःपुन्हा अधोरेखित होतेच. आताही मध्यप्रदेशमध्ये गायत्री शक्तीपीठ आणि गुजराती माळी समाजाची धर्मशाळा येथे २ दिवसांच्या एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये ३ प्रकारच्या आधुनिक वैज्ञानिक यंत्रांच्या साहाय्याने यज्ञाचे संशोधन, तसेच यज्ञाच्या परिणामांचे परीक्षण करण्यात आले. या परीक्षणातून यज्ञाचा मनुष्य आणि परिसर यांच्यावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे स्पष्ट झाले. इतकेच नव्हे, तर यज्ञयागामुळे मनुष्याचा ताणतणाव अल्प होण्यासमवेतच वातावरणातील प्रदूषणाची पातळीही न्यून होत असल्याचे निष्पन्न झाले. विशेष म्हणजे धर्मशाळेच्या ज्या खोलीत हे प्रयोग करण्यात आले, तेथे यज्ञापूर्वी प्रदूषणाचे घनत्व अधिक होते. यज्ञाच्या वेळी ते वाढले आणि यज्ञाच्या एका घंट्यानंतर ते जलद गतीने न्यून झाले. यज्ञाचा इतका प्रभावी परिणाम आहे. असे संशोधन प्रथमच झाले आहे, असे नाही, तर यापूर्वीही ते झाले आहे. वर्ष २००९ मध्ये ‘नॅशनल बॉटेनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट’ या संस्थेतील शास्त्रज्ञांच्या पथकाने उत्तरप्रदेशमधील लक्ष्मणपुरी (लखनौ) येथे यज्ञाचे असेच संशोधन केले होते. या संशोधनाअंती त्यांनी असा दावा केला की, हवनच्या वेळी उत्सर्जित होणारा धूर मोठ्या प्रमाणावर हवेतील जीवाणू न्यून करतो, ज्यामुळे संसर्गजन्य रोगांची शक्यता अल्प होते. अशी अनेक संशोधने झालेली आहेत. अशा प्रकारे यज्ञाचे वैज्ञानिकदृष्ट्या महत्त्व सिद्ध झाल्यावर तरी विज्ञानवादी त्यांचा यज्ञाला असलेला विरोध मागे घेऊन यज्ञाचे महत्त्व मान्य करण्याचा विवेक दाखवतील का ?, तसेच ‘आम्ही चुकलो’, हे मान्य करून मनाचा मोठेपणा दाखवतील का ? हे खरे प्रश्न आहेत.

यज्ञ करण्यामागे निरनिराळे उद्देश असतात. अर्थातच ते व्यापक असतात. म्हणूनच तर आजही भारतात अनेक ठिकाणी ‘पर्जन्ययाग’, ‘विश्वशांती यज्ञ’ आदी यज्ञ केले जातात. कुणाच्या घरात पाऊस पडावा किंवा एखाद्या वाड्यापुरतीच शांती निर्माण व्हावी, इतके यज्ञाचे संकुचित उद्देश नसतात, हे येथे प्रकर्षाने लक्षात घेतले पाहिजे. तथापि ‘क्रिकेटमध्ये भारत जिंकू दे’ किंवा ‘कुठल्या नेत्याची किंवा अभिनेत्याची प्रकृती सुधारू दे’, यांसाठी यज्ञ करायचा नसतो, हेही तितकेच खरे. भारतात अनेक ठिकाणी पाऊस न पडल्यास पर्जन्ययाग केला जातो आणि खरोखरच पाऊस पडतो, याची अनुभूती लाखो लोकांनी घेतली आहे. अशा वेळी पुरो(अधो)गामी, नास्तिकतावादी आदी मंडळी जिज्ञासेने ‘असे का होते ?’, हे जाणून घेण्याऐवजी त्यास विरोध करण्यातच धन्यता मानतात. किंबहुना असा विरोध करणे, हेच त्यांचे नास्तिकतावादाचे प्रमाणपत्र असते. आधुनिक विज्ञानाचा आधार घेऊन कृत्रिम पाऊस किंवा ‘आम्ल वर्षा’ (ॲसिड रेन) पाडण्याचे उद्योग यापूर्वी अनेकदा झाले; परंतु त्याच विज्ञानाने नंतर त्यांचे दुष्परिणामही सांगितले. हे सर्व प्रयोग अयशस्वी ठरले. परिणामी गेल्या काही वर्षांपासून कृत्रिम पाऊस किंवा आम्ल वर्षा पाडण्याचे उद्योग जवळपास बंद आहेत. विज्ञान निसर्गाच्या विरुद्ध जाऊन प्रयोग करत असल्याने त्यात त्याला कधीही निर्भेळ यश मिळत नाही. याउलट यज्ञ हे निसर्गनियमानुसार केल्याने त्यास कधी अपयश लाभत नाही. हिंदु धर्मशास्त्रानुसार आचरणामुळे उद्देशपूर्तीची अनुभूती लाखो हिंदूंनी घेतली आहे. यातच हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध होते.

असाच प्रकार अणू किरणांपासून निर्माण होणार्‍या अत्यंत हानीकारक वायूच्या संदर्भात पहावयास मिळतो. आज सर्वच मोठ्या राष्ट्रांकडे अणूबॉम्ब आहेत. आगामी युद्धात ते वापरले गेल्यास जगाचा विध्वंस होईल, इतकी त्यांची संहारकता आहे. दुसर्‍या महायुद्धाच्या शेवटी अमेरिकेने जपानवर टाकलेल्या अणूबॉम्बचे दुष्परिणाम जपानमधील पुढील काही पिढ्यांना भोगावे लागले होते. आताच्या आधुनिक युगात अशा बॉम्बचा वापर झाल्यास काय होईल, याची कल्पनाही अनेक देश करू शकत नाहीत किंबहुना हीच चिंता प्रत्येकाच्या मनात आहे. याचे उत्तर पुन्हा हिंदु धर्मातच सापडते. ते म्हणजे अग्निहोत्र करणे ! अग्निहोत्र हा यज्ञाचाच एक भाग असून ‘त्यामुळे वातावरणाची शुद्धी होऊन हानीकारक किरणांपासून एक प्रकारचे संरक्षणकवच निर्माण होते’, असे अनेक संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. अशी कुठली व्यवस्था विज्ञानाकडे आहे का ? यावरून विज्ञान विध्वंस करते, तर हिंदु धर्मशास्त्र समतोलता राखते, हेच यातून सिद्ध होते.

यज्ञ संस्कृतीला राजाश्रय हवा !

अनेक विरोध, टीका, उपहास वाट्याला येऊनही यज्ञ संस्कृती टिकून राहिली. अर्थात् विरोध करणार्‍यांची नावे काळाच्या पडद्याआड गेली. शेवटी काळाच्या कसोटीवर यज्ञच सत्य, तर विरोध मिथ्य ठरला ! ही यज्ञ संस्कृती जिवापाड जपून ठेवण्याचे श्रेय धर्माप्रती अढळ निष्ठा असणार्‍यांना द्यावे लागेल. पिढ्यान्पिढ्या त्यांनी ही गौरवशाली परंपरा जपली. आजच्या निधर्मी व्यवस्थेत मात्र यज्ञ संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा आपण जवळपास गमावला आहे. त्यामुळे विज्ञानाद्वारे महत्त्व सिद्ध झाल्यानंतर तरी यज्ञ संस्कृतीचे पुनरुज्जीवन होणे आवश्यक आहे. त्यासाठी यज्ञ संस्कृतीला राजाश्रय मिळायला हवा. जसे मोदी सरकारने आयुर्वेदासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले आहे, तसेच यज्ञ संस्कृतीसाठीही केले पाहिजे. तसे केले, तर भावी पिढीला दिलेली ही सर्वांत मोठी देणगी असेल !