सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शिवसेना सदस्यांचे ठिय्या आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांच्या आश्वासनानंतर मागे !

जिल्हा परिषद स्वनिधी वाटपात अनियमितता झाल्याचा आहे आरोप

आंदोलन केल्यानंतर कार्यवाही करण्याचे आश्वासन देणारे प्रशासन काय कामाचे ?

लोकप्रतिनिधींना आंदोलन करावे लागत असेल, तर सर्वसामान्य जनतेशी प्रशासन कसे वागत असेल ?

सिंधुदुर्ग – जिल्हा परिषदेच्या स्वनिधी वाटपात झालेली अनियमितता आणि याविषयी कोकण विभाग आयुक्तांनी चौकशी अहवाल पाठवण्यास सांगूनही होणारा चालढकलपणा यांमुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या सदस्यांनी २ ऑगस्टला थेट मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजीत नायर यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. या वेळी जिल्हा परिषदेच्या मनमानी कारभाराच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन ‘पुढील कार्यवाही येत्या ८ दिवसांत करू’, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात उपरोक्त विषयाचा सातत्याने पाठपुरावा करणारे सदस्य प्रदीप नारकर यांच्यासह गटनेते नागेंद्र परब, सदस्य तथा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, सदस्या स्वरूपा विखाळे, अमरसेन सावंत, मायकल डिसोझा, संजय आंग्रे, रोहिणी गावडे, वर्षा कुडाळकर, संपदा देसाई, वर्षा पवार, राजेश कविटकर आणि राजन मुळीक हे सदस्य उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी सदस्य प्रदीप नारकर यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे प्रत्येक सूत्रावर चर्चा केली, तसेच संबंधित अधिकार्‍यांकडून वस्तूस्थिती काय आहे ? याचा खुलासा करून घेतला.सदस्य नारकर यांनी स्वनिधी वाटपाविषयीच्या चौकशी अहवालाची मागणी केली होती. (लोकप्रतिनिधींना एका अहवालासाठी आंदोलन करावे लागत असेल, तर सर्वसामान्य जनतेशी प्रशासन कसे वागत असेल ? – संपादक) त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी नायर यांनी ‘ही चौकशी चालू आहे. ती झाल्यावर त्यावर मी माझे म्हणणे मांडून पुढील ८ दिवसांत अहवाल आयुक्त आणि शासन यांना सादर करणार आहे’, असे सांगितले.