‘कोळसा ब्लॉक’ वाटपासंबंधीचा प्रश्न पुन्हा पुढे ढकलल्याने विधानसभेत विरोधकांकडून गदारोळ

कोळसा ब्लॉक वाटपात १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप

विधानसभेत गदारोळ झाल्याने कामकाज स्थगित केले.

पणजी, ३० जुलै (वार्ता.) – ‘गोवा औद्योगिक विकास महामंडळा’ने वितरण केलेल्या ‘कोळसा ब्लॉक’ प्रक्रियेत १ सहस्र कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. उद्योगमंत्री विश्वजीत राणे यांनी ‘कोळसा ब्लॉक’ वाटपासंबंधीचा प्रश्न विधानसभेत उत्तरासाठी दुसर्‍यांदा पुढे ढकलल्याने विरोधक आक्रमक झाले. विरोधकांनी सभापतींसमोरील हौदात जाऊन उद्योगमंत्र्यांनी ‘कोळसा ब्लॉक’ वाटपासंबंधीच्या प्रश्नांना उत्तरे द्यावीत, अशी मागणी केली. विधानसभेत गदारोळ झाल्याने विधानसभेचे कामकाज सभापती राजेश पाटणेकर यांनी स्थगित केले.

विरोधकांच्या मते एकदा उत्तर देण्यासाठी पुढे ढकलण्यात आलेला प्रश्न पुन्हा दुसर्‍यांदा पुढे ढकलता येत नाही. विरोधकांनी शासनाकडून योग्य उत्तरे मिळण्यासाठी न्यायालयात जाण्याची चेतावणी दिली. ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई आणि अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी ‘गोवा शासन प्रश्न वारंवार पुढे ढकलून काहीतरी लपवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहे’, असा आरोप केला.