पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बातम्या केल्यास अपकीर्ती कशी होते ? – मुंबई उच्च न्यायालय

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या अटकेच्या वृत्तांतून अपकीर्ती होत असल्याप्रकरणी न्यायालयात याचिका

मुंबई – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीवरून माध्यमांनी बातम्या दिल्या आहेत. त्याला आव्हान कसे दिले जाऊ शकते ? पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बातम्या केल्यास अपकीर्ती कशी होते ?, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केला आहे. अश्लील व्हिडिओ प्रकरणी उद्योगपती राज कुंद्रा यांना झालेल्या अटकेनंतर सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसिद्ध झालेल्या मानहानीकारक बातम्यांना मज्जाव करावा, यासाठी राज कुंद्रा यांच्या पत्नी शिल्पा शेट्टी यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे.

यामध्ये त्यांनी सामाजिक माध्यमांसह वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या यांना प्रतिवादी केले आहे. वृत्तपत्रांचा खप वाढावा, यासाठी वृत्तपत्रे रंजक पद्धतीने वृत्ते प्रसिद्ध करत असल्याचा आरोप शिल्पा शेट्टी यांनी केला आहे. यावर झालेल्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने ‘शिल्पा शेट्टी या सार्वजनिक जीवन जगत आहेत. त्यांच्याविषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य असते. माध्यमांनी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज कुंद्रा यांच्या अन्वेषणाविषयीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या असतील, तर त्यातून अपकीर्ती कशी होऊ शकते ? हे म्हणजे ‘शिल्पा शेट्टी यांच्याविषयी काहीच बोलू नका’, असे सांगण्यासारखे आहे. पतीच्या विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यामध्ये न्यायालय कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करणार नाही.’