गुरुसेवेची तळमळ आणि गुरूंप्रती दृढ श्रद्धा असलेले पुणे येथील चि. केतन कृष्णा पाटील अन् कुटुंबियांना आधार देणार्‍या चि.सौ.कां. स्नेहल श्रीशैल गुब्याड !

आषाढ कृष्ण पक्ष षष्ठी, कलियुग वर्ष ५१२३ (२९.७.२०२१) या दिवशी पुणे येथील चि. केतन पाटील आणि सोलापूर येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. स्नेहल गुब्याड यांचा शुभविवाह पुणे येथे होत आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. केतन पाटील आणि चि.सौ.कां. स्नेहल गुब्याड यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

चि. केतन पाटील यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये 

 

सौ. केतकी पाटील (चि. केतन यांची आई), सिंहगड रस्ता, पुणे.

१. आईला घरकामात साहाय्य करणे

‘केतन मला घरकामात साहाय्य करतो. तो घरातील विजेची उपकरणे दुरुस्त करतो. त्याला स्वच्छतेची कामे करतांना लाज वाटत नाही. तो काही खाद्यपदार्थ बनवायला शिकला आहे. मला कधी बरे वाटत नसल्यास तो मला तत्परतेने साहाय्य करतो.

२. अल्प अहं

तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना शेवटच्या वर्षी त्याचा ‘आदर्श विद्यार्थी’ म्हणून महाविद्यालयात गौरव करण्यात आला. तेव्हा त्याला याचे अप्रूप वाटले नाही.’ (जुलै २०२१)


श्री. कृष्णा पाटील (चि. केतन यांचे वडील, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), सिंहगड रस्ता, पुणे.

१. ‘केतनचे रहाणीमान साधे आहे. ‘मला अमुक प्रकारचे कपडे हवेत’, असा त्याचा विचार नसतो.

२. काटकसरी

तो अधिक मूल्य असलेल्या वस्तू वापरत नाही. एखादी वस्तू बिघडल्यास ‘ती अल्प दरात दुरुस्त कशी करता येईल ?’, यासाठी तो प्रयत्न करतो.

३. गुरुसेवेची तळमळ

तो विविध प्रकारच्या सेवा करतांना त्यांतील बारकावेही समजून घेतो. ‘गुरुदेवांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) आपल्याला सेवा दिली आहे’, असा त्याचा भाव असतो. गुरुदेवांना अपेक्षित अशी सेवा करण्याची त्याची धडपड असते. तो ‘व्यावहारिक कामे, विश्रांती घेणे आणि भोजन करणे’, यांपेक्षा सेवेला प्राधान्य देतो.

४. त्याला चूक सांगितल्यास तो ती लगेच मनापासून स्वीकारतो.

५. गुरुदेवांप्रतीच्या श्रद्धेच्या बळावर कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याची त्याची सिद्धता असते.’ (जुलै २०२१)


सौ. कीर्ती जाजडा (चि. केतन यांची मोठी बहीण), चिंचवड, पुणे.

१. उत्तम निरीक्षणक्षमता आणि अभ्यासू वृत्ती

‘केतन एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर तेथील प्रत्येक गोष्टीचे आध्यात्मिक दृष्टीकोनातून निरीक्षण करतो. एखाद्या मंदिरात गेल्यावर ‘तेथे नेमकी कोणती स्पंदने जाणवतात ?’, याचा तो अभ्यास करतो.

२. जवळीक साधणे

केतनच्या बोलण्यात सहजता आहे. तो सहसाधकांशी मोकळेपणाने बोलतो. त्यामुळे त्याची अनेक साधकांशी जवळीक आहे.

३. त्याने एखाद्या सेवेचे दायित्व घेतल्यावर ती सेवा परिपूर्ण होण्यासाठी तो भावपूर्णरित्या प्रयत्न करतो.

४. त्याच्या शरिरावर काही ठिकाणी ‘ॐ’ चिन्ह उमटले आहे.

५. भाव

त्याचा गुरुदेवांप्रती भाव आहे. त्याला अनेक वेळा संतसेवा करण्याचे भाग्य लाभले आहे. तो प.पू. आबा उपाध्ये यांची सेवा मनापासून करत असे. तो त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे लिहून ठेवत असे.’ (जुलै २०२१)


चि.सौ.कां. स्नेहल गुब्याड यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

 

श्रीमती शशिकला गुब्याड (चि.सौ.कां. स्नेहल यांची आई), सोलापूर

१. समाधानी आणि आनंदी

‘स्नेहल एका नामांकित महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असतांना वसतीगृहात रहात होती. तिने कधीच तिच्या मैत्रिणींप्रमाणे कपड्यांसाठी किंवा अन्य सुखसोयींसाठी हट्ट केला नाही. तिच्याजवळ जे आहे, त्यात ती समाधानी आणि आनंदी असायची.

२. ती आवश्यक असल्यासच पैसे व्यय करते किंवा नवीन वस्तू घेते.

३. विचारण्याची वृत्ती

तिने आजपर्यंत कधीच कोणताही निर्णय स्वतःच्या मनाने घेतला नाही. ती एखादा पोशाख घेण्याच्या संदर्भातही मला विचारते.

४. दोन वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा ती पुष्कळ स्थिर होती. तिच्या ३ लहान बहिणी आणि भाऊ यांना तिचाच आधार वाटत होता.

५. ती लहान वयातच संपूर्ण कुटुंबाचे दायित्व सांभाळत आहे.’

(जुलै २०२१)


कु. शिवलीला गुब्याड (चि.सौ.कां. स्नेहल यांची लहान बहीण, वय २३ वर्षे )

१. ताईने देवतांची चित्रे काढणे आणि ती चित्रे पाहून सर्वांचा भाव जागृत होणे

‘ताईला चित्रे काढण्याची आवड आहे. ताईने पांडुरंग-रुक्मिणी, राधा-कृष्ण आदी देवतांची चित्रे रेखाटली आहेत. तिने रेखाटलेली चित्रे पहातांना सर्वांचा भाव जागृत होतो. या चित्रांमधून तिचा भगवंताप्रतीचा शरणागतभाव लक्षात येतो.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव

‘विवाहापूर्वी आणि विवाहानंतरही साधना करण्यासाठी पूरक कुटुंब मिळाले आहे अन् आपत्काळात सेवा करण्याची संधी मिळत आहे’, यासाठी तिला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘गुरुदेवांनीच सर्वकाही दिले आहे’, असा तिचा भाव असतो.’ (जुलै २०२१)


कु. श्रेया गुब्याड (चि.सौ.कां. स्नेहल यांची लहान बहीण, वय २० वर्षे), कु. सावित्री गुब्याड (लहान बहीण, वय १७ वर्षे) आणि कु. मल्लिनाथ गुब्याड (लहान भाऊ, वय १५ वर्षे)

भावंडांना साधनेत साहाय्य करणे

१. ‘माझे (श्रेयाचे) बारावीचे वर्ष संपल्यावर ताईने वेळ देऊन मला सेवा करण्यासाठी एक नवीन प्रणाली शिकवली. नंतर मी केलेली सेवा पडताळून ती सुधारणाही सांगायची.

२. ताईने मला (सावित्रीला) तांत्रिक सेवा, बालसंस्कारवर्ग घेणे इत्यादी सेवा वेळ देऊन शिकवल्या.

३. ताई मला (मल्लिनाथला) व्यष्टी आणि समष्टी साधनेच्या प्रयत्नांविषयी वेळोवेळी सांगत असते.

४. आमच्याकडून असमंजसपणे काही चुका झाल्यास ताई आरंभी प्रेमाने, नंतर रागावून आणि तरीही आमच्यात पालट झाला नाही, तर शिक्षा देऊन आम्हाला त्यांची जाणीव करून देते. ‘आमची प्रत्येक कृती योग्य व्हायला हवी’, यासाठी ताई प्रयत्नरत असते.’ (जुलै २०२१)


चि. केतन पाटील आणि चि.सौ.कां. स्नेहल गुब्याड यांची पुणे येथील साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

चि. केतन पाटील यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सौ. मनीषा पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे

सेवाभाव : ‘एखाद्या सेवेत साहाय्य हवे असल्यास किंवा तातडीची सेवा आल्यास आम्हाला सर्वप्रथम केतनदादाचे नाव आठवते. त्याला ती सेवा जमणार असल्यास तो लगेच साहाय्य करतो. त्याला काही कारणास्तव एखादी सेवा जमणार नसल्यास तो तसे प्रांजळपणे सांगतो. तो नंतरही आठवणीने ‘त्या सेवेत कुणाचे साहाय्य मिळाले ना ? ती सेवा पूर्ण झाली ना ?’, असे विचारतो.’ (जुलै २०२१)


श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के), पुणे

१. ‘केतन कष्टाळू आहे. तो कोणतीही शारीरिक किंवा बौद्धिक सेवा झोकून देऊन करतो.

२. तो भाववृद्धी सत्संगातील सूत्रे घरातील फलकावर लिहितो आणि आठवडाभर त्याप्रमाणे प्रयत्न करतो.’ (जुलै २०२१)


चि.सौ.कां. स्नेहल गुब्याड यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

सौ. मनीषा पाठक, पुणे

१. सेवेची तळमळ

अ. ‘जुलै २०१९ मध्ये स्नेहलताई नोकरीनिमित्त पुण्यात रहायला आली. त्यानंतर तिने पुढाकार घेऊन ‘सोशल मिडिया’द्वारे (सामाजिक माध्यमांद्वारे) प्रसाराची सेवा करायला आरंभ केला.

आ. ती एका मोठ्या आस्थापनात नोकरी करते. ती नोकरी सांभाळून सेवा आणि त्या सेवेशी संबंधित साधकांशी तळमळीने समन्वय करते. अनेक साधकांना तिचा आधार वाटतो.

२. तिने चिकाटीने साधनेचे प्रयत्न करून संतांचे मन जिंकले आहे.

. अल्प अहं : ती ‘इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर’ आहे. ती शिकत असलेल्या शाखेतून तिच्या महाविद्यालयात तिचा दुसरा क्रमांक आला. त्यासाठी तिला रौप्य पदक मिळाले; पण तिच्या बोलण्यात आणि वागण्यात याविषयी कुठेही अहं जाणवत नाही.

४. एका सत्संगात एका संतांनी सांगितले, ‘‘स्नेहल अष्टपैलू आहे.’’

५. भाव : परात्पर गुरु डॉक्टरांविषयी बोलतांना तिचा भाव जागृत होतो. ‘जीवनात कठीण प्रसंग येऊनही संत आणि सद्गुरु यांच्या सत्संगामुळे मी साधनेत टिकून आहे’, असा तिचा भाव असतो.’ (जुलै २०२१)


श्री. महेश पाठक, पुणे

१. ‘तिच्यात ‘प्रत्येकाशी जुळवून घेणे आणि नम्रतेने बोलणे’ हे गुण आहेत. त्यामुळे ती सर्व साधकांना आपलीशी वाटते.

२. सेवेची तळमळ : ‘प्रत्येक साधकाला ‘सोशल मिडिया’ची सेवा शिकता यावी’, या तळमळीमुळे तिने अनेक ‘ऑनलाईन’ कार्यशाळा घेतल्या.’ (जुलै २०२१)


सौ. राजश्री खोल्लम, पुणे

१. ‘तिला सत्संगाची एखादी ‘पोस्ट’ बनवायला सांगितली, तर ती काही मिनिटांतच ‘पोस्ट’ बनवून पाठवते. ती अचूक सेवा करते.

२. तिचा विवाह जवळ आल्याने तिला ‘एखादी सेवा जमेल का ?’, असे विचारल्यास तिची आनंदाने सेवा करण्याची सिद्धता असते.’

(जुलै २०२१)

 

उखाणे

वधू आणि वर या दोघांसाठी उपयोगी पडतील, असे उखाणे
धर्म-अर्थ-काम-मोक्ष साधून पुरुषार्थ चार ।
गुरुकृपेने  … सह व्हावा हा भवसागर पार ॥

ज्ञान आणि योग यांपेक्षा श्रेष्ठ आहे भक्ती ।
…सह संसार करतांना राहो निष्ठा गुरुचरणांप्रती ॥