बहिणी बनल्या वैरिणी !

मेघालय, मिझोराम, मणीपूर, नागालँड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या ईशान्येतील ७ राज्यांना ‘७ बहिणी’ असे संबोधले जाते; मात्र या ‘७ बहिणीं’चा एकमेकींशी असलेला सीमावाद आणि त्यातून होत असलेला हिंसाचार पहाता ‘त्या बहिणी नाहीत, तर वैरिणी आहेत’, असेच खेदाने म्हणावे लागेल. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे ३ दिवसांपूर्वी सीमावादावरून मिझोराम पोलिसांनी आसाम पोलिसांवर केलेला गोळीबार होय. या गोळीबारात आसामचे ६ पोलीस ठार झाले. एखाद्या देशात अंतर्गत सीमावाद किंवा कलह असूही शकतो; मात्र त्याचे पर्यवसान हिंसाचारात होणे, हे लज्जास्पद आहे. या सीमावादात आसामचे ६ पोलीस ठार झाले आहेत. भारतातील पोलीस हे धर्मांध, समाजकंटक किंवा राजकारणी यांच्याकडून मार खात असल्याची वृत्ते आपण वाचली होती. आता पोलीसच पोलिसांवर बंदूक उगारून जीव घेऊ लागले आहेत, हे चित्र विदारक आहे. जी बंदूक कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी दिली जाते, त्याच बंदुकीतून स्वतःच्याच सहकार्‍यांवर गोळी मारण्याची बुद्धी पोलिसांना का झाली ? प्रांतवादातून निर्माण झालेला पराकोटीचा द्वेष, हे त्यामागील एक कारण म्हणता येईल. पोलीसच जर पोलिसांचा जीव घेऊ लागले, तर जनतेचे रक्षण कोण करणार ? प्रांतीय अस्मिता असायला हवी; मात्र ती राष्ट्रीय अस्मितेपेक्षा वरचढ होऊ न देणे महत्त्वाचे. या सूत्राचे पोलिसांना विस्मरण झालेले दिसते.

गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसांना श्रद्धांजली देताना आसामचे मुख्यमंत्री

‘आसामचे पोलीस मिझोराममधील गावात घुसले’, असे मिझोरामचे म्हणणे आहे. त्यात तथ्यही असेल. असे असले, तरी त्यांच्यावर थेट गोळीबार करणे, हा सद्सद्विवेकबुद्धी गहाण ठेवल्याचा प्रकार आहे. सध्या भारताच्या अंतर्गत सुरक्षेचे तीन तेरा वाजले असतांना सर्वच राज्यांतील पोलिसांमध्ये उत्तम समन्वय साधण्यासाठी परस्पर विश्वास आणि सौहार्दपूर्ण वातावरण निर्माण होणे आवश्यक आहे; मात्र सीमावादामुळे भारतातील पोलिसांमध्येच वैर वाढत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या सूत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या गोळीबारानंतर प्रसारमाध्यमे, विरोधक आणि सरकारी यंत्रणा यांनी सर्व लक्ष आसाम-मिझोराम सीमावादावर केंद्रित केले. ते आवश्यकही होते; मात्र त्याहून अधिक पोलिसांनी पोलिसांवर केलेला गोळीबार हे सूत्रही तितक्याच गांभीर्याने चर्चिले जाणे आवश्यक होते; कारण सीमावादात जर सुरक्षायंत्रणांतील एक घटक एकमेकांच्या विरोधात उभा ठाकला, तर देशावर ओढवलेली मोठी नामुष्की आहे. ईशान्येकडील राज्ये ही भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहेत. त्या राज्यांमध्ये जर अशा प्रकारे सीमावाद धुमसू लागला, तर चीन त्याचा नक्कीच अपलाभ उठवेल. अशा वेळी या सीमावादावर तोडगा काढणे आणि सुरक्षायंत्रणांमध्ये सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे हे दुहेरी आव्हान सरकारसमोर आहे.

सीमावाद का धुमसत आहे ?

ईशान्येतील राज्यांसाठी सीमावाद ही काही नवीन गोष्ट नाही. हा वाद १०० ते १५० वर्षे जुना आहे. आसामचा अरुणाचल प्रदेश आणि मेघालय यांच्याशी सीमावाद आहे, तर त्रिपुरा अन् मिझोराम यांच्यात सीमेवरून वाद चालू आहे. वर्ष १९६५ मध्ये आसाम आणि नागालँड येथील नागरिकांमध्ये हिंसाचार झाला होता. वर्ष १९९२ मध्ये आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील लोकांमध्ये सीमावादावरून हिंसाचार झाला होता. हिंसाचाराची ही काही मोजकी उदाहरणे आहेत. या राज्यांमध्ये उफाळून आलेल्या सीमावादाने बहुतांश वेळा हिंसक वळण घेतले आहे, हे येथे विशेषत्वाने नमूद करावेसे वाटते.

आसाम राज्याचे विघटन होऊन अन्य छोटी छोटी राज्ये निर्माण झाली. आसामचे म्हणणे आहे की, स्वातंत्र्यानंतर राज्यांच्या अंतर्गत जे सीमांकन करण्यात आले, त्याला मान्यता देण्यात यावी; मात्र मिझोराम आणि नागालँड यांना इंग्रजांच्या काळात जे सीमांकन करण्यात आले, त्याला मान्यता द्यावी, असे वाटते. महत्त्वाचे म्हणजे या सीमावादाच्या संदर्भातील खटला गेली काही वर्षे सर्वाेच्च न्यायालयात पडून आहे. त्याचा निकाल लागल्यास हा सीमावाद सुटण्याची शक्यता आहे. स्वातंत्र्यानंतर ईशान्येकडील राज्ये दुर्लक्षिली गेली. या राज्यांच्या भाषा, संस्कृती आणि परंपरा वेगवेगळ्या आहेत. तेथे वेगवेगळ्या जामातींचे लोक वास्तव्य करतात. त्यामुळे तेथील सीमावाद सोडवणे कठीण बनले आहे, असे काही तज्ञांचे मत आहे.

राष्ट्रीय अस्मिता निर्माण करा !

व्यक्तीपेक्षा समाज आणि समाजापेक्षा राष्ट्राचे हित हे महत्त्वाचे असते आणि कुठल्याही नागरिकाने त्याला प्रथम प्राधान्य देणे अपरिहार्य आहे. आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी ईशान्येकडील राज्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे ते तेथील नागरिकांमध्ये राष्ट्रीय अस्मिता निर्माण करू शकले नाहीत. सीमावादाच्या या समस्येला घुसखोरी आणि धर्मांतर यांचीही किनार आहे. आसाममध्ये वास्तव्य करणारे बांगलादेशी घुसखोर मिझोराममध्ये घुसखोरी करू इच्छित आहेत. त्याला मिझो लोकांचा विरोध आहे. आसामच्या सीमेवरील गावे मुसलमानबहुल असून तेथे राष्ट्रविघातक कारवायांना उत आला आहे. मिझोराममध्ये ८७ टक्के लोक ख्रिस्ती आहेत. तेथे ख्रिस्ती धर्मप्रचारकांना मोकळे रान मिळाले आहे. या सर्व गोष्टीही विचारात घेणे आवश्यक आहे.

एकूणच या सीमावादाला विविधांगी पदर आहेत. ही समस्या सोडवणे क्लिष्ट आहे; मात्र अशक्य नक्कीच नाही. इस्रायलची निर्मिती झाली, त्या वेळी जगभरातील ज्यू तेथे वास्तव्यासाठी आले. त्या सर्वांची भाषा, संस्कृती आणि सामाजिक पार्श्वभूमी वेगळी होती; मात्र ‘ज्यूंचे राष्ट्र’ या एकाच विचाराने ते झपाटले असल्यामुळे त्यांच्यातील मतभेद ते विसरू शकले. भारतात असे का होऊ शकत नाही ? प्रत्येक नागरिकांत राष्ट्रीय अस्मिता रूजली की, त्याच्यातील प्रांतवाद, भाषावाद फिके पडतात आणि ‘राष्ट्राचा उत्कर्ष’या एकाच धाग्यात ते बांधले जातात. भारतात असे चित्र दिसण्यासाठी सर्वच स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे !