सामाजिक माध्यमांतून विचारले जाताहेत प्रश्न !

  • चिपळूणच्या महापुराला केवळ निसर्गच उत्तरदायी आहे ? कि अन्य कारणे…
  • चिपळूण येथील महापुराची परिस्थिती !
प्रतिकात्मक छायाचित्र

‘२१ जुलैच्या उत्तररात्री पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. चिपळूणमध्ये पाणी भरणे, ही तशी काही नवीन गोष्ट नाही, तरीही प्रतिवर्षी किती पाऊस पडेल ?  किती पाणी भरू शकते ?, याचेही नागरिकांचे सर्वसाधारण गणित आहे. २१ जुलैलाच व्हॉट्सॲपवर ‘२२ जुलैला सकाळी ११ वाजता कोळकेवाडी धरणातून पाणी सोडण्यात येणार आहे’, असा ‘मेसेज’ फिरत असला, तरी सकाळी उठल्यावर आवराआवर करता येईल, अशा अंदाजाने नागरिक आणि व्यापारी निर्धास्तपणे झोपले होते.

मात्र २२ जुलैच्या पहाटेपासून चिपळूण शहरात अचानक पाणी भरू लागले. रस्त्यांवर हे पाणी १० फूट आल्यानंतर सर्वांचे धाबे दणाणले होते. पाण्यासमवेत वस्तू, ओंडके, साप, मगरी, हातगाड्या, दुचाकी, चारचाकी, कोंबड्यांचे पिंजरे अशा अनेक वस्तू वहात होत्या. पहाटे पाच वाजल्यापासून वीज आणि भ्रमणभाषची रेंज गायब झाली. टाक्यांतील पाणी संध्याकाळपर्यंत संपले. २३ जुलैच्या सकाळी ९ पासून पाणी ओसरले.

‘चिपळूणच्या या परिस्थितीला निसर्ग उत्तरदायी आहे’, असे म्हणून चालणार नाही. संबंधित शासनयंत्रणेला खडसवायला हवे.

१. पहाटे लोक झोपेत असतांना पाणी सोडण्याची सूचना कुणी केली?

२. शासनयंत्रणेने पूर्वसूचना ध्वनीक्षेपकावरून का दिली नाही?

३. अवकाशात फिरत असलेल्या उपग्रहांकडून येणार्‍या माहितीचे विश्लेषण करून लोकांना सावध का केले गेले नाही?

४.  गेली ५ वर्षे वाशिष्ठीचा पूल धोकादायक झाल्याचे ठाऊक असूनही नवीन पूल योग्य वेळी का पूर्ण होऊ शकला नाही ?

५. महामार्गाच्या रखडलेल्या कामाचे दायित्व कुणाचे आहे ?

६.  घाट रस्ता अपूर्ण केल्यामुळे सैल झालेली दरड कोसळून झालेल्या हकनाक मृत्यूंना उत्तरदायी कोण ?

७. अचानक अमर्याद पाणी सोडल्यामुळे बेसावध नागरिक आणि व्यापारी यांच्या संपत्तीच्या हानीला उत्तरदायी कोण ?

८. वाशिष्ठीचा घाट पक्क्या बंधार्‍याने बांधून शहर सुरक्षित करण्याचा प्रस्ताव रखडला. त्याला उत्तरदायी कोण ?