१. गुरुसेवेची तळमळ
‘माझे मेहुणे (बहिणीचे यजमान) श्री. बबन वाळुंज रुग्णाईत असतांनाही पत्नी आणि मुलगी यांना पंचांग वितरणाविषयी सांगत होते, तसेच ते रुग्णालयात भरती होईपर्यंत पंचागांची सेवा करत होते.
२. संतांनी सांगितलेला जप करणे
श्री. वाळुंज यांच्या छातीत दुखत असल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती केले. ‘त्यांची स्थिती गंभीर आहे’, याची मला जाणीव झाली. तेव्हा मी मेहुण्यांसाठी रामनाथी आश्रमातील माझ्या भावाला भ्रमणभाष केला. भावाने आश्रमातील संतांना विचारून आध्यात्मिक स्तरावरील उपाय सांगितले आणि मेहुण्यांना जप करण्यास सांगितले. तेव्हा त्यांनी तो जप केला.
३. इतरांचा विचार करणे
पहिले २ दिवस ते रुग्णालयात ‘कोरोना’ विभागात असल्यामुळे आम्हाला तेथे जाता येत नव्हते. तेव्हा घरच्यांना काळजी वाटू नये; म्हणून त्यांनी २ वेळा दूरभाष करून ‘मी व्यवस्थित आहे’, असे सांगितले.
४. संतांप्रतीचा भाव
श्री. वाळुंज सनातनचे साधक असल्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती केल्यानंतर त्यांची स्थिती खराब असतांनाही त्यांनी विचारले, ‘‘सद्गुरु अनुराधा वाडेकर यांना मी रुग्णालयात असल्याचे सांगितले का ?’’ त्यांनी लगेच सद्गुरु अनुराधाताईंना कळवण्यास सांगितले. सद्गुरु अनुताईंना कळवल्यावर त्यांना प्रतिदिन त्यांच्या प्रकृतीचा आढावाही देऊ लागलो.
५. रुग्णाईत अवस्थेत असतांनाही भावाच्या स्थितीत रहाणे
रुग्णालयात भरती होण्याआधी काही आठवडे त्यांना भजनांच्या भावपूर्ण पंक्ती सुचत होत्या. ‘त्यांचा गुरूंप्रती भावही वाढत आहे’, हे लक्षात आले. ‘रुग्णाईत अवस्थेत असतांनाही ते भावाच्या स्थितीत आहेत’, याची मला जाणीव होत होती.
६. तोंडवळ्यावर ताण नसणे
ते रुग्णाईत असतांनाही ‘मला काही झाले, तर कसे होईल ?’, असे नकारार्थी विचार करत नव्हते किंवा त्यांच्या तोंडवळ्यावर तसा ताणही नव्हता. गुरुदेवांनी त्यांना एवढी शक्ती दिली की, त्यांना आजाराचे काहीच वाटले नाही.
– श्री. प्रकाश शिंदे (मेहुणे), डोंबिवली (प.), जिल्हा ठाणे.