४.६.२०२० या दिवशी जळगाव येथील सौ. शोभा अनिल हेम्बाडे (वय ५१ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले. (वर्ष २०२१ मध्ये सौ. शोभा हेम्बाडे यांची पातळी ६३ टक्के आहे. – संकलक) त्यानिमित्त त्यांचे कुटुंबीय, तसेच अन्य नातेवाईक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
श्री. अनिल हेम्बाडे (पती)
१. इतरांचा विचार करणे
सौ. शोभामध्ये आरंभापासूनच इतरांचा विचार करण्याची वृत्ती आहे. आमच्या घरात १० सदस्य होते. सौ. शोभा घरकाम आणि सर्वांचे करून आमच्या गतीमंद मुलीचे (प्रज्ञाचे) सर्व काही करत आहे. तिला स्वतःचा विचार करायला कधीच वेळ मिळाला नाही. मला पूर्वीपासूनच इतरांनी सर्व वस्तू माझ्या हातात द्याव्या लागायच्या. आतापर्यंत ती हे सर्व करत आली आहे.
२. मायेतील वस्तूंचे
आकर्षण नसणे आणि परिस्थिती स्वीकारणे
आधीपासूनच तिची मायेतील आसक्ती अल्प आहे. ‘मी तिच्यासाठी साड्या आणि अलंकार घ्यावेत’, अशी तिची कधीच अपेक्षा नसते. आतापर्यंत २ – ३ वेळा घरातील अडचणींमुळे किंवा मुलीच्या रुग्णालयाच्या व्ययासाठी तिचे अलंकार मोडावे लागले; पण तिने ते आनंदाने स्वीकारले.
३. इतरांसाठी त्यागमय जीवन जगणे
तिला पूर्वीपासून हवे तेव्हा माहेरी जाता आले नाही. तिच्या भावाच्या विवाहालाही आमचे आयत्या वेळी विवाहस्थळीच जाणे झाले; मात्र याविषयी तिने कधी गार्हाणे केले नाही. आतापर्यंत तिने इतरांसाठी स्वतःच्या सर्वच गोष्टींचा त्याग केला आहे. मी तिच्या त्यागाला वंदन करतो.
ईश्वराने आपत्काळात आम्हाला भरभरून आनंद दिला. त्याविषयी परात्पर गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
श्री. देवेंद्र हेम्बाडे (मुलगा)
१. लहान मुले, प्राणी आणि झाडे यांची प्रेमाने काळजी घेणे
आईकडे लहान मुले पुष्कळ आनंदाने जातात. ती घराशेजारील लहान मुलांशी स्वतःहून बोलून त्यांची प्रेमाने विचारपूस करते. ती घरी पाळलेल्या कुत्र्यालाही पुष्कळ प्रेमाने सांभाळते. ती त्याचे जेवण आणि फिरवणे, सर्व वेळेत करते. तिला शारीरिक त्रास असूनही ती वेळ मिळेल, तशी अंगणात लावलेल्या झाडांची काळजी घेते.
२. गतीमंद मुलीची शांत राहून काळजी घेणे
प्रज्ञाची (बहिणीची) पुष्कळ चिडचिड होत असते. ती आईला पुष्कळ त्रास देते. कधी कधी मारतेही, तरीही आई हे सर्व स्वीकारून नामजपादी उपाय करून तिला शांत करण्याचा प्रयत्न करते.
३. आईच्या कुणाकडूनही काही अपेक्षा नसतात.
४. साधक आणि नातेवाईक यांना योग्य दृष्टीकोन देऊन आधार देणे
मी नकारात्मक स्थितीत असतांना आई मला योग्य दृष्टीकोन देते. आईचे बोलणे पुष्कळ आपुलकीचे असते. त्यामुळे साधक आणि नातेवाईक आईशी मनमोकळेपणाने बोलतात.
श्री. सागर शिंदे (भाचा), जळगाव
मामींमधील चैतन्यामुळे आवरण न्यून होऊन आपोआप नामजप आणि प्रार्थना होणे
मी २ दिवसांपूर्वी मामींच्या घरी गेलो होतो. तेथे असतांना माझी प्रार्थना आणि नामजप आपोआप चालू झाला. मला तेथे पुष्कळ आनंद मिळाला आणि माझा कृतज्ञताभाव जागृत झाला. तेव्हा ‘असे कशामुळे झाले ?’, ते मला समजले नाही. मामींची आध्यात्मिक पातळी ६२ टक्के घोषित झाल्यावर माझ्या लक्षात आले, ‘मामींमधील चैतन्यामुळे माझ्यावरील त्रासदायक आवरण दूर झाले आणि मी ईश्वराचे चैतन्य ग्रहण करू शकलो.’
श्री. विशाल पवार (भाचा), जळगाव
१. घरात येणार्या साधकांना मामींनी आईचे प्रेम देणे
मुले लहान असतांना त्यांचा सांभाळ करतांना मामींची पुष्कळ धावपळ होत असे. त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे शेजारचे लोक मुलांना सांभाळण्यासाठी साहाय्य करायचे. वर्ष १९९७ – ९८ पासून सनातनचे कार्य जळगाव येथे चालू झाल्यावर मुंबईतून अनेक साधक प्रसारासाठी येऊ लागले. त्या वेळी मामींनी घरातील व्यक्तींची कामे करण्यासह साधकांचेही सर्व प्रेमाने केले. साधक ‘मामी आमच्या आई आहेत’, असे सर्वांना सांगायचे, ते केवळ मामींमधील प्रेमामुळे !
२. देवावरील श्रद्धा वाढणे
त्या वेळी घरात कुटुंबीय, नातेवाईक आणि साधक एवढी माणसे असूनही घरी असलेल्या किराणा साहित्यातच देवाने सगळ्यांचे भागवले. त्यामुळे मामींच्या देवावरील श्रद्धेत आणखी वृद्धी झाली.
३. मामींची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर माझे वडील आणि माझी पत्नी यांची भावजागृती होऊन त्यांचे भावाश्रू येणे
माझे वडील फारशी साधना करत नाहीत, तसेच माझी पत्नीही साधनेत नवीन आहे. तिला ‘भावजागृती म्हणजे काय ? भावाश्रू कसे येतात ?’, याविषयी जिज्ञासा होती. मामींची आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर माझे वडील आणि पत्नी यांच्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. त्या वेळी पत्नीने मला सांगितले, ‘‘भावजागृती म्हणजे काय ?’, हे आज मी अनुभवले.’’
सौ. मोहिनी विशाल पवार (भाचेसून)
१. मुलीसारखे सांभाळणे
‘माझी प्रसुती झाल्यावर आमच्या घरी कुणी करण्यासारखे नसल्याने आम्ही मामींकडे पंधरा दिवस गेलो होतो. त्या वेळी मामा आणि मामी यांनी मला स्वतःच्या मुलीसारखे सांभाळले.
२. त्यांना घरात अनेक अडचणी असतांनाही त्यांच्या व्यष्टी साधनेत कधीही खंड पडला नाही. (जून २०२०)
आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित झाल्यावर जळगाव येथील सौ. शोभा हेम्बाडे यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !‘माझी आध्यात्मिक पातळी घोषित झाल्यावर मला गुरुमाऊलीविषयी पुष्कळ कृतज्ञता वाटली. देवाने मला जवळ घेतले. त्याविषयी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! मी देवाकडे आजपर्यंत एकच मागितले आहे, ‘देवा, तू मला मायेतील सर्व गोष्टी दिल्या आहेस. आता मला काही नको. तू मला केवळ तुझ्याजवळ घे आणि प्रारब्ध सहन करण्यासाठी शक्ती दे.’ मी प्रत्येक वेळी देवाला हेच सांगत होते. घरी काही प्रसंग घडल्यावर मी अस्थिर झाल्यास माझा मुलगा मला सांगत असे, ‘‘आई, तू आमच्यात अडकू नकोस. तू परात्पर गुरुदेवांना शरण जा.’’ मला याचा पुष्कळ लाभ झाला. मी देवालाच शरण जाऊन सर्व सांगत असे.’ – सौ. शोभा हेम्बाडे, जळगाव |