खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रहित !

उद्धव ठाकरे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे २६ जुलै या दिवशी सातारा येथील पूरग्रस्त भागाची पहाणी करण्यासाठी जाणार होते; मात्र अल्प दृश्यमानतेमुळे त्यांचे ‘हेलिकॉप्टर’ कोयना येथील ‘हेलिपॅड’वर उतरवावे लागले. तेथून ते पुणे विमानतळावर येऊन मुंबईला परतले. खराब हवामानामुळे त्यांना त्यांचा नियोजित दौरा रहित करावा लागला.

‘दौरा रहित झाला असला, तरी सातारा जिल्हाधिकारी, तसेच अन्य यंत्रणा यांद्वारे माहिती घेऊन पूरग्रस्तांना साहाय्य करण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही’, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. या भागातील पाणी अद्याप पूर्णपणे ओसरलेले नाही. त्यामुळे बचावकार्य काळजीपूर्वक करावे. पूरग्रस्तांना तातडीने अन्न, कपडे, औषधे यांचे साहाय्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.