आनंदी आणि खेळकर स्वभावाने इतरांना आनंद देणारे अन् व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून करून स्वतःत पालट घडवणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. चारुदत्त जोशी !

१. सकारात्मक आणि आनंदी

‘माझे भाओजी (बहिणीचे पती) कै. चारुदत्त जोशी नेहमीच आनंदी असायचे. ते स्वतःच्या आनंदी आणि खेळकर स्वभावाने इतरांनाही आनंद द्यायचे. कुठल्याही प्रसंगात भाओजींमधील सकारात्मकता आणि प्रबळ इच्छाशक्ती जाणवायची.

कै. चारुदत्त जोशी

२. प्रेमळ

आमच्या घरी येतांना बर्‍याचदा ते माझी मुले अक्षयिनी आणि आरूष यांच्यासाठी न विसरता काही ना काही खाऊ किंवा खेळणी आणायचे. अशा अनेक प्रसंगांतून आम्हाला त्यांच्यातील प्रेमभाव जाणवायचा.

३. कुटुंब आणि नातेवाईक यांना सर्वतोपरी साहाय्य करणे

अडचणीच्या प्रसंगांत ते नेहमीच आमच्या समवेत असायचे. आम्हाला त्यांचा पुष्कळ आधार वाटायचा. ताईला (श्रीमती अनिता जोशी यांना) तीव्र शारीरिक त्रास व्हायचा. तेव्हा ते तिला सर्वतोपरी साहाय्य करून मानसिक आधार द्यायचे.

श्री. अमोल काकडे

४. सर्व प्रकारचे दायित्व उत्कृष्टपणे पार पाडणे

मध्यंतरी ६ मास ताई आमच्या घरी रहात होती. तेव्हा ते घरची आणि वैयक्तिक कामे सांभाळून व्यष्टी साधनेची सर्व सूत्रे पूर्ण करत होते, तसेच स्वतःचा व्यवसायही उत्कृष्टपणे सांभाळत होते.

५. सेवेची तळमळ असल्याने दैनिक ‘सनातन प्रभात’चे ‘पार्सल’ आणण्याची सेवा वेळेत आणि तत्परतेने करणे

दळणवळण बंदीपूर्वी मी सकाळी दैनिक ‘सनातन प्रभात’चे ‘पार्सल’ आणण्याची सेवा करायचो. एकदा माझ्या समवेत सेवेला येणार्‍या साधकांना काही अडचण होती. त्यामुळे मी भाओजींना माझ्यासमवेत येण्याविषयी विचारले. त्यांनी लगेचच होकार दिला आणि त्यानंतर ते नियमितपणे ती सेवा करू लागले. सेवेच्या ठरलेल्या वाराच्या एक दिवस आधी ते मला न चुकता भ्रमणभाष करून सेवेचे नियोजन विचारायचे. मला कधी सेवेला जायला जमले नाही, तर ते स्वतःच ही सेवा पूर्ण करायचे. ‘पार्सल’ आणण्यासाठी पहाटे ३ ते ३.१५ पर्यंत उठून ३.४५ पर्यंत बसस्थानकावर पोचावे लागते. बर्‍याचदा मला बसस्थानकावर पोचायला उशीर व्हायचा; पण ते नेहमी वेळेच्या आधीच पोचायचे. तेव्हा त्यांच्यातील ‘वक्तशीरपणा’ आणि ‘तत्परता’ हे गुण मला शिकायला मिळाले. ‘नियमित सेवा करूनही त्यांना स्वकौतुकाची अपेक्षा नाही’, असे मला नेहमी जाणवायचे. इतरही अनेक प्रसंगांतून हे माझ्या लक्षात आले.

६. भाव

त्यांना गुरुदेव आणि साधक यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटायची. त्यांना भावजागृती करणार्‍या सुंदर कविता सुचल्या आहेत. त्यांची ‘साधक-फूल’ बनण्याची तळमळ वाढली होती.

७. व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवल्यानंतर अनेक पालट होऊन साधनेची तळमळ आणि भाव पुष्कळ प्रमाणात वाढणे

मागच्या गुढीपाडव्यापासून भाओजींनी व्यष्टी साधनेची घडी बसवण्याचा निर्णय घेतला आणि त्या दिवसापासूनच जणू ‘त्यांच्यावर गुरुकृपा झाली’, असे आम्हाला जाणवू लागले. पूर्वी त्यांचा स्वभाव रागीट होता. त्यांनी व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढवल्यापासून आम्हाला त्यांच्यात पुष्कळ पालट जाणवत होता. त्यांच्यातील सातत्य, चिकाटी आणि शिकण्याची वृत्ती यांमध्ये पुष्कळ वाढ झाली होती. त्यांच्या बोलण्यात मधुरता आणि प्रेमभाव जाणवायचा. ‘आपण कुठे न्यून पडत आहोत ?’, याविषयी ते चिंतन करायचे. इतर साधकांनाही ते साधनेसाठी साहाय्य करायचे. ‘त्यांच्यात साधनेची तळमळ आणि भाव पुष्कळ वाढला आहे’, असे आम्हाला जाणवत होते. व्यष्टी साधनेच्या आढाव्यातील आनंद त्यांच्या बोलण्यातून जाणवायचा.’

– श्री. अमोल काकडे (मेहुणा), संभाजीनगर (जून २०२१)