पूरग्रस्त जिल्ह्यांचा आढावा घेऊन आर्थिक साहाय्याविषयी घोषणा करणार ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चिपळूण येथील पूर परिस्थितीविषयी पहाणी दौरा

  • आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भात जिल्ह्यात स्थानिक स्तरावर यंत्रणा उभारण्याचा निर्णय !

  • तातडीचे सर्व साहाय्य पुरवण्याचे जिल्हाधिकार्‍यांना निर्देश

रत्नागिरी – केवळ सवंग लोकप्रियता मिळवण्यासाठी मी लगेच काहीतरी घोषणा करणार नाही. राज्यातील पूर परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेऊनच हानीभरपाईच्या संदर्भात साहाय्य घोषित करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधतांना चिपळूण येथे केले.

चिपळूण शहरात पूरग्रस्त व्यापारी, तसेच नागरिक यांच्याशी संवाद साधतांना ते बोलत होते. या वेळी त्यांनी पुरामुळे चिपळूण बाजारपेठेत झालेल्या हानीची पहाणी केली. त्यानंतर झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी प्रशासनाकडून झालेल्या आतापर्यंतच्या बचाव आणि साहाय्य कार्याविषयी माहिती जाणून घेतली.

या वेळी पालकमंत्री अधिवक्ता अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव, आमदार राजन साळवी आदी नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,

१. वारंवार येणार्‍या नैसर्गिक आपत्तींचा विचार करून जिल्हास्तरावर याविषयी यंत्रणा उभारण्यात येईल.

२. प्रश्न केवळ आर्थिक साहाय्य पुरवण्याचा नसून मोठ्या प्रमाणावर हानी झालेले नागरिक आणि व्यापारी यांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करणे, याला प्राथमिकता असेल.

३. उद्या मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्‍यावर जाऊन तेथील परिस्थितीची पहाणी करणार असून पुढील २ दिवसांत आर्थिक हानीचा आढावा घेतला जाईल.

४. सद्य:स्थितीत तातडीचे साहाय्य म्हणून अन्न, तसेच औषध, कपडे आणि अन्य अत्यावश्यक गोष्टी पुरवण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.

५. केंद्र सरकारकडून साहाय्य मिळत आहे. एन्.डी.आर्.एफ्., सैन्य, तसेच हवाईदल यांच्या तुकड्या राज्य सरकारला पूर परिस्थितीत साहाय्य करत आहेत.