१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या साधनेमुळे एकाच वेळी ‘व्यष्टी आणि समष्टी म्हणजे एकातून अनेकात जाणे आणि अनेकातून एकात येणे’, हे दोन्ही प्रवास पूर्ण होऊन पूर्णत्व प्राप्त होणे
‘साधनेचा सिद्धांत सांगतो, ‘एकातून अनेकात जा आणि अनेकातून एकात या.’ साधनेचे हे दोन्ही प्रवास पूर्ण झाल्यावर पूर्णत्व प्राप्त होते. म्हणजेच ‘पिंडी ते ब्रह्मांडी’, असा व्यापक प्रवास करतांना आपण समष्टीशी एकरूप होतो, यालाच ‘स्थुलातून सूक्ष्माकडे जाणे’, असेही म्हणतात. ब्रह्मांडातून पिंडीकडे जातांनाचा होणारा प्रवास हा सूक्ष्मातून स्थुलाकडे होत असतो, यालाच ‘अनेकातून एकात येणे’, असे म्हणतात. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी एकाच वेळी ‘व्यष्टी आणि समष्टी’ करण्यास सांगितल्यामुळे साधनेचे दोन्ही प्रवास पूर्ण होतात आणि साधक पूर्णत्वाला पोचतो, म्हणजेच देवाशी एकरूप होतो.
२. राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य झोकून देऊन मुक्तपणे करता येण्यासाठी देवाने मुलगी दिल्याने मुला-बाळांमध्ये न अडकता साधनेसाठी सर्वस्व देता येणे
माझ्यामध्ये जन्मापासूनच समष्टी साधनेचे बीज आहे. मला इतरांना आनंद देण्यास अधिक आवडते. साधनेत येण्यापूर्वी मला नेहमी वाटत असे की, राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य झोकून देऊन मुक्तपणे करता येण्यासाठीच देवाने मला मुलगी दिली आहे. एकदा तिचे लग्न झाले की, मला कोणतेच कर्तव्य रहाणार नाही. तिच्या मुला-बाळांचे दायित्व माझ्याकडे नसल्याने मी झोकून देऊन समाजासाठी वेळ किंवा कुठल्यातरी संस्थेत जाऊन समाजसेवा करू शकेन. मला मुलगा हवा कि मुलगी, यापेक्षा देवाने माझ्या अंतरात राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यासाठी समाजसेवा करण्याचा जो विचार जागृत केला होता, तो फार महत्त्वाचा होता. देवाने माझे विचार आणि माझी दैवीकार्य करण्याची क्षमता जाणली होती. त्यामुळेच त्याने मला साधनेत आणले. एकदा आपण देवाचे झालो की, आपला एक एक विचारही त्याचाच होतो. या दैवी शिडीमुळेच मी आज गुरूंच्या चरणांशी येऊ शकले.
२०-२५ वर्षांपूर्वीचा काळ वेगळा होता. त्या वेळी ‘घर आणि संसार’ एवढेच ठाऊक होते. माझे साधनेचे जीवन चालू झाले, तेव्हा परात्पर गुरु डॉक्टरांनी त्यागाचे महत्त्व मनावर बिंबवले आणि आम्हा साधकांकडून तन, मन आणि धन कधी अर्पण करून घेतले, ते कळलेही नाही. ‘गुरु आपल्या शिष्याला त्याच्या नकळत कसे पुढे घेऊन जातात ?’, याचीच ही अनुभूती आहे. साधक एकदा गुरूंचा झाला की, त्याला आयुष्यात काहीच करावे लागत नाही. त्याचे आयुष्यच गुरुमय होऊन जाते. त्याला आयुष्यात मुद्दाम असे काहीच करावे लागत नाही. सर्वकाही त्याच्या नकळतच होत असते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०२०)
|