सौ. मीनाक्षी धुमाळ यांच्या सत्काराच्या वेळी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधनेविषयी केलेले अमूल्य दिशादर्शन !

१. ‘भगवंतच सुचवतो, वदवून घेतो आणि करवूनही घेतो’, हा भाव अंतरात जागृत ठेवल्यास कर्तेपणा नष्ट होऊ शकतो !

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

आपण मनापासून आणि तळमळीने सेवा केली, तर गुरुकृपेने भगवंत आपल्याला सेवेसंबंधीची सूत्रे सुचवतो. आपल्यात भाव आणि तळमळ असेल, तर साधकांना मार्गदर्शन करण्याविषयीची सूत्रेही तोच आपल्याकडून उत्स्फूर्तपणे वदवून घेतो. मुळात आपण कोरडे पाषाण आहोत. आपले असे काहीही नाही.

गुरुकृपेने भगवंतच सुचवतो, वदवून घेतो, तोच सर्व करत असतो. हा भाव आपण आपल्या अंतरात जागृत ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करत रहायला हवेत. त्यातूनच आपल्यातील कर्तेपणा नष्ट होऊ शकतो.

२. जर साधकापासून दूर गेलो, तर आपण देवापासूनही दूर जातो !

आपण साधकांच्या दोषांकडे पाहू नये. खरेतर आपला प्रत्येक साधक म्हणजे गुणांची खाण आहे. आपण त्याच्या दोषांसमोर त्याचे गुण लिहून काढले, तर गुणच अधिक होतील. आपण प्रत्येकाकडून शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. साधकांच्या चुका झाल्या, तर त्यांना साहाय्य व्हावे म्हणून आपण त्या सांगायच्या आहेतच; परंतु साधकांविषयी पूर्वग्रह बाळगू नये. आपण हे लक्षात घ्यायला हवे की, आपण जर साधकापासून दूर गेलो, तर देवापासूनही दूर जातो !

३. साधकांमधील पूर्वग्रह नष्ट झाल्यास होणारे लाभ

सहसाधकांचा एकमेकांविषयीचा पूर्वग्रह नष्ट झाला की, जवळीक निर्माण होते. एकमेकांचा आधार वाटायला लागतो. देवाचे कार्य अधिक गतीने आणि परिपूर्णतेने होऊ लागते. सर्वांमध्ये एकसंधता निर्माण झाल्याने आपण भगवंताची ऊर्जा ग्रहण करू शकतो. आपले गुरु ‘मोक्षगुरु’ असल्याने ते साधकांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त करणारच आहेत. आपण साधनेचे प्रयत्न किती गतीने आणि तळमळीने करतो, त्यावर आपली आध्यात्मिक प्रगती अवलंबून आहे.

४. शरण जाऊन सेवा केल्यास भाव आणि आनंद यांची निर्मिती होऊन काळजी मिटेल !

आपण स्वत:तील दोष अन् अहं यांचा, तसेच कौटुंबिक आणि व्यावहारिक समस्यांचा पुष्कळ विचार करत असतो. खरेतर परात्पर गुरुदेवांनी प्रत्येकच समस्येवर उपाय सांगितलेला आहे. आपण केवळ त्या दृष्टीने प्रयत्न करून शरण जाऊन सेवा करायला हवी. तसे प्रयत्न केल्यास आपल्यात भाव आणि आनंद यांची निर्मिती होईल. आपल्याला कोणतीच काळजी उरणार नाही.

५. सातत्याने साधनारत रहाण्याची फलश्रुती !

साधनेच्या जमा-खर्चाचा विचार सतत केला पाहिजे. ‘मी कुठे न्यून पडलो’, याचे आपण सतत अवलोकन करायला हवे. दिवसातून काही घंट्यांनी आपण साधनेचा जमाखर्च पहायलाच हवा. आपण जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास देव आपल्याला दोष अन् अहं यांतून लवकर मुक्त करतो आणि अध्यात्मात पुढे घेऊन जातो. साधनेमुळे आपल्यात किती आमूलाग्र पालट होतो, याची आपण कल्पनाही करू शकत नाही. देव आपल्याला कोणत्या स्तरापर्यंत जाऊन साहाय्य करतो, हे आपण सांगूच शकत नाही.

६. मनातील विचारप्रक्रिया मनमोकळेपणाने सांगण्याचे महत्त्व

जर आपण व्यष्टी साधनेच्या आढाव्यात मनातील काहीही न लपवता सर्व विचारप्रक्रिया मनमोकळेपणाने मांडली, तर आपण सर्वाधिक गतीने साधनेत पुढे जातो. मनात जसे आहे, तसे आत्मनिवेदन करता यायला हवे. त्यातून आपला अहं न्यून होऊन मन निर्मळ होत जाते. अशा निर्मळ मनातच ईश्वराला वास करायला आवडतो. त्या निर्मळ मनात राहून तोच आपली जलद प्रगती करवून घेतो.

७. भावाच्या संदर्भात आश्रमातील साधकांसाठी दिशादर्शन !

आपल्या प्रत्येकात भाव आहे. त्यामुळेच आपण आश्रमात येऊ शकलो; परंतु आपण त्याच टप्प्याला रहायला नको. गुरूंप्रतीचा भाव आपल्याला कसा वाढवता येईल, यासाठी आपले प्रयत्न व्हायला हवेत. कोणताही गुण आपल्यात असला, तरी तो सतत वाढवण्यासाठी आपले प्रयत्न होणे देवाला अपेक्षित असते.

८. गुरूंच्या आश्रमाचे महत्त्व मनावर बिंबण्यासाठी काय प्रयत्न करावेत ?

साधनेत प्रत्येक क्षणाला महत्त्व आहे. आपण आश्रमात रहात असतांना कृतज्ञताभावात किती असतो, हे पहायला हवे. गृहित धरणे, हा मानवी स्वभाव आहे. आश्रमात रहायला मिळते, हे आपण गृहित धरू नये. त्याकडे सहजतेने पाहू नये. गुरूंच्या आश्रमात रहात असल्याविषयीची कृतज्ञतेची जाणीव आपण अंतरात सतत जागृत ठेवायला हवी. ‘हे भगवंता, तू मला आश्रमात रहाण्यासाठी अधिकाधिक पात्र बनव’, अशी प्रार्थना आपण करायला हवी.

९. मनोलय अन् त्यातून साधनावृद्धी करण्यासाठी कार्यपद्धती आवश्यक !

आश्रमातील सर्व कार्यपद्धती या आपल्या मनोलयासाठी आहेत. त्या स्वीकारल्या की, आपल्याला साधनेच्या दृष्टीने त्यांचा लाभ होतो. गुरूंनी आपल्याला प्रत्येकच गोष्ट शिकवली आहे. यामुळे आपला कृतज्ञताभाव किती वाढायला हवा !

१०. गुरुपौर्णिमेचे महत्त्व

आर्थिक वर्ष जसे एप्रिलपासून आरंभ होते, तसे साधकांचे आध्यात्मिक वर्ष गुरुपौर्णिमा ते गुरुपौर्णिमा असे असते. गुरुपौर्णिमा जवळ आली की, प्रत्येक साधक आपल्या साधनेचा हिशेब करू लागतो. वर्षभर आपण साधनेचे किती प्रयत्न केले, याचे अवलोकन करण्याची संधी म्हणजे गुरुपौणिमा ! गुरुपौर्णिमा जवळ आली की, प्रत्येकच साधक साधनेच्या दृष्टीने ध्येय ठेवून प्रयत्न करू लागतो. खरेतर आपल्या साधनेचा हिशेब करणारा देवच आहे. प्रत्येकाच्या प्रयत्नांनुसार आणि त्याच्या धडपडीनुसार देव अपेक्षित असे फळ देत असतो; पण आपण अवलोकन केले की, आपल्याला स्वत:च्या साधनेची दिशा योग्य आहे कि नाही, हे पडताळता येते.

संत एकनाथ महाराज यांच्या गुरुसेवेच्या आदर्श उदाहरणातून श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे साधकांना दिशादर्शन !

‘संत एकनाथ हे श्री जनार्दनस्वामी यांचे शिष्य होते. ते त्यांच्या गुरूंची प्रत्येक सेवा अत्यंत तळमळीने करत. एकदा जनार्दनस्वामी यांनी त्यांना जमाखर्चाची सेवा करायला सांगितली. एकनाथांना हिशेब करतांना एका पैशाचा हिशेब लागेना. त्यांनी सगळ्या वह्या पडताळून पाहिल्या. ते सेवेत एवढे गुंग झाले की, रात्र झाल्याचेही त्यांच्या लक्षात आले नाही. घशाला कोरड पडली; पण झोप येऊन हिशेब तसाच राहील; म्हणून ते पाणीसुद्धा प्यायले नाहीत. त्यांनी कोणत्याच प्रकारे सेवेत खंड पडू दिला नाही. त्यांचे संपूर्ण चित्त हिशेबमय झाले होते.

पहाटे गुरूंनी पाहिले की, एकनाथ अजूनही हिशेबच करत आहेत. गुरु त्यांच्यामागे उभे राहून सर्व पहात होते. तेवढ्यातच एकनाथांना त्या एका पैशाचा हिशेब लागला. त्यांना अत्यानंद झाला. गुरूंनी पुढे येऊन त्यांना विचारले की, तुला एवढा आनंद कशाचा होत आहे ? गुरूंना पाहून एकनाथांनी त्यांना लगेच नमस्कार केला आणि सर्व हिशेब सांगितला.

सहस्रो रुपयांच्या हिशेबामध्ये एका पैशाची चूक ! आणि ती शोधण्यासाठी त्यांनी रात्रभर जागरण केले होते ! गुरुसेवेची किती ही तळमळ ! गुरु निश्चितच त्यांच्या सेवेवर प्रसन्न झाले. तेव्हा गुरु काय म्हणाले असतील ? त्यांनी एकनाथांना मार्गदर्शन केले, ‘आता तुझे चित्त जसे एका पैशात गुंतले होते, तसे भगवंताच्या चरणी गुंतले, तर तू आत्महिताचा लाभ करून घेशील.’

त्या क्षणी एकनाथांनी प्रपंचाचा त्याग केला. हातातील लेखणी गुरुचरणी वाहिली. अखंड भगवद्भक्ती केली. ‘गुरु म्हणजे त्रैलोक्याचे धनी आहेत. त्यांच्यापासूनच सर्व उत्पन्न झाले आहे’, हे जाणून त्यांनी केवळ गुरुसेवेचाच ध्यास घेतला. त्यांनी ठरवले की, यापुढे केवळ रामनामाचाच व्यापार करायचा. गुरूंनी दिलेले नाम, त्यांनी सांगितलेली साधना इतरांना सांगायची. त्यामुळेच ते संत झाले.

गुरुसेवा कशी करायची ? याचे हे आदर्श उदाहरण आहे. यातून शिकून आपणही झोकून देऊन गुरुसेवा करूया. श्रीविष्णुस्वरूप गुरुदेवांनीही आपल्याला समष्टी सेवा सांगितली आहे. त्या समष्टी सेवेतून आपली सर्व संचित कर्मे आणि प्रारब्ध वजा होत असते, तसेच सेवेद्वारे पुण्यबळ अन् साधनेचे बळ वाढत असते. गुरूंना अपेक्षित अशी साधना करून त्यांच्या चरणी लीन होऊया !

अंकी ‘ब्रह्म’ अनुभवणे, ही आपली साधना आहे ! – श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ

लेखासंबंधी सेवा करणार्‍या साधकांना दिशादर्शन करतांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘लेखा सेवा म्हणजे भगवंताचे भावविश्व ‘अंकां’च्या माध्यमातून अनुभवणे होय. अंकी ब्रह्माला म्हणजे देवाला अनुभवणे, ही आपली साधना आहे. हे अनुभवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत. या सेवेच्या माध्यमातून अनेक गुणांची वृद्धी करण्याची आपल्याला संधी असते. वक्तशीरपणा, एकाग्रता यांसारख्या गुणांची वृद्धी करून आपल्याला सेवा परिपूर्णतेकडे न्यायची आहे. आपण केलेल्या सेवेत उत्तरदायी साधकाला एकही शंका यायला नको, इतक्या परिपूर्णतेने आणि तन्मयतेने आपण सेवा करायला हवी. गुरुसेवेसमवेतच आपल्याला आपल्या साधनेतही परिपूर्णता आणायची आहे.’’