रामनाथी आश्रमातील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास !

‘लहानपणापासून विवाहानंतरही काही वर्षे अतिशय खडतर जीवन जगूनही संतपदाला पोचल्याविषयी पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजींचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

२३ जुलै २०२१ या दिवशी आषाढ पौर्णिमा अर्थात् गुरुपौर्णिमा आहे. गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या या दिवशी गुरुतत्त्व सहस्र पटींनी कार्यरत असते. या गुरुपौर्णिमेचा साधकांना अधिकाधिक लाभ व्हावा, या दृष्टीने गुरुकृपायोगाच्या माध्यमातून जलद आध्यात्मिक उन्नती करून संतपद गाठलेल्या संतांविषयी लिखाण प्रकाशित करत आहोत.

या लेखमालेत आज २१ जुलै २०२१ या दिवशी आपण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील सनातनच्या ९५ व्या संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८२ वर्षे) यांचा साधनाप्रवास पाहूया !

काल २० जुलै २०२१ या दिवशी आपण पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी यांच्या साधनाप्रवासातील जन्म, बालपण, वैवाहिक जीवन आणि सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना याविषयी पाहिले. आज आपण त्यांच्या साधनाप्रवासाचा उर्वरित
भाग पाहूया.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/496289.html

४. एका संतांनी गुरुमंत्र म्हणून कुलदेवीचा नामजप करण्यास सांगणे, सनातन संस्थेच्या संपर्कात येईपर्यंत तोच नामजप करणे आणि ‘कुलदेवीच्या नामजपाने साधनेला योग्य दिशा मिळाली’, असे वाटणे

आमच्या शेजारी एक महिला रहात होत्या. त्यांनी एकदा मला अकोला जिल्ह्यातील तेल्हारा या गावी प.पू. विष्णुदास महाराज यांच्याकडे नेले. त्यांनी मला गुरुमंत्र म्हणून कुलदेवीचा नामजप करण्यास सांगितले. सनातन संस्थेच्या संपर्कात येईपर्यंत मी तोच नामजप प्रतिदिन १ माळ करायचे. मला वाटते, ‘कुलदेवीच्या नामजपाच्या निमित्ताने माझ्या साधनेला योग्य दिशा मिळाली आणि त्यानंतर सनातन संस्थेचे मार्गदर्शन मिळून त्या साधनेला पूर्णत्व आले.’

५. सनातन संस्थेशी संपर्क आणि त्यानंतर केलेल्या विविध सेवा

वर्ष १९९८ मध्ये आमच्या गावात सनातन संस्थेचे सत्संग चालू झाले. मी त्या सत्संगांना जात असे. काही दिवसांनी आमच्या घरी साधकांचे येणे-जाणे चालू झाले. अशा प्रकारे आमचे सर्व कुटुंब सनातनशी कायमचे जोडले गेले. त्यानंतर ‘ग्रंथप्रदर्शन लावणे, ‘साप्ताहिक सनातन प्रभात’चे वितरण, सत्संग घेणे’, अशा सेवा देवाने माझ्याकडून करवून घेतल्या. सत्संग घेण्यासाठी मी शेजारच्या खेड्यांतही जायचे. सेवेसाठी मला माझ्या यजमानांचे पूर्ण सहकार्य असायचे.

६. आश्रमजीवन

मोठ्या मुलाचे (श्री. राजेश यांचे) लग्न झाल्यावर काही वर्षांनी, म्हणजे साधारणतः वर्ष २००७ मध्ये मी आणि यजमान दोघेही सनातनच्या देवद (पनवेल) येथील आश्रमात रहायला गेलो. तेथे आम्ही सनातन-निर्मित सात्त्विक उत्पादनांच्या संदर्भातील सेवा केली. मधे मधे मी स्वयंपाकघरातही सेवेसाठी जात असे.

७. यजमानांचे निधन

वर्ष २०११ मध्ये देवद आश्रमात सेवेत असतांनाच यजमानांचे वार्धक्यामुळे निधन झाले. देवाच्या कृपेने त्या प्रसंगात मला स्थिर रहाता आले. त्याही परिस्थितीत देवाने माझ्यावर केलेली अखंड कृपा आठवून मला त्याच्याप्रती कृतज्ञता वाटत असे.

८. ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे

‘माझी लवकरात लवकर आध्यात्मिक प्रगती व्हावी’, अशी तळमळ मला लागली होती. पुढे वर्ष २०१२ मध्ये माझी आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाल्याचे घोषित करण्यात आले.

९. संतपद

पुढे काही काळ आश्रमात आणि काही काळ घरी, अशी माझी साधना चालू राहिली. वर्ष २०१९ मध्ये ‘माझी आध्यात्मिक पातळी ७१ टक्के झाली असून मी संतपदी विराजमान झाले आहे’, असे घोषित करण्यात आले. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने जीवन सार्थक झाल्याची अनुभूती आली. सध्या मला समष्टीसाठी नामजप करण्याची सेवा देण्यात आली आहे.

१०. आलेल्या विविध अनुभूती

१० अ. लहानपणी घोडागाडीतून जातांना गाडी नाल्यात उलटणे अन् देवाच्या कृपेने त्यातून वाचणे : लहानपणी आम्ही सर्व भावंडे एका नातेवाइकाच्या लग्नासाठी जात होतो. तेव्हा घोडागाडीतूनच प्रवास करावा लागायचा. एकदा घोडागाडीतून प्रवास करत असतांना एका नाल्याच्या ठिकाणी अकस्मात् घोडा उधळल्याने आमची गाडी नाल्यात उलटली. त्या वेळी गाडीचालकाने प्रसंगावधान राखून आम्हाला वाचवले. देवाच्या कृपेने त्या वेळी मला जीवनदान मिळाले.

१० आ. यजमान भजनाला गेल्यावर घरी खाण्यासाठी काही नसतांना एका अज्ञात व्यक्तीने शिधा आणून देणे : भजन असले की, यजमान व्यवसायाकडे दुर्लक्ष करत असत. त्या वेळी त्यांचे घरातही लक्ष नसायचे. एकदा असेच ते भजनाला गेले. त्या दिवशी घरात खाण्यासाठी एक दाणाही नव्हता. मी ‘आपण एक वेळ उपाशी राहू; परंतु मुलांना उपाशी कसे ठेवायचे ?’, या चिंतेत होते. दुपारच्या वेळी अकस्मात् एक अज्ञात व्यक्ती घराचे दार वाजवू लागली. तिच्या हातात किराणा मालाच्या पिशव्या होत्या. ती व्यक्ती मला म्हणाली, ‘‘महाराजांनी हे साहित्य पाठवले आहे.’’ त्या काळी काही लोक यजमानांना ‘महाराज’ म्हणायचे. मी ते साहित्य ठेवून घेतले. रात्री यजमान भजन करून घरी आल्यावर मी त्यांना हा प्रसंग सांगितला. तेव्हा ते म्हणाले, ‘‘मी कुणाच्या समवेत कुठलेही साहित्य पाठवले नाही.’’ त्यानंतर ती अज्ञात व्यक्ती आम्हाला कधी दिसली नाही.

१० इ. यजमानांच्या रक्तातील साखर वाढल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागणे, त्या वेळी दोन्ही मुले घरी नसणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने यजमानांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सर्वसामान्य होणे : यजमानांना मधुमेह होता. आम्ही आमच्या अकोट (जिल्हा अकोला) येथील रहात्या घरी दोघेच जण होतो. मोठा मुलगा (श्री. राजेश जलतारे) नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी, तर धाकटा मुलगा (अधिवक्ता योगेश जलतारे) ठाणे येथे सनातन संस्थेच्या सेवाकेंद्रात रहात होता. त्यामुळे आमच्या समवेत कुणीही नव्हते. त्या वेळी यजमानांच्या रक्तातील साखर वाढल्याने त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले. त्या वेळी माझे दीर दूरभाष करून साधना करत असलेल्या माझ्या धाकट्या मुलाला सनातनवरून पुष्कळ बोलले. ‘तू वडिलांकडे दुर्लक्ष करतोस आणि ‘देव, देव’ करत हिंडतोस’, असे ते त्याला बोलले. त्या वेळी मुलाने त्यांना परोपरीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु ते ऐकण्याच्या स्थितीत नव्हते. शेवटी मुलाने ‘देव काळजी घ्यायला समर्थ आहे’, असे सांगून दूरभाष ठेवला. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने दुसर्‍या दिवशी आपसूकच यजमानांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण सर्वसामान्य (नॉर्मल) झाले.

१० ई. कुलदेवीच्या दर्शनासाठी गेल्यावर माझी आणि यजमानांची चुकामूक होणे, एका गृहस्थांनी यजमानांजवळ आणून सोडणे आणि ते गृहस्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखेच दिसत असल्याचे लक्षात येणे : एकदा मी आणि यजमान माहूर येथे कुलदेवीच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेथे एका डोंगरावर श्री रेणुकादेवीचे (कुलदेवीचे) आणि दुसर्‍या डोंगरावर श्री कालिकादेवीचे स्थान आहे. त्या डोंगरावर तांत्रिक प्रयोग चालत असल्याने सहसा तेथे कोणी जात नाही. दर्शनासाठी जात असतांना माझी आणि यजमानांची चुकामूक झाली अन् मी श्री कालिकादेवीच्या डोंगरावर चढू लागले. त्या वेळी एक वयस्कर गृहस्थ माझ्या जवळ येऊन मला म्हणाले, ‘‘बाई, या डोंगरावर कुठं चालली ? श्री रेणुकादेवीचा डोंगर दुसरा आहे.’’ त्या गृहस्थांना ‘मी श्री रेणुकादेवीच्या दर्शनासाठी आले आहे’, हे कसे कळले ?’, हे मला समजलेच नाही. त्यांनीच मला यजमानांजवळ आणून सोडले. ते गृहस्थ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासारखेच दिसत होते.

१० उ. यजमान आगगाडीच्या डब्यात चढेपर्यंत आगगाडी चालू होणे, डब्यात चढत असतांना अकस्मात् त्यांचा तोल जाणे आणि त्या वेळी सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी त्यांचा हात धरल्याने त्यांचा प्राण वाचणे : एकदा माझे यजमान आगगाडीने एका गावाहून दुसर्‍या गावाला जाण्यासाठी निघाले. ते आगगाडीच्या डब्यात चढेपर्यंत आगगाडी चालू झाली होती. ते डब्यात चढत असतांना अकस्मात् त्यांचा तोल गेला. त्या वेळी कुणीतरी त्यांचा हात धरला आणि ते पडता पडता वाचले. त्यांनी वर पाहिले, तर ‘त्यांचा हात धरणारे दुसरे-तिसरे कोणी नसून (सूक्ष्मातील) परात्पर गुरु डॉ. आठवले आहेत’, असे त्यांना जाणवले. त्यानंतर यजमानांची परात्पर गुरु डॉक्टरांप्रती श्रद्धा निर्माण झाली आणि ते साधनेसाठी देवद आश्रमात रहायला आले.’

(समाप्त)

– (पू.) श्रीमती कुसुम जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१४.७.२०२१)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक