राज्यातील पोलीसदलात १२ सहस्र ५०० जागा भरण्यास मंत्रीमंडळाची मान्यता ! – शंभुराज देसाई, गृह राज्यमंत्री

पोलिसांची पुरेशी भरती न केल्यामुळे पोलिसांवर कामाचा ताण वाढून त्यांना आरोग्यांच्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे आतापर्यंत अनेक पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या पुष्कळ नगण्य असल्याने सरकारने पोलीस दलात पोलिसांची आवश्यक ती भरती गांभीर्याने केली पाहिजे.

मध्यभागी शंभुराज देसाई

हिंगोली – ‘राज्यातील पोलीसदलात असणार्‍या अपुर्‍या मनुष्यबळामुळे पोलिसांवर कामाचा ताण येत आहे. हे लक्षात घेऊन पोलिसांच्या १२ सहस्र ५०० जागा भरण्यास मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यांतून रिक्त आणि राखीव जागांची माहिती घेतली जात आहे. या माहितीचे संकलन झाल्यानंतर तातडीने प्रत्यक्षात भरती प्रक्रिया चालू केली जाईल’, अशी माहिती राज्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी १८ जुलै या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

शंभुराज देसाई पुढे म्हणाले की, राज्यातील पोलिसांच्या निवासस्थानांविषयी शासन संवेदनशील असून पोलीस गृहनिर्माणासाठी गेल्या वर्षी ३५० कोटी रुपये राखीव ठेवले होते. यंदा ही रक्कम ८०० कोटी रुपये करण्यात आली आहे. पुढील काळात निवासस्थानांचा प्रश्नही सुटणार आहे. (राज्यातील पोलिसांच्या निवासस्थानांचा प्रश्न गंभीर आहे. आतापर्यंत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सत्तेवर आल्यानंतर त्यांनी हा प्रश्न सोडवण्यासाठी आश्वासन देण्याव्यतिरिक्त काहीच केले नाही. हे लक्षात घेऊन विद्यमान सरकारने पोलिसांचा निवासस्थानांचा प्रश्न त्वरित सोडवावा, एवढीच पोलिसांची अपेक्षा आहे. – संपादक) शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून जनतेला सरकारने केलेल्या कामगिरीची माहिती दिली जात असून जनतेच्या अपेक्षा जाणून घेतल्या जात आहेत. त्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली जाणार आहे.