५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. ध्रुव निखील महाबळेश्वरकर !

५१ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला पुणे येथील कु. ध्रुव निखील महाबळेश्वरकर (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील ध्रुव निखील महाबळेश्वरकर एक आहे !

पुणे येथील कु. ध्रुव निखील महाबळेश्वरकर (वय ४ वर्षे) याचा वैशाख कृष्ण पक्ष षष्ठी ( ३१ मे २०२१) या दिवशी वाढदिवस झाला. त्या निमित्त त्याचे आई, वडील, आजोबा (वडिलांचे वडील) आणि साधक यांना लक्षात आलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

चि. ध्रुव निखील महाबळेश्वरकर

१. गर्भारपण

१ अ. झालेले त्रास : ‘गर्भारपणातील पहिले ३ – ४ मास मला सतत उलट्या होत होत्या. ७ व्या मासात मला कांजिण्या झाल्या. एकूणच माझे ७ – ८ मास आजारपणातच गेले. माझ्या मनात नकारात्मक विचार येत होते. घरातील वातावरण, वाद आणि स्वतःचे नकारात्मक विचार यांमुळे माझ्या मनावर सतत ताण येत होता. ‘बाळ विकलांग जन्मले’, तर..’ या विचाराने माझे मन अस्वस्थ होत होते. माझी चिडचिड आणि अपेक्षाही वाढल्या होत्या.

१ आ. आध्यात्मिक स्तरावरील केलेले उपाय : मी प्रतिदिन संध्याकाळी रामरक्षा, मारुतिस्तोत्र, श्री गणपति अथर्वशीर्ष, चंडीकवच इत्यादी म्हणत असे. खोलीची शुद्धी करणे, उदबत्तीने स्वतःची आणि गर्भातील बाळाची शुद्धी करणे, तसेच परात्पर गुरु डॉक्टरांच्या मार्गदर्शनाची ध्वनीफीत ऐकणे, हे उपाय करत असे.

१ इ. श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना केल्यावर अन्न पचू लागणे : या काळात मला केवळ फळे आणि फळांचा रसच पचत होता. मी एकदा जेवणापूर्वी श्री अन्नपूर्णादेवीला प्रार्थना केली, ‘हे अन्नपूर्णादेवी, बाळाला अन्नातील चैतन्य आणि सत्त्व शक्ती मिळू दे. त्याला साधनेची सद्बुद्धी दे.’ त्यानंतर मला अन्न पचू लागले आणि सात्त्विक अन्नच खावेसे वाटू लागले.

१ ई. सौ. मानसी राजंदेकर यांच्या घरी लघुरुद्रासाठी गेल्यावर मनाची एकाग्रता वाढून बाळाच्या हालचाली जाणवू लागणे : साधारण ५ व्या मासात सौ. मानसी राजंदेकर यांच्याकडे लघुरुद्र असल्याने मला तेथे जाण्याची संधी मिळाली. लघुरुद्र चालू असतांना परात्पर गुरुदेवांचे अखंड स्मरण होऊन मला त्यांचेच रूप दिसत होते, तसेच मनाची एकाग्रता वाढली होती. त्यानंतर मला बाळाच्या हालचाली जाणवण्यास आरंभ झाला. लघुरुद्र आणि या अनुभूतीतून बाळ आनंदी आणि समाधानी झाल्याचे मला जाणवत होते.’

– सौ. नंदिनी महाबळेश्वरकर, पुणे

सौ. नंदिनी महाबळेश्वरकर

२. जन्मानंतर

२ अ. वय – ३ ते ६ मास

१. ‘ध्रुव झोपल्यावर त्याच्या हातांच्या बोटांची मुद्रा केलेली असायची. ध्रुवचे आजोबा देवपूजा करत असतांना आणि ‘शिव महिम्नस्तोत्र’ म्हणतांना ध्रुव ते लक्षपूर्वक ऐकत असे.

२. खोलीत प.पू. भक्तराज महाराज यांची भजने, रामरक्षा, प    रात्पर गुरु डॉक्टरांच्या आवाजातील ‘साधना आणि शंकानिरसन’ या ध्वनीफिती ऐकत तो झोपत असे.

३. लहानपणापासून कुणाकडेही न जाणारा ध्रुव साधक आणि घरातील उपासना करणार्‍यांकडे लगेच जायचा. आजही तो शांत व्यक्ती आणि साधक यांच्याकडे जातो.’

– श्री. निखील महाबळेश्वरकर (चि. ध्रुवचे बाबा)

४. ‘ध्रुव बर्‍याच गोष्टी, उदा. बोलल्यावर हुंकार देऊन प्रतिसाद देणे, एका कुशीवर होणे इत्यादी कृती वेळेच्या आधी करू लागला.’ – सौ. नंदिनी महाबळेश्वरकर (चि. ध्रुवची आई)

२ आ. वय – ६ मास ते १ वर्ष

२ आ १. आनंदी आणि शांत : ‘ध्रुवचा तोंडवळा आनंदी आहे. त्याला औषध देतांना, तसेच ‘इंजेक्शन’ दिल्यानंतरही तो क्षणभरच रडला आणि लगेच शांत झाला. त्याचा तोंडवळा आधीसारखाच आनंदी दिसल्याने आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘बाळ सोशिक, उत्साही आणि आनंदी आहे.’’

२ आ २. गोंगाट आणि रज-तम ठिकाणे न आवडणे : ध्रुवला मोठ्याने बोलणे आणि जोरजोरात हसणे आवडत नाही. तो लगेच रडू लागतो. व्यवहारातील एखाद्या कार्यक्रमाला गेलो, तर तो फार वेळ तेथे थांबत नाही; मात्र मंदिरात किंवा श्रीरामनवमी उत्सवात गेलो, तर तो शांत असतो.

२ आ ३. गायन आणि वादन यांची आवड : आमच्या घरासमोरील काकांकडे श्रीरामनवमीचा उत्सव असतो. धु्रवला तेथे घेऊन गेल्यावर तो तबल्याजवळ बसून तबला वाजवण्याचा प्रयत्न करू लागला आणि गाणेही गाऊ लागला. तेव्हा कीर्तनासाठी आलेले तबलावादक, पेटीवादक आणि गायिका ‘धु्रव तबला लवकर शिकेल’, असे म्हणाले.

२ आ ४. रामनवमीच्या उत्सवाला आलेल्या एका भक्ताने ‘तो साधू-संतांपैकीच एक आहे’, असे म्हटले.’

– सौ. नंदिनी महाबळेश्वरकर

श्री. निखील महाबळेश्वरकर

२ इ. वय – १ ते २ वर्षे

अ. ‘ध्रुवला तिन्हीसांजेला उदबत्ती लावण्यास आणि घरात घंटानाद करत फिरण्यास आवडते.

आ. दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये किंवा इतर ठिकाणी परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र दिसल्यास तो त्यांना ‘आबा’ म्हणून हाक मारतो. तो गोव्याहून आलेला प्रसाद ‘गुरुदेवांनी दिलेला प्रसाद आहे’, असे म्हणून आवडीने खातो.

इ. ध्रुव ‘ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप बर्‍याचदा म्हणतो.

ई. त्याला सनातनचे बालसंत पू. वामन आणि पू. भार्गवराम यांची छायाचित्रे पहायला पुष्कळ आवडतात. प्रत्येक छायाचित्र पाहिल्यावर ‘ते काय करत आहेत ?’, हे तो जिज्ञासेने विचारतो.

३. स्वभावदोष : हट्टीपणा.’

धुव्रचा जन्म म्हणजे निव्वळ गुरुकृपेची अनुभूती असल्याने त्यांच्या चरणी कातड्याचे जोडे करून वाहिले, तरी गुरुऋणातून मुक्त होऊ शकत नाही. ध्रुवमुळे आमची श्रद्धा अजून दृढ होत आहे. ध्रुवचे संगोपन करण्याची सेवारूपी संधी दिल्याविषयी आम्ही गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. निखील आणि सौ. नंदिनी महाबळेश्वरकर (चि. ध्रुवचे वडील आणि आई), पुणे (डिसेंबर २०१९)

ध्रुवचे दिवंगत आजोबा कै. रवींद्र महाबळेश्वरकर यांना बाळाच्या जन्मानंतर जाणवलेली सूत्रे

ध्रुवचे आजोबा रवींद्र महाबळेश्वरकर २ वर्षांपूर्वी वारले. ध्रुवच्या जन्मानंतर त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

‘ध्रुवमध्ये श्री गणेशाचा अंश आहे’, असे सांगणारे कै. रवींद्र महाबळेश्वरकर ! : ‘माझ्या वडिलांनी बाळाला पहिल्यांदा पाहिले. पहाताक्षणी ‘त्याचे डोळे काहीतरी सांगत आहेत’, असे त्यांना जाणवले. बाळाच्या डोळ्यांतून एक प्रकारचे तेज प्रक्षेपित होत होते. त्यांना बाळाचे कान श्री गणेशासारखे असल्याने ‘बाळ म्हणजे श्री गणेशाचा प्रसादच असून त्याच्यात श्री गणेशाचा अंश आहे’, असे वडिलांना जाणवायचे. ‘श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिल्यावर वृत्ती जशी शांत होते, तसे ध्रुवकडे पाहिल्यावरही होते’, असे ते म्हणायचे.’

– श्री. निखील रवींद्र महाबळेश्वरकर, पुणे

साधकांना जाणवलेली सूत्रे

१. ध्रुवला साधकांशी खेळायला आणि त्यांचा सहवास आवडणे

‘वर्ष २०१९ मध्ये आम्ही पुणे येथे वैद्यकीय उपचारांसाठी गेलो होतो. तेव्हा मी आणि माझे यजमान आम्ही दोघे निखील महाबळेश्वरकर यांच्याकडे काही दिवस निवासाला होतो. ध्रुवला घरी साधक आलेले आवडतात. आम्ही दोघे सकाळी बाहेर पडल्यावर रात्रीच घरी पोचायचो. तेव्हा कधीकधी ध्रुव आमची वाट पहायचा. आमच्याशी खेळायला त्याला आवडायचे. त्याच्याशी खेळल्यावर आमचा दिवसभरचा थकवा अल्प व्हायचा. ध्रुवने आम्हाला पुष्कळ लळा लावला.

२. ध्रुव पुष्कळ समजूतदार, शांत आणि सात्त्विक आहे.

३. परात्पर गुरूंचे ‘छायाचित्रात्मक जीवनदर्शन’ या ग्रंथातील परात्पर गुरूंची छायाचित्रे पाहिल्याविना न झोपणे

परात्पर गुरूंचे ‘छायाचित्रात्मक जीवनदर्शन’ या ग्रंथातील परात्पर गुरूंची छायाचित्रे पाहिल्याशिवाय ध्रुव झोपत नाही. छायाचित्रांशी तो पुष्कळ बोलत असतो आणि ‘आम्हाला रामनाथी आश्रमात लवकर घेऊन चला,’ असे छायाचित्रातील आबांना (परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना) सांगत असतो.’

– श्री. अजित आणि सौ. अरुणा तावडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१७.६.२०२०)