दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांच्या माध्यमातून ईश्वराने श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील एकरूपतेची दिलेली प्रचीती !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील एकरूपतेच्या संदर्भात साधकांना अनेकदा अनुभूती येत असतात. सद्गुरुद्वयींच्या एकरूपतेची प्रचीती ईश्वरानेच एका अनोख्या अनुभूतीच्या माध्यमातून पुन्हा एकदा दिली. ती पुढे दिली आहे. ईश्वराची ही सुंदर लीला सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे यांना एका साधकाने लक्षात आणून दिली.

दैनिक ‘सनातन प्रभात’ उन्हाच्या दिशेने धरून पहातांना श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी मागील पानावरील श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे, तर श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी मागील पानावरील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे छायाचित्र दिसणे

सद्गुरु राजेंद्र शिंदे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने ९.५.२०२१ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘सनातनची दैवी गुरुपरंपरा’ हा रंगीत विशेषांक प्रकाशित करण्यात आला. या विशेषांकात परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे अवतारत्व यांविषयीचे लिखाण प्रकाशित करण्यात आले. दैनिकाच्या ‘मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ’ या आवृत्तीच्या विशेषांकात पृष्ठ ५ अन् ६ वर प्रसिद्ध केलेल्या छायाचित्रांच्या संदर्भात एक वैशिष्ट्यपूर्ण सूत्र लक्षात आले.

वरील छायाचित्र जन्मोत्सव विशेषांकाच्या पृष्ठ ६ वरील असून मागील पृष्ठ ५ वरील सद्गुरुद्वयी एकमेकांच्या ठिकाणी दिसत आहेत. जणू त्या साधकांना ‘आम्ही एकच आहोत’, याची प्रचीती छायाचित्रातून देत आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे एकत्रित एका भावमुद्रेतील छायाचित्र पृष्ठ ५ वर आणि दुसर्‍या भावमुद्रेतील छायाचित्र पृष्ठ ६ वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. पृष्ठ ६ उन्हाच्या दिशेने धरून पाहिल्यास मागील पृष्ठ ५ वरील छायाचित्राचा काही भाग दिसू लागतो. तो अशा प्रकारे दिसतो की, पृष्ठ ६ वरील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी मागील पृष्ठ ५ वरील श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे छायाचित्र, तर पृष्ठ ६ वरील श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या छायाचित्राच्या ठिकाणी मागील पृष्ठ ५ वरील श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचे छायाचित्र दिसते. परात्पर गुरु डॉ. आठवले मध्ये असल्याने ते दोन्ही छायाचित्रांत एकसमान दिसतात. यांतून ‘दोन्ही सद्गुरु एकमेकींशी एकरूप झाल्या आहेत’, असे वाटते.


सप्तर्षींनी वर्णन केलेली श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील एकरूपता !

सप्तर्षि जीवनाडीपट्टीत श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या अवतारत्वाची महती सांगतांना ‘त्या दोघी वेगळ्या नसून एकच आहेत’, असे महर्षि पुनःपुन्हा सांगतात. त्याची काही निवडक उदाहरणे पुढे दिली आहेत.

अ. प्रत्येक जन्मात एकत्रित जन्माला येणार्‍या कार्तिकपुत्री (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ) आणि उत्तरापुत्री (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) ! : ‘आतापर्यंत आदिशक्तीचा अंशावतार असलेल्या कार्तिकपुत्री (श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ) आणि उत्तरापुत्री (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) प्रत्येक जन्मात एकत्रित जन्माला आल्या आहेत अन् यापुढेही श्री गुरूंच्या कार्यासाठी परत जन्म घेणार आहेत.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १४९ (१.१०.२०२०))

आ. उत्तरापुत्री म्हणजे मंदिराच्या गाभार्‍यातील मूर्ती, तर कार्तिकपुत्री म्हणजे सर्वत्र भ्रमण करणारी मंदिरातील उत्सवमूर्ती ! : कार्तिकपुत्री आणि उत्तरापुत्री या दोघी एकच आहेत. उत्तरापुत्री गाभार्‍यात असलेल्या देवतेप्रमाणे रामनाथी आश्रमरूपी मंदिरात रहातात, तर कार्तिकपुत्री उत्सवासाठी सर्वत्र जाणार्‍या मंदिरातील उत्सव मूर्तीप्रमाणे आहेत.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १४९ (१.१०.२०२०))

इ. ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी म्हणजे आदिशक्तीची २ रूपे असणे : ‘श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ या दोघी म्हणजे आदिशक्तीची २ रूपेच आहेत. त्यामुळे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तुम्हाला (श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) शोधून त्यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून नेमले आहे.’ – सप्तर्षि (संदर्भ : सप्तर्षि जीवनाडी वाचन क्र. १४९ (१.१०.२०२०))


श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कृतींतून जाणवलेली त्यांच्यातील एकरूपता

‘सद्गुरुद्वयींचे बोलणे किंवा एखादी वार्ता कळल्यावर त्यांनी काढलेले उद्गार एकच असतात. सद्गुरुद्वयी एकत्र असतांना एखादा साधक काही निरोप द्यायला आला, तर दोन्ही सद्गुरूंकडून त्या साधकाला एकाच वेळी एकसारखा प्रतिसाद दिला जातो’, असे अनेक वेळा लक्षात आले आहे. यावरून ‘दोन्ही सद्गुरु जरी दिसायला वेगवेगळ्या असल्या, तरी त्या आतून एकच आहेत’, असा अनुभव येतो. अनेक साधकांना अशीही अनुभूती आली आहे की, पूजाविधी करतांना दोन्ही सद्गुरूंच्या कृती एकसमान होतात आणि विधी झाल्यानंतर नमस्काराची मुद्राही काहीही न ठरवता एकाच वेळी, एकसारखी होते.

ज्यांच्या एकरूपतेची प्रचीती देण्यासाठी स्वयं ईश्वर विविध लीला करतो, अशा आदिशक्ति जगदंबारूपी श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ अन् त्यांना घडवणारे श्रीमन्नारायणस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. विनायक शानभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.७.२०२१)


श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे एकमेकींशी असलेल्या एकरूपतेविषयीचे उद्गार !

श्रीसत्‌शक्‍ति (सौ.) बिंदाताई नेहमी म्हणतात, ‘‘मी आणि सद्गुरु गाडगीळकाकू वेगळ्या नसून एकच आहोत.’’ अशाच अर्थाचे उद्गार श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळकाकू यांनीही काढले होते. तेव्हा ‘संत दिसती वेगळाले । परि ते स्वरूपी मिळाले ।।’ या वचनाची प्रत्यक्ष प्रचीती येते.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या/सद्गुरुंच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक