पडेल (तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग) येथील राजेंद्र आनंद जोशी (वय ४९ वर्षे) यांचे १९.४.२०२१ (चैत्र शुक्ल पक्ष सप्तमी) या दिवशी कोरोनामुळे निधन झाले. १६.७.२०२१ या दिवशी त्यांचे तिसरे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांची बहीण सौ. भाग्यश्री खाडिलकर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
१. ‘राजेंद्र बुद्धीमान, स्वावलंबी, शाकाहारी आणि निर्व्यसनी होता.
२. काटकसरी : त्याच्या गरजा अतिशय अल्प होत्या. कोणतीही गोष्ट वाया न घालवता तिचा पूर्ण वापर करण्याकडे त्याचा कल असायचा.
३. तो त्याला मिळालेले वेतन बरीच वर्षे वडिलांकडे आणून देत असे.
४. विविध कौशल्ये अवगत असणे : त्याला अनेक गोष्टी सहज करता येत असत. ‘घरातील वीज जोडणी, पाण्याच्या पंपाचे काम, स्वयंपाकघरातील मोदकापासून सर्व पदार्थ बनवणे’, हे सर्व त्याला करता येत होते. पौरोहित्याच्या अनुषंगाने ‘गणपति बसवणे, विसर्जन करणे, सत्यनारायण पूजा सांगणे’, हेही त्याला जमत होते. त्याच्यात घरातील दुरुस्तीची सर्व कामे स्वतःच करण्याचे कौशल्य होते.
५. अध्यात्माची आवड असणे : त्याला गणपतीची भक्ती करायला आवडत असे. तो गणपति अथर्वशीर्षाची आवर्तने करत असे. गेल्या वर्षी वडिलांच्या आजारपणात त्याने गणपति आणि दत्त यांचा नामजप एक लाखापर्यंत केला होता, तसेच मुलाच्या मुंजीसाठी पुरोहितांनी त्याला ४८ सहस्र वेळा गायत्री मंत्र म्हणायला सांगितला होता. तो त्याने पूर्ण केला होता.
६. नियोजनबद्ध कृती करणे : प्रत्येक मासाच्या दुसर्या आणि चौथ्या शनिवारी तो घरी पडेलला यायचा. त्यापूर्वीच अनेक मास त्याचे रेल्वेचे आरक्षण झालेले असायचे.
७. कुटुंबियांविषयीची माहिती : त्याची पत्नी शिक्षिका आहे. मुलगा कु. वेद आणि मुलगी कु. श्रुती अजून लहान आहेत. राजेंद्रचे वडील श्री. आनंद जोशी यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के आहे.
८. अनुभूती
८ अ. राजेंद्र यांच्या दशविधी क्रिया विधीच्या वेळी दळवळण बंदी असूनही एक लांबचे नातेवाईक उपस्थित रहाणे आणि त्यांच्या रूपाने दत्तगुरु आल्याचे जाणवणे : राजेंद्रच्या दहाव्या दिवसाच्या विधीच्या वेळी दळणवळण बंदी असल्यामुळे कुणी नातेवाईक येऊ शकत नव्हते; मात्र त्याच्या पत्नीचे एक मामा पांढर्या शुभ्र वेशात योग्य वेळी आले आणि त्यांच्याकडून ‘पिंडाला तीळ आणि तांदुळ वहाणे, नमस्कार करणे’, या कृती झाल्या. त्या वेळी सर्व जण ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होते. ‘त्यांच्या रूपात साक्षात् दत्तगुरु आले होते’, असे मला वाटले. मामा साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वाचन करतात, तसेच सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादनेही घेतात.
८ आ. राजेंद्रच्या निधनानंतर १३ व्या दिवसापर्यंतचे सर्व विधी निर्विघ्नपणे पार पडले. त्या वेळी माझ्याकडून ‘राजेंद्रचा पुढील प्रवास जलद गतीने व्हावा’, अशी प्रार्थना होत होती.’
– सौ. भाग्यश्री खाडिलकर (बहीण), देवगड, सिंधुदुर्ग. (६.५.२०२१)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |