समाधानी, इतरांना साहाय्‍य करण्‍यासाठी सदैव तत्‍पर असलेल्‍या आणि तळमळीने सेवा करणार्‍या कै. (सौ.) मंजुषा शशिधर जोशी (वय ५५ वर्षे)!

समाधानी, इतरांना साहाय्‍य करण्‍यासाठी सदैव तत्‍पर असलेल्‍या आणि तळमळीने सेवा करणार्‍या नाशिक येथील ६१ टक्‍के आध्‍यात्मिक पातळीच्‍या कै. (सौ.) मंजुषा शशिधर जोशी (वय ५५ वर्षे)!

१७.४.२०२१ या दिवशी नाशिक येथील सौ. मंजुषा शशिधर जोशी यांचे निधन झाले. १५.७.२०२१ या दिवशी त्‍यांचे तिसरे मासिक श्राद्ध झाले. त्‍यानिमित्त सहसाधकांना जाणवलेली त्‍यांची गुणवैशिष्‍ट्ये पुढे दिली आहेत.

कै. (सौ.) मंजुषा शशिधर जोशी

श्रीमती श्‍यामला दादाजी देशमुख, नाशिक

१. अडचणीच्‍या वेळी साहाय्‍य करणे

‘श्री. शशिधर जोशी आणि कै. (सौ.) मंजुषा जोशी यांच्‍या कुटुंबाशी आमच्‍या कुटुंबाचे जिव्‍हाळ्‍याचे संबंध आहेत. कोणतीही अडचण असेल, तर शशिधरदादा आणि सौ. मंजुषावहिनी यांच्‍याकडे आम्‍ही हक्‍काने साहाय्‍य मागू शकत होतो. वहिनींना कोणतीही अडचण असली किंवा त्‍या कितीही आजारी असल्‍या, तरी त्‍यांंच्‍याकडे कोणीही साहाय्‍य मागितल्‍यास त्‍या साहाय्‍य करण्‍यास सदैव तत्‍पर असत. त्‍या पुष्‍कळ संवेदनशील होत्‍या. त्‍यामुळे कोणाला काही अडचण असेल, तर ‘किती साहाय्‍य करू अन् किती नको ?’, असे त्‍यांना वाटत असे.

२. यजमानांचे निधन झाल्‍यानंतर त्‍या दुःखातून सावरण्‍यासाठी आणि त्‍यानंतर साधनेची घडी बसवण्‍यासाठी साहाय्‍य करणे

माझ्‍या यजमानांचे निधन झाल्‍यानंतर शशिधरदादा आणि सौ. मंजुषावहिनी या दोघांनीही आम्‍हाला पुष्‍कळ साहाय्‍य केले होते. माझ्‍या यजमानांचे आकस्मिक निधन झाल्‍यामुळे मला त्‍या दुःखातून सावरायला त्‍यांचे पुष्‍कळ साहाय्‍य झाले. मंजुषावहिनींनी त्‍या वेळी मला पुष्‍कळ आधार दिला होता. त्‍या कालावधीत आम्‍हा कुटुंबियांना काय हवे-नको, याकडे त्‍या जातीने लक्ष देत होत्‍या. त्‍यांनी माझ्‍या साधनेचे दायित्‍व स्‍वीकारून मला माझ्‍या साधनेची घडी बसवण्‍यासाठीही साहाय्‍य केले होते. आमच्‍या घरी होणार्‍या प्रत्‍येक सण-समारंभाला त्‍या आवर्जून उपस्‍थित असायच्‍या.

३. त्‍या कधीही कुणाला दुखावेल, असे बोलल्‍याचे मला आठवत नाही.

४. घडणार्‍या सर्व प्रसंगांच्‍या संदर्भात मी त्‍यांच्‍याशी मनमोकळेपणाने बोलू शकत होते.

५. त्‍यांची आर्थिक स्‍थिती बेताची असूनही त्‍या पुष्‍कळ समाधानी होत्‍या. त्‍याही परिस्‍थितीमध्‍ये त्‍या आनंदी असायच्‍या आणि इतरांनाही आनंद देण्‍याचा प्रयत्न करायच्‍या.

६. स्‍वतःला पालटण्‍यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणे

६ अ. ‘मी साधनेचे आणखी कोणते प्रयत्न करू ?’, असे तळमळीने विचारणे : त्‍यांना साधनेची पुष्‍कळ तळमळ होती. त्‍या मला नेहमी विचारायच्‍या, ‘‘मी आणखी कोणते प्रयत्न करू ? मी कुठे न्‍यून पडते ?’’ साधनेचे प्रयत्न झोकून देऊन करत असूनही ‘मी साधनेत पुष्‍कळ अल्‍प पडते’, असे त्‍या नेहमी म्‍हणायच्‍या.

६ आ. ‘भावनाप्रधानता’ या स्‍वभावदोषावर मात करण्‍यासाठी पुष्‍कळ प्रयत्न करणे : स्‍वतःतील ‘भावनाप्रधानता’ या प्रबळ स्‍वभावदोषावर मात करण्‍यासाठी त्‍यांनी पुष्‍कळ प्रयत्न केले. ३ – ४ वर्षांपूर्वी श्री. शशिधरदादांच्‍या आजारपणात त्‍यांना पुष्‍कळ काळजी वाटत होती; पण या दोषावर मात करण्‍यासाठी त्‍या स्‍वतः त्‍यांना चिकित्‍सालयात घेऊन जात असत.

६ इ. प्रारंभी प्रवास करण्‍यास भीती वाटणे आणि नंतर सेवेसाठी एकटीने प्रवास करणे : त्‍यांना सेवा करून घरी जायला विलंब व्‍हायचा. पूर्वी त्‍यांना रात्री उशिरा प्रवास करायला भीती वाटायची. या स्‍वभावदोषावर मात करण्‍यासाठी त्‍यांनी स्‍वयंसूचना घेतल्‍या. त्‍यासह त्‍यांनी ‘प्रार्थना करणे, ‘परात्‍पर गुरु डॉक्‍टर माझ्‍या समवेत आहेत’, असा भाव ठेवणे आणि प्रवासात अखंड नामजप करणे’, असे प्रयत्न करून या स्‍वभावदोषावर मात केली. त्‍यानंतर कित्‍येकदा त्‍यांना सेवेसाठी एकटीला बाहेरगावी जावे लागत असे आणि त्‍या जातही असत.

६ ई. त्‍यांची व्‍यष्‍टी प्रकृती असूनही त्‍यांनी नाशिक जिल्‍ह्यातील साधकांच्‍या साधनेचे दायित्‍व घेतले होते. त्‍या अधिकाधिक दायित्‍व घेऊन सेवा करण्‍याचा प्रयत्न करत असत.’

सौ. सावित्री वीरेंद्र इचलकरंजीकर आणि त्‍यांची बहीण सौ. निशिगंधा अनिमिष नाफडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

आधार वाटणे

‘आम्‍हाला मंजूमामी (कै. (सौ.) मंजुषा जोशी) अत्‍यंत जवळच्‍या होत्‍या. घरी कोणतीही अडचण असेल, तर आम्‍ही सर्वांत आधी त्‍यांना संपर्क करून सांगायचो. त्‍या असतांना आम्‍ही अगदी निश्‍चिंत असायचो. आमच्‍या आईची (श्रीमती श्‍यामला देशमुख यांची) त्‍या विशेष काळजी घ्‍यायच्‍या. आई आणि मामी आध्‍यात्मिक मैत्रिणी होत्‍या.

श्री. अशोक सारंगधर आणि सौ. जयश्री अशोक सारंगधर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. समाधानी वृत्ती

‘सौ. मंजुषाताईंना मायेतील कुठल्‍याही गोष्‍टीची आसक्‍ती नव्‍हती. ताई आहे त्‍या परिस्‍थितीत समाधानी आणि आनंदी असायच्‍या.

२. प्रेमभाव

आम्‍ही कोपरगाव येथे असतांना तेथे सेवेच्‍या संदर्भात अथवा वैयक्‍तिक स्‍तरावर कोणती अडचण आली, तरी ‘ताई त्‍यातून काहीतरी मार्ग काढतील’, अशी आम्‍हाला शाश्‍वती होती. त्‍यामुळे आम्‍ही त्‍यांना कोणताही प्रसंग सहजतेने सांगायचो. कौटुंबिक स्‍तरावरील अडचण सांगितली, तरी त्‍या तिच्‍यावर योग्‍य दृष्‍टीकोन देत असत. त्‍यांना संपर्क केल्‍यावर त्‍या सेवेत व्‍यस्‍त असल्‍याने त्‍यांच्‍याशी बोलणे शक्‍य झाले नाही, तर त्‍या आम्‍हाला आठवणीने नंतर संपर्क करत असत आणि ‘ताई किंवा दादा, काय अडचण आहे ?’, असे प्रेमाने विचारून शंकेचे समाधान करत असत.

३. सेवेची तळमळ

अ. आरंभीपासून त्‍या दायित्‍व आणि पुढाकार घेऊन सेवा करायच्‍या. त्‍यांना तीन मुली आहेत. यजमानांना शारीरिक आणि आध्‍यात्मिक त्रास आहे. असे असूनही मुली आणि यजमान यांचे सर्व सांभाळून त्‍या सेवेला येत असत. कोणतीही सेवा करण्‍याची त्‍यांची सिद्धता असायची.

आ. त्‍यांना सतत गुरुकार्याचा ध्‍यास लागलेला असायचा. सेवेला कोणीही आले नाही, तरी त्‍यांचा प्रत्‍येक सेवेत सहभाग असायचा.

इ. शारीरिक क्षमतेपेक्षाही अधिक सेवा करण्‍याची त्‍यांची सिद्धता असायची.

४. साधकांना सेवेला प्राधान्‍य देण्‍यास सांगणे

बर्‍याच वेळा सेवेनिमित्त त्‍या कोपरगाव येथे आमच्‍या घरी येत असत. त्‍यांना जेवणाविषयी विचारल्‍यावर त्‍या ‘जे असेल, ते खाऊया. तुम्‍ही काही वेगळे बनवू नका’, असे सांगत असत. त्‍यांची कुठलीही अपेक्षा किंवा तक्रार नसायची. त्‍या आम्‍हाला सेवेला प्राधान्‍य देण्‍यास सांगायच्‍या.

(१६.६.२०२१)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.